चालू घडामोडी - ५ मे २०१५


  • राज्यातील २३ जिल्हा परिषदांना नळपाणीपुरवठा योजनांची गुणवत्ता, देखभाल दुरुस्ती यांसाठी केंद्र सरकारने यंदाच्या वर्षी ९५ कोटी इतक्या निधीची मदत केली आहे. केंद्राच्या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ही मदत दिली आहे. 
  • राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेला निधी कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या गावांतील योजनांवरच खर्च करण्याची अट आहे.

  • टपाल खात्याच्या नवीन योजनेअंतर्गत स्पीड पोस्ट करण्यासाठी पोस्टात जाण्याऐवजी आपल्या जवळच्या एसबीआय एटीएम सेंटरवर हे काम करता येणार आहे.
  • भारतीय टपाल खात्याने ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, आंध्र प्रदेश प्रभागामध्ये ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. यासंदर्भात टपाल खाते स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी करार करणार आहे. 
  • या कराराअंतर्गत एसबीआय आंध्र प्रदेशामध्ये ९५ एटीएम उपलब्ध करणार आहे. सध्या टपाल खात्याने ‘पोस्ट ऑफिस सेव्हिंग सेवे’च्या एटीएमसाठी बॅंक ऑफ इंडियाशी करार केलेला आहे.

    Satheesh Reddy
  • ‘अग्नि-५’च्या कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या ‘डीआरडीओ’चे वरिष्ठ वैज्ञानिक जी. सतीश रेड्डी यांना ‘रॉयल इंस्टीट्यूट ऑफ नेविगेशन’ची प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान करण्यात आली.
  • ही फेलोशिप मिळविणारे रेड्डी हे पहिलेच भारतीय आहेत.
  • डीआरडीओच्या रिसर्च सेंटरचे प्रमुख रेड्डी यांना जड़त्व आणि उपग्रह आधारित नेविगेशन तसेच वैमानिक तंत्रज्ञानातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाते.

  • नेपाळमधील भूकंपातील पीडितांसाठी मदत म्हणून जुने कपडे पाठवू नयेत असे आवाहन नेपाळच्या वतीने करण्यात आले आहे. 
  • नेपाळला बसलेल्या भूकंपाच्या मोठ्या धक्क्यानंतर भारतानेच सर्वप्रथम पीडितांना तातडीने मदत पोचविली होती. भारताच्यावतीने पीडितांना जीवनावश्यक साहित्य घेऊन आलेल्या पहिल्याच रेल्वेमध्ये जुने कपडे असल्याचे आढळून आले आहे. 
  • नेपाळच्या अधिकाऱ्यांनी ‘त्यांना (पीडितांना) ताटात उरलेले अन्न पाठवू नये’ अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

  • नेपाळमधील जनकपूरच्या भूकंपग्रस्तांच्या भेटीस जाण्यास परराष्ट्र मंत्रालयाने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मनाई केली आहे. 
  • नेपाळमधील भूकंपानंतर केंद्र सरकारने तेथे मदतकार्य सुरू केले आहे. बिहारतर्फेही मदत दिली गेली असून, या कामाची पाहणी करण्यासाठी जनकपूरला जाण्याचा नितीशकुमार यांचा हेतू होता.

  • कायम दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकेल्या भूम आणि परांडा या तालुक्यांत आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची क्रांती करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. 
  • सुरवातीला परांडा आणि आता भूम या दोन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘ई-लर्निंग’ने जोडल्या आहेत. अशाप्रकारे जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के ‘ई-लर्निंग’ची सुविधा देण्याचा मान परांडा आणि भूमने पटकावला आहे. 
  • देशातील पहिले ‘ई-लर्निंग’ तालुके म्हणून या दोन्ही तालुक्यांनी बाजी मारली आहे.
  • ‘ई लर्निंग’ची व्याप्ती... 
    • २५० दोन्ही तालुक्यांतील झेडपीच्या शाळा 
    • ५५० संगणकांचे वितरण 
    • २०,००० दोन्ही तालुक्यांतील विद्यार्थी

  • आम आदमी पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीने ‘आप’ नेते कुमार विश्वास यांच्यावर प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला आहे. विश्वास यांच्याबरोबर अनैतिक संबंध असलेल्या अफवेबाबत वेळीच स्पष्टीकरण न दिल्याने आपली प्रतिमा खराब झाल्याचा या महिलेचा दावा आहे. 
  • या आरोपांमुळे आधीच अंतर्गत वादाने त्रस्त झालेल्या ‘आप’च्या अडचणीत भर पडली आहे. ‘आप’ने मात्र या महिलेचे आरोप आधारहिन असून, विरोधी पक्षांचा हा डाव असल्याचे म्हटले आहे. 
  • दिल्ली महिला आयोगाने या संदर्भात विश्वास आणि त्यांच्या पत्नीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.

  • भ्रष्टाचाराविरोधात चीनमध्ये सुरू झालेल्या व्यापक उपाययोजनांमधील एक भाग म्हणून शांघाय शहरातील नेते आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना खासगी व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. 
  • अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी दोन वर्षांपासून भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमक मोहिम सुरू केली आहे. या नियमाची घोषणा जिनपिंग यांनी मार्चमध्ये संसदेत केली होती. 
  • ‘शांघायपासून या नियमाच्या अंमलबजावणीची सुरवात होईल आणि नंतर देशभरात तो राबविला जाईल,‘ असे जिनपिंग यांनी जाहीर केले होते.
  • शांघायमधील नियमांनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कुटुंबीय स्वतंत्र व्यवसाय करू शकत नाहीत. तसेच, परदेशात व्यवसायाची नोंदणी करून चीनमध्ये काम करण्यासही नव्या नियमांनुसार मनाई करण्यात आली आहे. 
  • अर्थात, अधिकाऱ्यांची अपत्ये आणि जोडीदार हे व्यवसायाशी संबंधित असू शकतात; मात्र त्या अधिकाऱ्याची ज्या क्षेत्रात नियुक्ती झाली असेल, तेथे व्यवसाय करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
  • सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांच्या व्यवसायाची माहिती सरकारला कळविणे बंधनकारक आहे.

  • इंग्लंडचा फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. 
  • वेस्ट इंडीज दौऱ्यातील कसोटी मालिकेत तो अपयशी ठरला होता. सहा डावांत तो तीन वेळा शून्यावर बाद झाला व एकच अर्धशतक करू शकला. 
  • वॉर्विकशायरकडून कौंटी क्रिकेट खेळत राहू असे त्याने नमूद केले. ट्रॉटने ५२ कसोटींमध्ये नऊ शतकांसह ३८३५ धावा केल्या. वन-डेमध्ये ६८ सामन्यांत चार शतकांसह २८१९ अशी त्याची कामगिरी झाली. टी-२० मध्ये सात सामन्यांत त्याने एका अर्धशतकासह १३८ धावा केल्या. 
  • २००९ मध्ये ऍशेस मालिकेत त्याने पदार्पणात ओव्हलवर दुसऱ्या डावात शतक काढले. २०१० मध्ये लॉर्डसवर बांगलादेशविरुद्ध २२६ ही त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. 

    Nellie Bly's 151st Birthday
  • लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने शोध पत्रकारितेच्या जनक निले ब्लाय या महिला पत्रकाराचे डुडल तयार केले आहे. 
  • डुडलच्या माध्यमातून १५१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. गुगलच्यावतीने ब्लाय यांची माहिती देणारी छोटीशी फिल्मही तयार करण्यात आली आहे.
  • गुगलच्या वतीने त्यांच्यावर करण्यात आलेल्या डुडलमध्ये त्यांच्यावर काल्पनिक वृत्तपत्र तयार करण्यात आले आहे. आपल्या ५७ वर्षांच्या आयुष्यात निले ब्लाय यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. शोध पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. 
  • विशेष म्हणजे ज्याकाळात महिलांना कुटुंबाबाहेरील विषयांवर बोलण्यापासून बंदी होती, अशा काळात ब्लाय त्यांनी गरीब आणि पीडितांबाबत बातम्या लिहिल्या. 
  • पत्रकाराशिवाय त्या एका उद्योगपती, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. याशिवाय ७२ दिवसांचा जगाच्या प्रवासाचा नवा विक्रमही त्यांनी प्रस्थापित केला होता.

  • देशातील व्होडाफोन इंडिया, भारती एयरटेल, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या चार प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्री-पेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी रोमिंग दरात मोठी कपात केली आहे. कपातीचे नवे दर १ मे पासून लागू झाले आहेत. 
  • ट्रायच्या निर्देशानंतर या दूरसंचार कंपन्यांनी रोमिंग दराच्या कपातीचा निर्णय घेतला. ट्रायने मागील महिन्यात रोमिंग सेवांसाठी किमान उच्च शुल्कात कपात केली होती.

  • अल कायदाच्या नव्या ध्वनिचित्रफीतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख असल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुप्तचर खात्याकडून या व्हिडिओची तपासणी सुरू करण्यात आली आहे. 
  • अविजित रॉय या बांगलादेशी ब्लॉगरसह अन्य चार ब्लॉगर्सच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या हत्यांची जबाबदारीही अल्‌ कायदाने स्वीकारली आहे.
  • अल्‌ कायदाचा प्रमुख आयमान अल जवाहिरी याने गेल्या वर्षी अल्‌ कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेची घोषणा केली होती. या संघटनेची जबाबदारी असीम उमर याच्यावर आहे. अल्‌ कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेने हा व्हिडिओ २ मे रोजी प्रसारित केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा