चालू घडामोडी - १२ एप्रिल २०१५


    National Earth hour city challenge 2015
  • महाराष्ट्रातील ठाणे शहराला नॅशनल अर्थ अवर कॅपिटल बनविण्यात आले. अंतिम टप्प्यात राजकोट, पुणे आणि ठाणे या तीन शहरांमध्ये चुरस होती त्यात ठाणे शहर विजयी झाले. 
  • शहरातील मोबिलिटी प्लॅन, सौर ऊर्जा आणि कचऱ्यापासून तयार करण्यात येणारी ऊर्जा याबाबतचा पुढाकार घेण्यासाठी निवड समितीने पुण्याची विशेष उल्लेखनीय क्षेत्रामध्ये निवड केली.
  • राजकोटला अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीकरिता गौरविण्यात आले.
  • ठाणे जिल्हा प्रशासन केलेली कार्ये :
    • शहरातील इमारतींमध्ये सौर-ताप जल संयंत्र लावणे अनिवार्य केले.
    • वायु-सौर ऊर्जा हाइब्रिड प्रणालीचा वापर
    • सौर उर्जेचा अधिकाधिक वापर
    • ऊर्जा संरक्षण परियोजना
  • २०१५ अर्थ अवर चॅलेंज मध्ये देशातील १३ शहरे सहभागी झाली होती. गेल्या वर्षी हा सम्मान कोयंबटूर शहराला मिळाला होता.

    IRENA
  • १० जून २०१५ पासून सुरु होणाऱ्या नवव्या आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा परिषद (IRENA) बैठकीच्या अध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आली.
  • ही बैठक संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबू धाबी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
  • आठवी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा परिषद अबू धाबी येथे नोव्हेंबर २०१४मध्ये पार पडली होती.
  • आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी (IRENA) :
    • महासंचालक : अदनान जेड अमीन (केनिया)
    • मुख्यालय : अबू धाबी 
    • स्थापना : या परिषदेची स्थापना २६ जानेवारी २००९ रोजी अधिक चांगले ऊर्जा भविष्य घडविण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
    • या संस्थेचे १४० देश सदस्य असून भारत हा ३३ संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.
    • IRENA च्या दोन प्रमुख संचालन संरचना आहेत : ईरेना असेंबली आणि  ईरेना कौन्सिल.

  • एक होतकरू टेनिस खेळाडू ते अमृतसरमध्ये दुचाकी चालविणारी पहिली मुलगी आणि एक यशस्वी पोलिस अधिकारी हा किरण बेदी यांचा जीवनप्रवास मोठा रंजक आहे. हाच प्रवास छोट्या दोस्तांपर्यंत पोचविण्यासाठी किरण बेदींच्या दोन बहिणींनी ‘टॉप कॉप’ या कॉमिक्स बुकची निर्मिती केली आहे. 
  • हे पुस्तक मराठी, हिंदी, पंजाबी, उर्दू, तमीळ, कन्नड, ओरिया, बंगाली, इंग्रजी, गुजराती, तेलुगू आणि मल्याळम या १२ भाषांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • डायमंड प्रकाशनने याचे प्रकाशन केले असून, रिता पेशवारिया मेनन आणि अनु पेशवारिया यांनी ते लिहिले आहे. या दोघीही बेदी यांच्या बहिणी आहेत. 

  • देशांतर्गत आर्थिक समतोल निर्मितीसाठी आणि सोने आयातीमुळे परदेशात जाणारा डॉलरचा प्रवाह रोखण्यासाठी केंद्र सरकार पुढील महिन्यापासून स्वतंत्र योजना सुरू करणार आहे.
  • त्यानुसार त्रिवेंद्रममधील पद्मनाभस्वामी मंदिरातील १ लाख २४ हजार ७५० कोटी रुपयांचे सोने सरकारच्या तिजोरीत जमा होणार असून, मुंबईतील सिद्धिविनायकाचा खजिनादेखील सरकारी योजनेसाठी वापरण्याचा सरकारचा इरादा आहे.
  • देशातील देवस्थानांमध्ये तीन हजार टन सोन्याचा साठा दडला असून, या सोन्याचा वापर देशांतर्गत व्यापारासाठी करण्याचा सरकारचा विचार आहे. देवस्थानांव्यतिरिक्त देशातील खासगी मालकीचे सोने सतरा हजार टन एवढे आहे. हे सोनेही सरकारी व्यवहारामध्ये वापरण्याचा केंद्राचा विचार आहे.
  • भारत दरवर्षी आठशे ते हजार टन सोन्याची आयात करतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर परकी चलन परदेशामध्ये जाते. हे चलन देशातच राहिल्यास मोठी महसुली तूट भरून निघू शकते.

    Greenpeace
  • पर्यावरणाच्या क्षेत्रातील जगप्रसिद्ध स्वयंसेवी संस्था असलेली ग्रीनपीस भारतामधील चहा उद्योगाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.
  • अमेरिका, ब्रिटन व युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जाणाऱ्या भारतीय चहामध्ये कीटकनाशके असल्याचा दावा ग्रीनपीसने केला आहे. परंतु यासाठी वापरण्यात आलेले नमुने व त्याचे रासायनिक पृथ:करण ग्रीनपीसने उघड केले नाही.
  • ग्रीनपीसचा हा निष्कर्ष भारतीय चहा महामंडळाने फेटाळून लावला आहे.
  • भारतातील चहा उद्योग :
    • जगामधील आघाडीच्या चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारतामध्ये तयार होणारा चहा जगामधील सर्वोत्कृष्ट चहांपैकी एक मानला जातो. हा चहा जगभर निर्यात करण्यात येतो. चहा उद्योग हा भारतामधील दुसरा सर्वांत मोठा उद्योग आहे.
    • भारतामधील चहा उद्योगामध्ये सुमारे ३५ लाख मनुष्यबळ कार्यरत असून गेल्या वर्षी ६४.४ कोटी डॉलर्सचा माल निर्यात करण्यात आला होता.

  • नासा या अंतराळ संशोधन केंद्रातील ऍमि मेन्झर या खगोलशास्त्रज्ञाने शोधलेल्या एका अशनीला (Asteroid) नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसुफजाईचे नाव देण्यात आले आहे. 
  • नासाच्या खगोलशास्त्रज्ञ ऍमि यांनी २०१० मध्ये ही अशनी शोधली होती, तिचे आज अशनी ‘३१६२०१ मलाला’ असे नामकरण करण्यात आले. 
  • ही अशनी मंगळ आणि गुरू यांच्या मधल्या पट्ट्यात असून, तिचा व्यास सुमारे चार किलोमीटर आहे. ती सूर्याभोवती दर साडेपाच तासांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करते तसेच तिचा रंग हा अतिशय गडद आहे.
  • अशनी (Asteroid) : अशनी म्हणजे लघुग्रह म्हणजेच अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह. मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यानच्या रिकाम्या जागेत लघुग्रहांचा पट्टा आहे.

  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने अवकाळी पाऊस व गाटपीटीमुळे नुकसान झालेल्या दिल्लीतील शेतकऱ्यांनी मोठी मदत केली आहे. 
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रती एकरी २० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
  • दिल्ली शहर व आसपासच्या भागात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी दिलासा देताना केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे.

  • ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या कट्टरपंथीय संघटनेचे नेते महंमद बदेई यांच्या समवेत अन्य तेरा जणांना कैरो येथील स्थानिक न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. चिथावणीखोर भाषणे करणे, दंगली भडकावणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. 
  • न्यायालयाने अन्य ३६ आरोपींनाही शिक्षा ठोठावली असून, यामध्ये अमेरिकी इजिप्शियन वंशाचा नागरिक महंमद सुलतानचा समावेश आहे. 
  • ‘मुस्लिम ब्रदरहूड’वर बंदी असतानादेखील या संघटनेचे समर्थन केल्याप्रकरणी बदेई यांना दोषी ठरविण्यात आले आहेत. 

  • फिडेल कॅस्ट्रो यांनी क्रांती केल्यानंतर विकोपाला गेलेले अमेरिका आणि क्युबा यांचे संबंध गेल्या काही वर्षांत निवळत असल्याचे दिसून आले आहे. 
  • याच पार्श्वभूमीवर पनामा येथे अमेरिका खंडातील सर्व देशांच्या परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी ऐतिहासिक हस्तांदोलन केले. 
  • फिडेल यांनी क्युबामध्ये १९५९ मध्ये क्रांती केली. त्यांनी साम्यवादी विचारसरणी अंगीकारली होती. त्यामुळे भांडवलशाही अमेरिकेने ही क्रांती दडपून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले. 
  • मात्र, अमेरिकेसारख्या महासत्तेच्या पायथ्यालाच असणाऱ्या छोट्याशा क्युबामध्ये सत्तेवर आलेले फिडेल हे सर्वांना पुरून उरले. तेव्हापासून गेली अनेक वर्षे अमेरिका आणि क्युबामध्ये संबंध बिघडले होते.

  • छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात पोलिस हुतात्मा, तर बारा जखमी झाले. राज्याचे विशेष कृती दल (एसटीएफ) मोहिमेवर निघाले असताना पिडमेल - पोलमपल्ली विभागात हा हल्ला झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा