चालू घडामोडी - ५ फेब्रुवारी २०१५

     शारदा चिटफंड गैरव्यवहाराचाLC Goyal & Anil Goswami तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कामकाजात हस्तक्षेप केल्यामुळे केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांना केंद्र सरकारने पदावरून हटविले.
     शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणात अटक झालेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या वतीने गोस्वामी यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना फोन केला होता.
     गोस्वामी यांच्या जागी एल. सी. गोयल यांची नवे गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. एल. सी. गोयल यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
     कोळसा खाण लिलावप्रकरणी अनेक कंपन्यांमध्ये चुरशीची लढत सुरू झाली आहे. यामध्ये सर्वाधिक बोली वेदांतकडून लावण्यात आली आहे.
     कोळसा खाणींच्या लिलावाच्या पहिल्या फेरीत खाण सम्राट अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत समूहाने २३ खाणींपैकी १४ खाणींसाठी बोली लावली आहे. 
     पहिल्या फेरीत एकूण २३ खाणींचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात अदानी उद्योग समूह, आदित्य बिर्ला, आणि जिंदाल समूहानेही भाग घेतला आहे.
     वेदांत समूहाने विविध १४ कोळसा खाणींसाठी २५ निविदा भरल्या आहेत.
     इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी गुजरातमधील निलंबित अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. पांडे यांच्यासह अन्य तिघांना विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
     विशेष न्यायालयाने आज पांडे यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन देण्याचा निर्णय घेतला.
     तसेच त्यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पांडे हे प्रकरणात अटक झालेले सर्वांत वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत. पांडेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सीबीआयच्या न्यायालयाकडून यापूर्वी फेटाळण्यात आला होता.
     इशरत जहाँ चकमक प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पांडे यांचे नाव आहे. १५ जून २००४ मध्ये जेव्हा इशरत जहाँला चकमकीत ठार करण्यात आले, तेव्हा पांडे हे सहआयुक्त होते.
     लाच घेतल्याप्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) अटक करण्यात आली आहे.
     जागेचा ताबा परत देण्यासाठी मंजूर केलेल्या ठरावावर स्वाक्षरी करण्यासाठी सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापौर माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० जानेवारीला रंगेहाथ पकडले होते.
     राज्यातील तब्बल ६२४ कोटी २८ लाख रुपये किमतीच्या सिंचन कामांच्या १२८ निविदा देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केल्या.
     तसेच कोकणातील १२ सिंचन प्रकल्पांच्या कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली.
     अग्नी ५चे प्रकल्प संचालक आर. के. गुप्ता यांना प्रकल्पातून हटविण्याचा निर्णय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) घेतला आहे.
     काही दिवसापूर्वीच अग्नी ५ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा