चालू घडामोडी - ८ जून २०१५


सागरी किनारा मार्गाचा नवीन आराखडा डच कंपनीच्या मदतीने
  Maharashtra Netherland agreement for coastal area development
 • नेदरलॅंड आणि राज्यसरकार यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर मुंबईच्या वाहतुकीसाठी महत्वाकांक्षी असलेल्या सागरी किनारा मार्गाचा आराखडा आता नव्याने करण्यात येणार आहे.
 • मुंबईच्या वाहतुकीसाठी सागरी किनारा मार्गाचा दोन वर्षापूर्वी आराखडा तयार करण्यात आला होता. आता हा आराखडा रद्द करुन डच कंपनीच्या मदतीने तीन महिन्यात नवीन आराखडा तयार करण्यात येणार आहे.
 • नरिमन पॉंईट ते कांदिवली या ३५ किमी लांबीच्या या सागरी किनाऱ्याच्या मार्गावर समुद्रात भराव टाकून उभारण्यात येणाऱ्या सागरी मार्गाकरीता नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रुट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हॉटेल ताजमहाल येथे याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला.
 • ३५ किमी लांबीच्या या सागरी किनारा मार्गावर मेट्रो, बाग-बगीचे उभारण्यात येणार आहेत. दोन वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या आराखडयाला ९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र आता एकात्मिक प्रकल्पाचा आराखडा हॉलंडमधील जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांच्या मदतीने तयार केला जाणार आहे.
 • समुद्री जल व्यवस्थापन आणि पाण्यात बांधकाम उभारण्यात जगात डच कंपन्यांचा हातखंड आहे. त्यामुळे सागरी किनारा मार्गाच्या उभारणीत डच तज्ञांचे मार्गदर्शन आणि सहकार्य घेण्यात येत येणार आहे.

के. व्ही. चौधरी केंद्रीय दक्षता आयुक्तपदी
  K. V. Chaudhary
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी प्रमुख के. व्ही. चौधरी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी, तर माहिती आयुक्त विजय शर्मा यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. गेले नऊ महिने ही पदे रिक्त असल्याने काँग्रेस पक्षाने सरकारचा कारभार पारदर्शक नसल्याची टीका केली होती.
 • इंडियन बँकेचे अध्यक्ष टी. एम. भसीन यांना दक्षता आयुक्त नेमण्यात आले असून माजी सामाजिक न्याय व सक्षमीकरण आयुक्त सुधीर भार्गव यांना माहिती आयुक्त नेमण्यात आले आहे. 
 • या नियुक्तयांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खारगे यांनीही चौधरी व शर्मा यांच्या नावाला मान्यता दिली होती.
 • के. व्ही. चौधरी : चौधरी यांची नेमणूक केल्याने मुख्य दक्षता आयुक्तपदी प्रथमच आयएएस व्यतिरिक्त अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. चौधरी हे आयआरएस म्हणजे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असून ते सर्वोच्च न्यायालयाने काळ्या पैशाबाबत नेमलेल्या विशेष चौकशी पथकाचे सल्लागार होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते ऑक्टोबरमध्ये निवृत्त झाले. 
 • विजय शर्मा : हे माजी पर्यावरण सचिव असून २०१२ पासून माहिती आयुक्त म्हणून काम करीत होते. त्यांना सहा महिने कालावधी मिळणार असून ते १ डिसेंबरला वयाची ६५ वर्षे पूर्ण करीत असल्याने निवृत्त होतील. 
 • चौधरी व भसीन यांची नियुक्ती चार वर्षांसाठी असली तरी ६५ वर्षे हे निवृत्तीचे वय लागू राहणार आहे. भार्गव यांना चार वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

मंगळयान १५ दिवस संपर्क क्षेत्राबाहेर
  Mangalyaan to 'blackout' for 15 days
 • भारताचे मंगळयान येत्या १५ दिवसांसाठी संपर्क क्षेत्राबाहेर जाणार आहे. या काळात यानाशी पृथ्वीवरून कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकणार नाही. यान पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणेवर काम करेल. 
 • पृथ्वी आणि मंगळ यांच्यामध्ये सूर्य येत असल्याने ८ जून ते २२ जून या काळात मंगळयानाशी पृथ्वीवरून संपर्क होऊ शकणार नाही. तसेच मंगळयानही पृथ्वीवर संदेश पाठवू शकणार नाही. या काळात अगोदरच देऊन ठेवलेल्या आज्ञाप्रणालीवर यान काम करेल. त्यासाठी पूर्वतयारी केली असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सूत्रांनी सांगितले.
 • गेल्या मार्च महिन्यात अधिक इंधनाची सोय झाल्याने मंगळयानाचे आयुष्यमान सहा महिन्यांनी वाढवण्यात आले होते. यानंतर जर असेच आयुर्मान वाढवणे शक्य झाले तर पुढील मे महिन्यात मंगळयान पुन्हा असेच संपर्क क्षेत्राबाहेर जाईल. तेव्हा सूर्य आणि मंगळामध्ये पृथ्वी आलेली असेल.  

१६वा आयफा पुरस्कार २०१५
 • मलेशियातील क्वालालंपूर येथे १६वा आयफा (International Indian Film Academy) पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये विकास बहलदिग्दर्शित ‘क्वीन’ आणि विशाल भारद्वाज यांच्या ‘हैदर’ याचित्रपटांना प्रत्येकी तीन पुरस्कार मिळाले. 
  IIFA Awards Malaysia 2015
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट : क्वीन
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहिद कपूर (हैदर)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (क्वीन)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजकुमार हिरानी (पीके)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : रितेश देशमुख (एक व्हिलन)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : तब्बू (हैदर)
 • वुमन ऑफ द इयर : दीपिका पदुकोण

भारताकडून बांगलादेशात दोन विशेष आर्थिक क्षेत्र
 • द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचा हेतूने बांगलादेशने दोन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यात भारतीय कंपन्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
 • त्याअंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) बांगलादेशात विमा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एलआयसी आता तेथील कंपनीसोबत संयुक्त उपक्रमाअंतर्गत काम करणार आहे.
 • बांगलादेशने सामंजस्य कराराअंतर्गत बांगलादेशमधील मोंगला आणि भेरमरा येथे भारतीय कंपन्यांसाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्याचे ठरवले आहे. जपान आणि चीननंतर बांगलादेशात विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्यास रस दाखवणारा भारत तिसरा देश आहे. भारताला मोंगला येथे २०० एकर आणि भेरमरा येथे ४७७ एकर जमिनीची आवश्यकता आहे.

आंबेडकर-पेरियार अभ्यासगटावरील बंदी मागे
 • आयआयटी मद्रासने ‘आंबेडकर-पेरियार’ अभ्यासगटावर घातलेली बंदी मागे घेतली. संस्थेचे संचालक आणि अभ्यासगटाच्या सदस्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. 
 • अभ्यासगटाच्या सदस्यांनी कोणत्याही नियमांचा भंग केलेला नाही, असेही आयआयटीच्या संचालक मंडळाने स्पष्ट केले. 
 • केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर या अभ्यासगटाची मान्यता काढून घेण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटले होते. सर्वच पक्षांनी आयआयटीच्या कारवाईचा निषेध केला होता.

डॉ. जी. सतीश रेड्डी संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमधील आघाडीचे शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी संरक्षणमंत्र्यांच्या वैज्ञानिक सल्लागार पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. पुढील दोन वर्षांसाठी ते या पदावर राहतील. 
 • दिशादर्शन आणि विमान तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये रेड्डी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी याआधी अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले असून, अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीतदेखील त्यांचा सिंहांचा वाटा राहिलेला आहे. 
 • संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना याआधी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

सहाराचा डेव्हीड अँड सायमन रूबेन या अब्जाधीश बंधूंशी करार
 • सहाराने डेव्हीड अँड सायमन रूबेन या अब्जाधीश बंधूंशी करार केला असून या बंधूंनी लंडनमधील ग्रोसव्हेनॉर व अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे असलेल्या प्लाझा व ड्रीम डाऊनटाऊन या हॉटेल्सबाबत ८५० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ५५०० कोटी रूपयांचा फेरअर्थसाहाय्य व्यवहार  केला आहे.
 • ही तीनही हॉटेल्स दिवाळखोरीत होती त्यामुळे कर्जदार संस्थांकडून त्यांची विक्री होणे टळले आहे.
 • डेव्हिड व सायमन रूबेन यांचे साम्राज्य डाटा सेंटर ते घोडय़ांच्या र्शयतींपर्यंत असून त्यांनी गेल्या आठवडय़ात बँक ऑफ चायनाकडून दोन मालमत्तांच्या बदल्यात कर्ज खरेदी केली होती. 
 • ग्रोसव्हेनॉर हाऊस हॉटेल बँक ऑफ चायनाने विक्रीस काढले होते कारण त्याच्या व्यवहारात तांत्रिक उणिवा होत्या. सहारा समूह त्यांचे प्रमुख सुब्रता रॉय यांना तिहार तुरूंगातून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी परदेशातील मालमत्ता विकण्याचे प्रयत्न सुरू होते. ग्रोसव्हेनॉर हॉटेल हे मार्चपासून बँक ऑफ चायनाच्या ताब्यात होते.
 • सहारा समूहाने म्हटले आहे की, बँक ऑफ चायनाचे कर्ज परतफेड करण्याकरिता आम्ही फेरपरतफेडीचा व्यवहार करीत आहोत. ब्रिटन व अमेरिकेत आम्ही घेतलेले कर्ज योग्य अटीवर घेतले होते. सहाराच्या फेर अर्थपुरवठय़ाच्या योजनेत पुन्हा नवीन कर्जाची व्यवस्था आवश्यक आहे.
 • त्यातील पैसा बँक ऑफ चायनाला देऊन  ग्रोसव्हेनर हाऊस सोडवावे लागेल. उर्वरित पैसे रॉय व दोन अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी सेबीकडे अनामत ठेवावे लागतील.  
 • तीन हॉटेल्स बँकांनी २०१०-१२ मध्ये १.५५ अब्ज डॉलर्स मूल्यांकन करून ताब्यात घेतली होती. सहारा समूह व सेबी यांच्यात कायदेशीर लढाई सुरू असून सहारा समूहाने गुंतवणूकदारांकडून २४ हजार कोटी जमवले होते व त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी ९५ टक्के रक्कम परत केली आहे.

इसिसचे नियतकालिक अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी
 • इसिस या जिहादी संघटनेचे इंग्रजी भाषेतील प्रचारकी नियतकालिक ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन रिटेलर कंपनीने काही काळ विकायला ठेवले होते. इसिसच्या ‘दाबिक’ या नियतकालिकाच्या चार प्रती पेपरबॅक आवृत्ती अ‍ॅमॅझॉनच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आल्या होत्या. 
 • इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली व स्पेन या देशांमधील संकेतस्थळांवर ही नियतकालिके ठेवण्यात आली होती. या नियतकालिकाची निर्मिती अल हयात मीडिया सेंटरने केली आहे. ही संस्था इसिसची प्रचारकी व्हिडिओ व वार्तापत्रेही तयार करते. 
 • इस्लामिक स्टेट ही इंग्लंड, भारत, अमेरिका या देशांमध्ये प्रतिबंधित संस्था आहे. दाबिक हे नियतकालिक जिहाद, इसिसच्या लढाईची छायाचित्रे, चालू घडामोडी यावर लेख प्रसिद्ध करते, त्याची किंमत २७ पौंड आहे. 
 • दाबिक हे सीरियातील एक गाव असून त्याचे नाव या नियतकालिकाला ठेवले असून ते २०१४ पासून सुरू करण्यात आले आहे. 
 • अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर प्रकाशकाचे नाव 'क्रिएट स्पेस इंडिपेन्डंट पब्लिशिंग प्लॅटफॉर्म' असे आहे, पण ती अ‍ॅमॅझॉनची प्रकाशन संस्था असल्याने गोंधळ निर्माण झाला. आता हे नियतकालिक विक्रीस उपलब्ध नाही असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.

मॅगीप्रकरणी नेस्लेविरोधात ग्राहक आयोगाकडे तक्रार
 • मॅगी नूडल्सप्रकरणी केंद्र सरकारने नेस्ले इंडिया कंपनीविरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली असून, या कंपनीने व्यापार मानके पाळली नाहीत व चुकीच्या जाहिराती केल्या असे त्यात म्हटले आहे. एखाद्या कंपनीविरोधात या संस्थेकडे तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ असून आता नेस्ले इंडियावर आर्थिक दंडात्मक व इतर कारवाई होऊ शकते. 
 • मॅगीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घालण्यात आली असून त्यात मोनो सोडियम ग्लुटामेट व शिसे यांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. 
 • एफएसएसएआय या अन्न नियंत्रक संस्थेने नेस्ले कंपनीला त्यांची मॅगीची नऊ उत्पादने माघारी घेण्यास सांगितले होते. ती माघारी घेण्यात आली. 
 • भारतीय ग्राहक कामकाज खात्याच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यात नेस्लेने व्यापारी गैरप्रकार केले व जाहिरातीत दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. 
 • आतापर्यंत दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, आसाम, बिहार, मध्य प्रदेश, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, गुजरात, उत्तराखंड व गोवा राज्यात मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे.

एका तासात लावली ५० हजार झाडे
 • नुकताच साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यामध्ये भूतान सारख्या छोट्याशा देशाने जगापुढे एक आदर्श ठेवला आहे. 
 • या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भूतानमधील १०० नागरिकांनी एका तासात तब्बल ४९ हजार ६७२ झाडे लावली. त्यांच्या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
 • भूतानचे चौथे राजे जिगमे सिंग्ये वांगचूक हे स्वत: पर्यावरणप्रेमी आहेत. या चिमुकल्या देशातील ७५ टक्क्यांहून जास्त भूभाग वनांनी व्यापलेला आहे. भूतानच्या राज्यघटनेनुसार देशातील ६० टक्के जमिनीवर वने असणे बंधनकारक आहे. 
 • अशा पर्यावरणप्रेमी राजाचा ६०वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भूतनाच्या कृषी आणि वनविभागाने आणि 'पिक्सा' या संस्थेने या विश्वविक्रमी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
 • याआधी आसाममध्ये १०० व्यक्तींनी एका तासात ४० हजार ८८५ झाडे लावली होती.

सीरिया, इराकमध्ये ‘इसिस’ची पीछेहाट
 • इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना ईशान्य सीरियामधील हसकाह शहरामधून हुसकाविण्यात सीरियाच्या सैन्याला यश आले आहे. या भागामधील मोठा भूप्रदेशही ‘इसिस’च्या तावडीमधून मुक्त करण्यात आला आहे. ‘इसिस’च्या तळांवर सीरियाचे हवाई दल मोठ्या संख्येने हल्ले करत असून, यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. 
 • इराकमध्येही बैजी या महत्त्वाच्या शहराच्या नियंत्रणासाठी लढत असलेल्या इराकी सैन्याने ‘इसिस’ची काही प्रमाणात पीछेहाट केली आहे. यामुळे बैजी शहरावर काही प्रमाणात इराकचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. आता बैजी तेल शुद्धीकरण प्रकल्पातून दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी सैन्य प्रयत्नशील आहे. 
 • बगदादच्या उत्तरेकडील भागामधून ‘इसिस’ची पीछेहाट झाली असली तरी, या दहशतवादी संघटनेचा पश्‍चिम इराकमधील प्रभाव अद्याप कायम आहे.

स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने फ्रेंच ओपन २०१५ जिंकली
  Stanislas Wawrinka
 • जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पहिले विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. स्टॅनिसलॉस वॉवरिन्का या स्विस खेळाडूने त्याच्यावर ४-६, ६-४, ६-३, ६-४ असा विजय मिळवत प्रथमच ही स्पर्धा जिंकली. 
 • अतिशय उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत वॉवरिन्काने पहिला सेट गमावल्यानंतर सर्व्हिस व परतीचे फटके यावर सुरेख नियंत्रण मिळवत विजयश्री खेचून आणली. ग्रँड स्लॅम स्पर्धेत त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते. 
 • जोकोव्हिचने कारकिर्दीत आतापर्यंत आठ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत, मात्र फ्रेंच स्पर्धेत याआधी दोन वेळा अंतिम फेरीत स्थान मिळूनही अजिंक्यपदापासून तो वंचित राहिला होता. 
 • जोकोव्हिचने अंतिम फेरीत स्थान मिळवण्यापूवी राफेल नदाल व अँडी मरे या तुल्यबळ खेळाडूंवर मात केली होती, तर वॉवरिन्काने माजी विजेत्या रॉजर फेडररला हरवले होते.
 महिला दुहेरीत बी. मॅटेक सँड आणि साफारोव्हा विजयी
 • महिला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या ल्युसी साफारोव्हाने दुहेरीत जेतेपदाला गवसणी घालताना पहिले ग्रँड स्लॅम जिंकेले महिला दुहेरीत बी. मॅटेक सँड आणि साफारोव्हा यांनी बाजी मारली. 
 • सँड-साफारोव्हा या ७व्या मानांकित जोडीने पहिला सेट गमावल्यानंतरही या जोडीने दमदार खेळाचा नजराणा सादर केला. या दोघींनी आक्रमक खेळ करताना कॅसी डेल्लाक्युआ आणि यारोस्लावा श्वेदोव्हा यांच्यावर ३-६, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.

टिंटू लुकाचे सोनेरी यश
 • ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू पी. टी. उषा यांची शिष्या टिंटू लुका हिने ८०० मीटर धावण्याची शर्यत जिंकून वरिष्ठ आशियाई मैदानी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. टिंटू या २६ वर्षीय खेळाडूने कारकीर्दीतील वैयक्तिक शर्यतीत पहिलेच विजेतेपद मिळविले आहे. 
 • तिने मिळविलेल्या सुवर्णपदकांसह भारताने चार सुवर्ण, पाच रौप्य व चार कांस्यपदके अशी एकूण तेरा पदके मिळवीत पदकतालिकेत तिसरे स्थान मिळविले. चीन संघाने १५ सुवर्ण, तेरा रौप्य व तेरा कांस्य अशी एकूण ४१ पदके मिळवीत प्रथम स्थान मिळविले. कतारने सात सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी एकूण दहा पदके मिळवीत दुसरा क्रमांक पटकाविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा