चालू घडामोडी - १९ मे २०१५


रिलायन्स जिओचा चीनी कंपनीशी करार
  Reliance-JIO-Infocomm-Logo
 • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमने देशात 4G सेवा सुरू करण्यासाठी चीनी मोबाइल फोन निर्माता कंपनी ह्युवाई (Huawei) बरोबर करार केला आहे.
 • रिलायन्स जिओने यावर्षी सर्व राज्यातील ५००० शहरे व २,१५,००० गावांमध्ये 4G सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे.

दिल्ली सरकार विरुद्ध राज्यपाल वाद सुरूच
 • आम आदमी पक्षाच्या सरकारने मुख्यमंत्र्यांचे सचिव राजेंद्र कुमार यांची सेवा विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली. मात्र, नायब राज्यपाल नजीब जंग यांनी तातडीने ही नियुक्ती फेटाळली आहे. 
 • सेवा विभागाचे प्रधान सचिव अनिंदो मजुमदार यांच्या कार्यालयाला ‘आप’ सरकारने टाळे लावल्यानंतर लगेचच राजेंद्र कुमार यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. हंगामी मुख्य सचिवपदावर शकुंतला गॅमलिन यांची नियुक्ती करण्याचे आदेश मजुमदार यांनी काढले होते. 
 • राजेंद्र कुमार यांची नियुक्ती केल्याचे ‘आप’ सरकारने जाहीर करताच नजीब जंग यांनी तातडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहीत, मजुमदार यांच्या जागी राजेंद्र कुमार यांची नियुक्ती अवैध असून या नियुक्तीला आपली मान्यता नसल्याचे स्पष्ट केले.

बराक ओबामा ट्विटरवर 
 • ‘हॅलो, ट्विटर! इट्स बराक रियली!’ असा संदेश देत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विटरवर पदार्पण केले आहे. 
 • मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर सोमवारी ओबामा यांनी आपले अकाऊंट सुरू केले. ओबामा यांनी आपल्या अकाउंटला @POTUS (President Of The United States) असे नाव दिले आहे. 
 • ट्विटरवर अकाऊंट सुरू करताच लाखो नागरिकांनी त्यांना फॉलो केले आहे. या अकाऊंटच्या माध्यमातून ओबामा नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
 • यापूर्वी ओबामा व्हाईट हाऊसच्या ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांसमोर येत राहिले. येथून पुढे अमेरिकेचे अध्यक्ष बदलत राहिले तरी ट्विटरचे अकाऊंट हेच कायम ठेवण्यात येणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी 'वॉश' योजना
 • आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्यसरकारने ‘वॉटर, सॅनिटेशन अँड हायजिन’ अर्थात ‘वॉश’ ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • या योजनेसाठी आदिवासी विकास विभागाने २५० कोटी रुपयांची तरतूद केली असून, यातून विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय आणि स्वच्छतापूर्वक वातावरण निर्माण करण्याचा कार्यक्रम प्रत्येक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. 
 • केंद्र सरकारने २०१९ पर्यंत स्वच्छ भारताचे उद्दिष्ट समोर ठेवून ‘स्वच्छ भारत मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला. स्वच्छ भारताचे उद्दिष्ट साधण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम आहे. यासोबतच ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा’ हा कार्यक्रमही सुरू केला आहे. 
 • शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव करून देणे, स्वच्छतेचा प्रसार व प्रचार करणे, तसेच आरोग्य सुविधा पुरविण्याचे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 
 • वॉश योजना टप्प्याटप्प्याने सर्व शासकीय अनुदानित आश्रमशाळा, तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये राबविण्यात येणार असून, सुरवातीला हा कार्यक्रम आदिवासी विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमध्ये २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून राबविण्यात येणार आहे. 
 • योजना यशस्वी होण्यासाठी ‘युनिसेफ’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने राज्यसरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. युनिसेफचे सहकार्य हे मनुष्यबळ, तांत्रिक आणि आर्थिक सहयोग अशा विविध पातळीवर घेण्यात येईल.

काकीनाडा सेझच्या विकासासाठी जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर आणि जीआयआयसी दरम्यान करार
 • काकीनाडाच्या (आंध्रप्रदेश) विशेष आर्थिक क्षेत्राच्या (सेझ) विकासासाठी जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि गुइझोउ इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (जीआयआयसी) दरम्यान करारावर चीनमधील बीजिंग शहरात स्वाक्षरी करण्यात आली.
 • या कराराअंतर्गत, उच्च तंत्रज्ञानावर आधारित चीनी उपकरणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी काकीनाडाच्या सेझमध्ये २००० एकरच्या क्षेत्रफळावर औद्योगिक पार्क तयार करण्यात येईल.
 • काकीनाडा हे बंदरावर आधारित बहु उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र सुमारे १०५०० एकर क्षेत्रावर पसरलेले आहे.
 • जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि जीआयआयसी यांच्यातील या करारामुळे कुशल आणि अकुशल कामगार यांच्यासाठी ५००० पेक्षा जास्त रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
 • औद्योगिक पार्कमधील पायाभूत सोयी आणि विविध सुविधांच्या विकासासाठी जीआयआयसी ५०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करणार आहे. तसेच येत्या पाच वर्षांत चीनी कंपनी २ ते ३ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०१५
 • पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०१५ हिमाचल प्रदेशमधील कांगडा व्हॅली मध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेचे आयोजन २३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१५ दरम्यान करण्यात येणार आहे. 
 • प्रस्तुत स्पर्धा पॅराग्लायडिंग विश्व संघ, फ्रांस यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.
 • पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे येण्याची हि पहिलीच वेळ आहे. ५० पेक्षा जास्त देश या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
 • पूर्व पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०१३ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यामुळे २०१५ विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद हिमाचल प्रदेशला देण्यात आले.

द्रौपदी मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल
 • द्रौपदी मुर्मू यांनी १८ मे २०१५ रोजी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली. झारखंड राज्याच्या त्या ९व्या राज्यपाल आहेत.
 • राज्यघटनेच्या कलम १५९ नुसार, झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांनी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 • त्यांनी सय्यद अहमद यांची जागा घेतली. सय्यद अहमद यांची अलीकडेच मणिपूर राज्याचे राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली आहे.
 • द्रौपदी मुर्मू बद्दल :
  • द्रौपदी मुर्मू ओडिशा विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदार होत्या.
  • तसेच त्यांनी नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दल (बीजेडी) आणि भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारमध्ये  कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे.

रमादी शहरावर आयएसच्या अतिरेक्यांचा ताबा
 • १७ मे रोजी रमादी या इराकच्या शहरावर इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी ताबा मिळविला. यावेळी बगदादपासून पश्चिमेला ७० किमी अंतरावर असलेल्या रमादी या शहरात ५०० नागरीकांची हत्या झाली. 
 • इराकी सैन्याला मदत करण्यासाठी अमेरिका आयएसच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले करत आहे. तरीही आयएसने याला न जुमानता रमादी शहरावर नियंत्रण प्राप्त केले आहे.
 • रमादी 
  • रमादी अल-अनबर प्रांताची राजधानी आहे. सुन्नी दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या या शहरात बऱ्याच महिन्यांमध्ये अमेरिका नेतृत्वाखालील युती सैन्य आणि दहशतवादी यांच्यात संघर्ष चालू आहे.
  • इराकी सैन्य मुख्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर असलेले रमादी हे पश्चिम इराकमधील सर्वात मोठे शहर आहे.
  • सुमारे ८००० लोक शहर सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.

जागतिक हिंदी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन
 • १०व्या जागतिक हिंदी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाचे नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू भवन येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उद्घाटन केले.
 • १०व्या जागतिक हिंदी संमेलनासाठी लोगो तयार करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बंगळुरूच्या ख्याती गुप्ताने ही स्पर्धा जिंकली व तिला बक्षिसाची ५०००० रु. ची रक्कम देण्यात आली.
 • १० ते १२ सप्टेंबर २०१५ दरम्यान हे संमेलन मध्यप्रदेशातील भोपाळ येथे पार पडेल. १०व्या संमेलनाचे आयोजन भारतात करण्याचा निर्णय २०१२ मध्ये जोहांसबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे पार पडलेल्या ९व्या विश्व हिंदी संमेलनात घेण्यात आला होता.
 • १९७५ मध्ये नागपूर येथे पहिले जागतिक हिंदी संमेलन आयोजित करण्यात आले होते तेव्हापासून जगात अशा ९ संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे.

सरकारची ३० नवीन कोल्ड स्टोरेज उघडण्यासाठी मंजुरी
 • अन्न प्रक्रिया मंत्रालयाने देशात १८ मे २०१५ रोजी ३० नवीन कोल्ड स्टोरेज उघडण्यासाठी मंजुरी दिली आहे. अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी ही घोषणा केली.
 • सरकारने आतापर्यंत १३८ नवीन कोल्ड स्टोरेज सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे ज्यापैकी ४४ कार्यान्वित झाले आहेत. हे कोल्ड स्टोरेज ४ दशलक्ष टन अन्न साठवण क्षमता प्रदान करणार आहेत.
 • देशातील सुमारे ३० दशलक्ष टन दूध व दुग्ध उत्पादने, फळे, भाज्या, मासे आणि धान्य याकरिता साठवण क्षमता कमी पडत आहे.
 • या ३० नवीन प्रकल्पांमध्ये ४७० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. याद्वारे अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये ८.४ टक्के वाढ होईल असा अंदाज आहे.

युकी भांब्री भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू
  Yuki Bhambri
 • जागतिक टेनिस असोसिएशनने (डब्ल्यूटीए) मे २०१५ मध्ये प्रकाशित केलेल्या क्रमवारीत भारतीय टेनिस खेळाडू युकी भांब्री हा पुरुष एकेरीमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू ठरला आहे. त्याने क्रमवारीत २२ स्थानांची झेप घेत सोमदेव देववर्मनला मागे टाकले.
 • डब्ल्यूटीए क्रमवारीत, युकी भांब्री चा क्रमांक १५८वा तर सोमदेवचा १७२वा क्रमांक लागतो. लिएंडर पेस 
 • तसेच सानिया मिर्झा आणि तिची साथीदार मार्टिना हिंगीस (स्वित्झर्लंड) महिला दुहेरीत जगात पहिल्या स्थानावर आहेत. वैयक्तिक क्रमवारीत महिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झा प्रथम तर हिंगीस द्वितीय स्थानी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा