चालू घडामोडी - ८ एप्रिल २०१५


    मुद्रा बँकेचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
  • छोटया व्यावसायिकांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने २०,००० कोटी रुपयांचा राखीव निधी असलेल्या मुद्रा (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी) योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
  • येत्या १२ महिन्यांमध्ये ही योजना बँकेत रूपांतरित केली जाईल. या योजनेत छोटया व्यावसायिकांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाणार असून देशातील ५.८ कोटी छोटया व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होईल.
  • जनधन योजनेतून ‘बँकिंग फॉर अनबँकिंग’ हा उपक्रम राबवला जात असून त्याच धर्तीवर ‘फंड फॉर अनफंडेड’ हा उद्देश या बँकेच्या माध्यमातून साध्य केला जाईल.
  • केंद्र सरकारने २०००० कोटी रुपयांच्या भागभांडवलासह मुद्रा बॅंकेच्या स्थापनेची घोषणा केली होती. या बॅंकेचा फायदा देशातील सुमारे ५.७७ कोटी लघू उद्योगांना होणार आहे. 
  • अर्थ मंत्रालयाने मुद्रा बॅंकेची शिशु, किशोर आणि तरुण या ३ गटांत विभागणी केली आहे. शिशू गटांतर्गत ५० हजार रुपये, किशोर गटात ५० हजार ते ५ लाख रुपये तसेच तरुण गटात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. 
  • मुद्रा बॅंकेद्वारे छोटे व्यावसायिक, बचत गट, छोट्या विश्‍वस्त संस्था, मायक्रो फायनान्स कंपन्या, एनबीएफसी यांसारख्या संस्थांना कर्जपुरवठा केला जाईल.
  • अर्थसंकल्पात या बँकेची घोषणा करण्यात आली होती. मुद्रा बँकेचे बँकेत रूपांतर करण्यासाठी येत्या १२ महिन्यांमध्ये मुद्रा बँक विधेयक संसदेत मांडले जाईल, अशी माहिती वित्तीय सेवा सचिव हसमुख अधिया यांनी दिली.

  • राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये रोज सायंकाळी ६ ते ९ हा वेळ मराठी चित्रपटांसाठीच राखून ठेवण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या. 
  • याशिवाय, थिएटरमध्ये चित्रपटापूर्वी राष्ट्रगीतही अनिवार्य करण्यात आले आहे.

  • ट्विटरने रिट्विट करताना मूळ मजकूरशिवाय अतिरिक्त ११६ अक्षरे लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 
  • या नव्या सुविधेमुळे रिट्विट करत असलेला मूळ मजकूर तसेच छायाचित्रामध्ये काहीही फरक पडणार नाही, अशी माहिती ट्विटरनेच ट्विटद्वारे दिली आहे. 
  • सुरुवातीला ही सुविधा डेस्कटॉप तसेच आयफोनधारक युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच ऍड्रॉइडसाठी ही सुविधा देण्यात येणार असल्याचेही पुढे म्हटले आहे. 
  • तसेच, तुर्कीतील माध्यमांनी दिलेल्या वृत्ताप्रमाणे ओलिस ठेवलेल्यांचे छायाचित्र ट्विटरवर प्रकाशित केल्याने सोमवारपासून तुर्कीमध्ये ट्विटर आणि युट्युब वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  • इंटरनेटचा वाढता वापर आणि गरज लक्षात घेता पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मोफत वाय-फाय देण्याची योजना आखली आहे. 
  • जगप्रसिद्ध ताजमहालबरोबरच उत्तर प्रदेशातील फत्तेपूरसिक्री आणि वाराणसी येथील सारनाथ येथे वाय-फाय सुविधा सुरू केली जाणार आहे. 
  • पहिल्या टप्प्यातील उत्तर प्रदेशातील या तीन जगप्रसिद्ध ठिकाणांबरोबरच दुसऱ्या टप्प्यातही सुमारे २५ स्थळांवर वाय-फाय सुरू केले जाणार आहे.
  • सुरुवातीचा अर्धा तास वाय-फाय सुविधा मोफत असेल, मात्र त्यानंतर वापर केल्यास शुल्क पडणार आहे. इंटरनेट वापराचे २०, ३०, ५० आणि ७० रुपयांचे कूपन विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे.

  • केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (डीए) सरसकट ६ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.
  • यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ‘डीए’ मूळ पगाराच्या १०७ टक्क्यांवरून ११३ टक्क्यांवर झेपावणार आहे. मंजूर झालेली ६ टक्के वाढ जानेवारीपासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

  • दिल्लीच्या रस्त्यावर दहा वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेली डिझेल मोटार किंवा वाहन चालविण्यास राष्ट्रीय हरित लवादाने मनाई केली आहे. 
  • राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी आज यासंदर्भातील आदेश काढत डेन्मार्क, ब्राझील, चीन आणि श्रीलंकेमध्ये अशा प्रकारच्या वाहनांवर बंदी घातली जात असल्याचे उदाहरण दिले. 
  • हरित लवादाने गेल्यावर्षी १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेल्या पेट्रोल गाड्या चालविण्यावर बंदी घातली होती.

  • अमेरिका, कॅनडा व ब्रिटनमध्ये ज्याप्रमाणे आपत्कालीन क्रमांक अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे भारतातही दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ‘११२’ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित करण्याच्या विचारात आहे.
  • अमेरिका आणि कॅनडामध्ये ‘९११’ आणि ब्रिटनमध्ये ‘९९९’ हा क्रमांक राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून वापरला जातो. याच धर्तीवर भारतातही ट्रायने राष्ट्रीय स्तरावर एक क्रमांक आपत्कालीन स्थितीत नागरिकांना वापरता यावा, यासाठी विचार केला आहे. 
  • भारतात १०० (पोलिस), १०१ (अग्निशामन), १०२ (रुग्णवाहिका) आणि १०८ (आपत्ती व्यवस्थापन) या क्रमांकांचा वापर करण्यात येतो. पण, आता या सर्व सुविधा ‘११२’ क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.

  • आयुर्वेदाचार्य श्रीकर जळूकर उर्फ वैद्य तात्या यांचे निधन झाले.
  • राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर  जळूकर यांनी आयुर्वेदात मोलाचे संशोधन केले आहे. भारतातील एकमेव धन्वंतरी मंदिराची स्थापना त्यांनी भुसावळमध्ये केली आहे.

  • एका मिनिटात चार्ज होणाऱ्या तसेच अत्यल्प खर्च असलेल्या ऍल्युमिनियमच्या बॅटरीचा स्टॅण्फोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी शोध लावला आहे.
  • आगीचा धोका नसल्याने सध्याच्या लिथियम आणि अल्कलाईनच्या बॅटरीपेक्षा ही बॅटरी अधिक सुरक्षित असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.

  • नेदरलँड्स येथील ‘रॉयल डच शेल’  कंपनी लवकरच ब्रिटनच्या ‘बीजी ग्रुप’चे अधिग्रहण करणार आहे. हा व्यवहार ४७ अब्ज पौंड म्हणजे सुमारे ७० अब्ज डॉलरला पार पडणार आहे. 
  • जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांमध्ये एका दशकानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरचे विलीनीकरण होणार आहे.
  • ‘बीजी ग्रुप’ ब्राझील, पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कझाकस्तान आणि इजिप्त यांसारख्या देशांमध्ये व्यवसाय करण्यास उत्सुक आहे. 
  • शेल कंपनीसोबत विलीनीकरण झाल्यानंतर या देशांमध्ये आणि तेथील बाजारपेठेत व्यापक प्रवेश करता येणे शक्य होणार आहे.

  • येमेनमध्ये शियापंथीय हौथींविरोधात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली जोरदार हल्ले करणाऱ्या आघाडीस अमेरिकेने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • येमेनमधील हौथी फौजांच्या नेमक्या ठिकाणासंदर्भातील माहिती अमेरिका पुरविणार आहे. याचबरोबर, या आघाडीस अमेरिकेकडून शस्त्रपुरवठाही केला जाणार आहे.

  • ख्यातनाम पाकिस्तानी गझल गायक उस्ताद गुलाम अली हे वाराणसीमधील प्रसिद्ध संकट मोचन मंदिरामध्ये होणाऱ्या संगीत महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत. या प्रसिद्ध मंदिरामध्ये पाकिस्तानी गायक प्रथमच आपली कला सादर करणार आहे.
  • जगप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान, अमान व अयान हे त्यांचे पुत्र, कथक पंडित बिरजु महाराज, बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया, प्रसिद्ध ओडिशी नर्तिका सोनल मानसिंह, तबला वादक हसमत अली खान यांसहित ५० पेक्षा अधिक कलाकार या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.

    Snapdeal acquires freecharge
  • भारतामधील ई-वाणिज्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या स्नॅपडीलने ऑनलाइन मोबाइल रिचार्ज व्यासपीठ असलेल्या फ्रीचार्जवर ताबा मिळवला आहे.
  • भारतीय ग्राहक इंटरनेट विभागातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार असून यामुळे स्नॅपडीलला ऑनलाइन रिटेल विभागात सर्वात पुढे वाटचाल करण्याच्या योजनेला पाठबळ मिळू शकते. 
  • स्नॅपडीलचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी : कुणाल बहल

  • कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी सुमित मुजुमदार यांची २०१५-१६ करिता नियुक्ती करण्यात आलेली आहे.

  • केंद्र सरकारने जीवनावश्यक अशा ५०९ औषधांच्या किंमती वाढवण्याची मंजुरी कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून या औषधांच्या किंमती ३.८४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. 
  • राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपी) ने औषधांच्या किंमत वाढीची नोटीसही जारी केली आहे. 
  • २०१३ च्या प्राइस कंट्रोल ऑर्डरनुसार एनपीपीने हा निर्णय घेतला आहे. २०१४ घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारावर औषधांची ही दरवाढ करण्यात आली आहे. 
  • त्यामुळे हॅपीटायटीस बी, कर्करोगाच्या उपचारात लागणारी अल्फा इंटरफेरॉन आणि काब्रोप्लैटि इंजेक्शन्स आणि फंगस इन्फेक्शन म्हणजेच त्वचारोगाशी संबंधित कॅप्सूल फ्लूकोनाजोल या औषधांच्या किंमती १ एप्रिलपासून वाढल्या आहेत.

  • आपल्या अणुभट्ट्यांकरिता लागणाऱ्या इंधनासाठी आतापर्यंत अन्य देशांवरच अवलंबून राहणाऱ्या भारताने यावेळी प्रथमच अणुइंधनाच्या उत्पादन क्षेत्रात विक्रमी भरारी घेतली आहे. 
  • देशातील अणुभट्ट्यांकरिता जितक्या अणुइंधनाची गरज असते, त्यापेक्षा दुप्पट उत्पादन करण्यात आले असून, या क्षेत्रात हा मैलाचा दगडच मानला जात आहे.
  • देशातील ‘हेव्ही वॉटर रिऍक्टर’करिता वार्षिक ६५० मेट्रिक टन इतक्या अणुइंधनाची गरज भासत असते. पण, यावर्षी भारताने १२५२ मेट्रिक टन अणुइंधनाची निर्मिती केली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांची चिंता दूर झाली आहे.
  • अणुभट्ट्यांकरिता इंधनाची निर्मिती करणाऱ्या हैदराबाद येथील अणुऊर्जा संकुलात २०१३-१४ या वर्षात ९६१.२३ मेट्रिक टन इंधनाची निर्मिती करण्यात आली होती. एकूण गरजेपेक्षा ही निर्मिती ३० टक्के जास्त होती.
  • त्यानंतर २०१४-१५ या वर्षात जवळजवळ दुप्पट इंधनाची निर्मिती करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा