चालू घडामोडी - २७ व २८ डिसेंबर २०१४

·        भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवार २८ डिसेंबर रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला धुक्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहू शकले नाहीत.
·        झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४२ जागा मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले होते. झारखंडमध्ये प्रथमच एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. रघुवर दास यांची मुख्यमंत्रिपदी भाजपकडून निवड करण्यात आली होती.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी त्यांना देण्यात आलेल्या संरक्षणासंदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली विचारलेली माहिती देण्यास मेहसाणा पोलिसांनी नकार दिला आहे.
·        संबंधित चौकशी स्थानिक गुप्तचर खात्याअंतर्गत येत असल्याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत येत नाही, असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले आहे.
·        संसदेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेला भूसंपादन कायदा १ जानेवारी २०१४ला अस्तित्वात आल्यानंतर त्यातील कलम १०५ (३) नुसार एक वर्षाच्या आत, म्हणजे १ जानेवारी २०१५ पूर्वी १८८५ चा भूसंपादन (खाण) कायदा, १९५६ चा राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९६२ चा अणुऊर्जा कायदा, १९७८ चा मेट्रो रेल्वे कायदा, १९८९ चा रेल्वे कायदा यासारख्या केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या तब्बल १३ कायद्यांमध्ये दुरुस्त्या करणे अनिवार्य आहे.
·        आज जलद संपर्काचे माध्यम बनलेला ईमेल २७ डिसेंबर रोजी ३२ वर्षांचा झाला. मात्र आजच्या काळातील संदेशवहनाचे महत्त्वाचे माध्यम झालेला हा ईमेल म्हणजे मुंबईत जन्मलेल्या एका अमेरिकन-भारतीयाने जगाला दिलेली देणगी आहे.
·        व्ही. ए. शिवा अय्यादुराई या भारतीय-अमेरिकनानेच १९७८ मध्ये ईमेलचा शोध लावला होता आणि त्यावेळी ते जेमतेम १४ वर्षांचे होते.
·        भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टिचितचा नवा विक्रम नोंदवला. त्याच्या नावावर कसोटी, वन-डे व टी-२० क्रिकेटमध्ये मिळून ४६० डावांमध्ये १३४ यष्टिचित जमा आहेत. ३३ वर्षीय धोनीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला (४८५ डावांमध्ये १३३ यष्टि.) मागे टाकले.
·        रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर मिचेल जॉन्सनला यष्टिचित बाद करून त्याने हा विक्रम नोंदवला.
·        या यादीत श्रीलंकेचाच रोमेश कालुवितरणा (२७० डावांमध्ये १०१ यष्टि.) तिसऱ्या स्थानावर आहे. नयन मोंगिया या यादीत दहाव्या स्थानावर आहे. धोनीने कसोटीत ३८, वन-डेत ८५ आणि टी-२०त ११ फलंदाजांना यष्टिचित केले आहेत.
·        गोलंदाजीच्या अवैध शैलीमुळे डावखुरा स्पिनर प्रज्ञान ओझावर आयसीसीने बंदी घातली आहे. त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही.
·        चेन्नईतील आयसीसीच्या सेंटरमध्ये ओझाच्या शैलीची तपासणी झाली होती, त्यात त्याच्या गोलंदाजीची शैली आयसीसीच्या नियमात बसणारी नसल्याचे स्पष्ट झाले. शैलीत सुधारणा करेपर्यंत ओझा गोलंदाजी करू शकत नाही.
·        एअर एशियाचे इंडोशेनियाहून सिंगापूरच्या दिशेने जाणारे क्यु झेड - ८५०१ क्रमांकाच्या ‘एअरबस ३२०-२००’ प्रकारातील विमान अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
·        विमानात एकूण १६२ प्रवासी असून त्यात १४९ इंडोनेशियन, ३ कोरियन तसेच सिंगापूर, ब्रिटन आणि मलेशियाच्या नागरिकांचा समावेश आहे.
·        सोनी पिक्चरच्या ‘द इंटरव्ह्यू’ या चित्रपटात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन याच्या हत्येच्या कटाचे कथानक दाखविले आहे. कोरियाने या चित्रपटाला विरोध केला होता. त्यामुळे अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये हल्ले होण्याच्या भीतीने सोनी पिक्चरने हा चित्रपट मागे घेतला होता.
·        मात्र, ओबामा यांच्या पुढाकाराने हा चित्रपट गेल्या आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला. पाठोपाठ कोरियातील इंटरनेट सेवा काही काळासाठी विस्कळित झाली होती.
·        अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादाने आणखी खालची पातळी गाठली आहे. कोरियाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची तुलना माकडाशी केली असून, या सर्व कटामागे ओबामाच असल्याचा आरोप केला आहे.
·        अमेरिकेनेच इंटरनेट विस्कळीत केल्याचा आरोप उत्तर कोरियाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, उत्तर कोरियाच्या संरक्षण समितीची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर या समितीचा प्रवक्ता म्हणाला, ‘या प्रकरणाच्या पाठीशी ओबामाच आहे. ओबामा सतत अस्वस्थ होत असतात. आणि त्यानंतर विषुववृत्ताच्या जंगलांमधील माकडांसारखे वर्तन करत असतात.’ कोरियाकडून या आधीही ओबामा यांची खिल्ली उडविण्यात आली आहे.
·        पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि वरिष्ठ तालिबानी कमांडर सद्दाम याला पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी खैबर एजन्सीमध्ये ठार केले आहे. तर त्याच्या एका साथिदाराला पकडण्यात आले आहे.
·        चीनमधील वेंझोऊ या शहरातील सरकारी शिक्षण विभागाने शाळांमध्ये ख्रिसमससंबंधी कार्यक्रम साजरे करण्यावर बंदी घातली आहे. हा पश्चिमेकडील उत्सव असल्याने तो साजरा करण्यास चीनमध्ये विरोध होऊ लागल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
·        अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश (बुश सीनिअर) यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते ९० वर्षांचे आहेत.
·        सीनिअर बुश यांना मंगळवारी रात्री धाप लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ह्युस्टन मेथडॉलॉजिस्ट हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment