चालू घडामोडी - १० जून २०१५


इस्रोला अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेचा पुरस्कार
    Indian_Space_Research_Organisation_Logo
  • भारताच्या अत्यल्प खर्चात यशस्वीपणे पार पडलेल्या मंगळमोहिम प्रकल्पास अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेचा (एनएसएस) २०१५ च्या ‘स्पेस पायोनिअर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. 
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) विज्ञान आणि अभियांत्रिकी गटातील २०१५ चा ‘स्पेस पायोनिअर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. कॅनडातील टोरांटोमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेच्या ३४व्या वार्षिक परिषदेत हा पुरस्कार इस्रोला प्रदान करण्यात आला. 
  • पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहिम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात एनएसएसने म्हटले आहे. रशिया, अमेरिका, युरोप या देशांना मागे टाकत इस्रोने मागील वर्षी पहिल्याच प्रयत्नात अत्यल्प खर्चात मंगळयान मोहिम यशस्वी करून दाखविली आहे.
  • ‘इस्रो’ला २००९ मध्येही ‘चांद्रयान १’च्या यशाबद्दल नॅशनल स्पेस सोसायटीकडून हा पुरस्कार प्राप्त झाला होता.

‘एनसीआर’मध्ये तीन नव्या जिल्ह्यांचा समावेश
  • नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये (एनसीआर) नव्या तीन जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफरनगर आणि हरियाना राज्यातील जिंद आणि कर्नाल या तीन जिल्ह्यांचा समावेश एनसीआरमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केली. 
  • एनसीआर नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. मथुरेचा एनसीआरमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत असल्याचेही नायडू यांनी सांगितले.

‘युनितार’च्या प्रमुखपदी निखिल सेठ यांची नियुक्ती
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (युनितार) प्रमुखपदावर निखिल सेठ या वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी त्यांची या संस्थेच्या कार्यकारी संचालकपदावर नियुक्ती केली आहे. 
  • सेठ हे सध्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाचे संचालक आहेत. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ३५ वर्षे नागरी सेवेचा अनुभव आहे. 
  • ‘युनितार’ या संस्थेतर्फे दरवर्षी जगभरात राबविल्या जाणाऱ्या विविध विकास आणि संशोधन कार्यक्रमांद्वारे जवळपास २५ हजार जणांना लाभ होतो.

‘ऑपरेशन म्यानमार‘
  • मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने प्रथमच आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडत म्यानमारमध्ये दहशतवाद्यांविरोधात प्रखर कारवाई केली. 
  • अत्यंत सफाईदारपणे केलेल्या या कारवाईत २० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. भारत व म्यानमार या दोन्ही देशांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईत दहशतवाद्यांचे दोन तळ नष्ट करण्यात आले. कारवाई होताच भारतीय जवान सुखरूपपणे परतले.
  • मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये १८ भारतीय जवानांना वीरमरण आले होते व अन्य १५ जण जखमी झाले होते. ईशान्य भारतातील गेल्या काही दशकांमधील हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

‘ईडीयू-आरएएनडी २०१५’ अहवालात आयआयटी दिल्लीला पहिला क्रमांक
  • ‘ईडीयू-आरएएनडी २०१५’ अहवालात देशातील सर्वोत्तम सरकारी महाविद्यालयांची व सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • या अहवालात देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आयआयटी दिल्लीला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. दुसऱ्या स्थानावर आयआयटी खरगपूर आहे. त्यापाठोपाठ आयआयटी मुंबई, आयआयटी चेन्नई, आयआयटी गुवाहाटी आणि आयआयटी कानपूरचा क्रमांक लागतो.
  • या यादीत सर्वोत्तम सरकारी महाविद्यालयांमध्ये कोलकता येथील जाधवपूर विद्यापीठ आघाडीवर आहे. तर खासगी महाविद्यालयांमध्ये ‘बीआयटीएस पिलानी’ प्रथम स्थानी आहे.
  • उच्च शिक्षणाबाबतचे ‘ईडीयू’ ही संकेतस्थळ आणि अमेरिकेतील आरएएनडी कार्पोरेशनने केलेल्या पाहणीवर हा अहवाल आधारित आहे. या पाहणीमध्ये महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्यांची संख्या, संशोधनाची उत्पादकता, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी असलेली विद्यार्थ्यांची मागणी आदी मुद्द्यांच्या आधारे देशभरातील महाविद्यालयांना गुण देण्यात आले आहेत.

शाहरुख खानकडून कॅरेबियन टी-२० संघाची खरेदी
  • बॉलिवूड सुपरस्टार व आयपीएलमधील कोलकता नाईट रायडर्स संघाचा सहमालक शाहरुख खान याने कॅरेबियन प्रिमियर लीगमधील त्रिनिदाद अँड टोबॅगो या संघाची अन्य दोघांच्या साथीने खरेदी केली आहे.
  • शाहरुख खानने हॉलिवूड अभिनेता मार्क वाल्बर्ग आणि जेरार्ड बटलर यांच्या साथीने या संघाची मालकी मिळविली आहे. शाहरुख हा सध्या कोलकता नाईट रायडर्सचा अभिनेत्री जुही चावला व तिचा पती जय मेहता याच्यासह सहमालक आहे. 
  • कॅरेबियन प्रिमियर लीग वेस्टइंडीजमध्ये प्रसिद्ध असून, या स्पर्धेत वेस्टइंडीजसह अनेक परदेशी खेळाडू खेळतात. या लीगच्या तिसऱ्या मोसमास २० जूनपासून सुरवात होत असून, मालिका २६ जुलैपर्यंत खेळविण्यात येणार आहे.
  • वल्बर्ग आणि बटलर यांच्याकडे यापूर्वीच कॅरेबियन प्रिमियर लीगमधील संघांची सहमालकी आहे. वेल्बर्ग यांच्याकडे बार्बाडोस ट्रेन्डन्ट आणि बटलर यांच्याकडे ख्रिस गेलच्या नेतृत्वाखाली जमैका तलावा संघाची सहमालकी आहे.

लष्कराच्या वेतनासाठी ‘पीएनबी’सोबत करार
    PNB-Punjab-National-Bank
  • भारतीय लष्कर आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांच्यात लष्करी वेतन खाते उघडण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. लष्करी खात्यातील लोकांना वैयक्तिक अपघातानंतरदेखील विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
  • जवान, निवृत्तिवेतनधारक व त्यांच्या कुटूबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. 
  • यापूर्वीदेखील वर्ष २०११ मध्ये भारतीय लष्कराचा पंजाब नॅशनल बँकेसोबत तीन वर्षांचा करार झाला होता. आता नवीन करारात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाची रक्कम दोन लाख आणि पाच लाख करण्यात आली आहे. आधी ही रक्कम ५०००० आणि दोन लाख होती. तसेच लष्करी ऑपरेशनच्या वेळी जवानांना मृत्यू आल्यास विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
  • तसेच आधीच्या करारातील मुळ सुविधा कायम ठेवण्यात आल्या आहेत. यात ड्राफ्ट, चेक बुक, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट प्रणाली (आरटीजीएस) किंवा नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (एनईएफटी)च्या माध्यमातून कोणत्याही बँकेत ट्रान्सफर, एटीएम कार्डसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. पीएनबीच्या ६५०० शाखांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

‘गुगल’नंतर चीनचीही स्वयंचलित कार
  • गुगलच्या बहुचर्चित चालकरहित स्वयंचलित मोटारीशी स्पर्धा करण्यासाठी चीनही सरसावले आहे. चीनमधील ‘बैदू’ ही कंपनी अशाप्रकारची मोटार विकसित करत आहे. विशेष म्हणजे गुगलच्या तुलनेत या मोटारीमध्ये अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
  • ‘बैदू’ ही चीनमधील वेब सेवा देणारी कंपनी आहे. एका ऍटोमोबाईल कंपनीच्या सहाय्याने ‘बैदू’ स्वयंचलित मोटार तयार करत आहे. ही मोटार संगणकाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल तसेच त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) असल्याचा दावाही करण्यात आला आहे. ‘बैदू’ने यापूर्वी बीएमडब्ल्यूच्या सहकार्याने सेमी ऍटोनोमस तंत्रज्ञान असलेली मोटार विकसित केली होती.

जितेंद्र सिंह तोमर यांचा राजीनामा मंजूर
  • बनावट पदवी प्रकरणात दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांनी कायदा मंत्र्यांच्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तोमर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या राजीनाम्याला उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.
  • तोमर यांना घेऊन दिल्ली पोलिस सध्या लखनऊला पोहोचली आहे. येथुन त्यांना फैजाबाद नेण्यात येईल आणि तेथे बनावट पदवी प्रकरणाची चौकशी होईल.
  • तोमर सध्या चार दिवस पोलिसांच्या ताब्यात आहेत. या चार दिवसांतच पोलिस चौकशीसाठी त्यांना फैजाबाद, भागलपुर, मुंगेर आणि बुंदेलखंडला घेऊन जाऊ शकते.
  •  याआधीच जितेंद्र सिंह तोमर यांनी कायदा मंत्र्यांच्या पदावरुन राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तोमर यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

येमेनी नागरिकाचा ओबामांविरुद्ध खटला
  • अमेरिकेने २०१२ मध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात आपले दोन नातेवाईक गमावलेल्या येमेनच्या एका व्यक्तीने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, तत्कालीन संरक्षणमंत्री लिऑन पॅनेट्टा आणि सीआयएचे प्रमुख डेव्हिड पॅट्रॉस यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. 
  • अमेरिकेने २९ ऑगस्ट २०१२ ला केलेल्या ड्रोन हल्ल्यात फैझल बिन अली जाबेर या नागरिकाच्या मेहुण्याचा आणि भाच्याचा जीव गेला होता. फैझलच्या वतीने एका मानवाधिकार संघटनेने वॉशिंग्टनमधील न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.

इजिप्तमध्ये ११ जणांना मृत्युदंड
  • दोन वर्षांपूर्वी फुटबॉल सामन्यावेळी झालेल्या हिंसेप्रकरणी कैरो येथील न्यायालयाने ११ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. फुटबॉल सामन्यावेळी झालेल्या या हिंसेत ७० चाहत्यांचा मृत्यू झाला होता, तर एक हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. 
  • या प्रकरणाची सुनावणी दूरचित्रवाणीवर थेट प्रसारित करण्यात आली होती. इतर दोषींपैकी १० जणांना १५ वर्षे, १४ जणांना १० वर्षे आणि १५ जणांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

नेपाळच्या नव्या राज्यघटनेबाबतच्या कराराला मान्यता
  • नेपाळची आठ प्रांतांमध्ये विभागणी करण्याची तरतूद असलेल्या नव्या राज्यघटनेबाबतच्या कराराला नेपाळमधील सर्व पक्षांनी एकत्र येत मान्यता दिली. 
  • यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नव्या राज्यघटनेबाबत सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. नेपाळला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनंतर राजकीय दबाव वाढल्याने या प्रक्रियेला वेग आला होता.
  • नेपाळच्या संसद सदस्यांनी २००८ पासूनच नवी राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू केले होते. मात्र, इतक्या वर्षांत एकदाही सर्व पक्षांचे त्यावर एकमत होत नव्हते. 
  • मात्र, दीड महिन्यापूर्वी आलेल्या भूकंपानंतर सर्व राजकीय पक्षांना एकत्र येत काम करण्याची गजर भासल्याने हा करार झाला. माओवादी पक्षाने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यावर आणि नेपाळला आठ प्रांतांमध्ये विभागण्यावर जोर दिला होता. संभाव्य प्रांतांच्या सीमेबाबत मात्र अद्यापही एकमत झालेले नाही.

कर्नाटकमध्ये ‘एस्मा’
  • तत्काळ सेवेची गरज असताना आडकाठी आणणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी अत्यावश्यक सेवा कायदा (इसेन्शियल सर्व्हिसेस मेन्टेनन्स ऍक्ट-एस्मा) जारी करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला. 
  • अत्यावश्यक सेवा विधेयक २०१३ मध्ये विधिमंडळात दोन्ही सभागृहांत मंजूर झाले होते. दोन वर्षांनंतर २८ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विधेयकाला मंजुरी दिल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले. 
  • या कायद्याचा वापर सरकारकडून अनिवार्यतेवेळीच होईल. सरकारचे अस्त्र म्हणून ते राखून ठेवले जाईल. याबाबतची अधिसूचना जारी झाल्यानंतर वर्षभर ती लागू असेल. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत कायद्याची मुदत वाढविता येणार आहे.
इसेन्शियल सर्व्हिसेस मेन्टेनन्स ऍक्ट (एस्मा)
  • अत्यावश्यक कायद्यात केलेल्या तरतुदींनुसार संप करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. पोलिसांकडून संपावर गेलेल्यांना वॉरंटविना अटक करता येते. 
  • पाणी, ऊर्जा, आरोग्य, वाहतूक यांसह काही सेवा ‘अत्यावश्यक’ समजल्या जातात. या सेवांमध्ये अडथळा आल्यास त्याचा परिणाम सामान्य जनतेवर होतो. त्यावर नियंत्रणासाठी ‘एस्मा’ कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यांतर्गत संपावर जाणाऱ्यांना एक वर्ष कारावास किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी देता येतात. 
  • संप करण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांविरुद्धही कायदेशीर कारवाई होईल. 

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान
  • पुण्यातील भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने जाहीर केले. 
  • आगामी तीन वर्षांसाठी या संस्थेच्या २७ जणांच्या कार्यकारिणीचीही फेररचना करण्यात आली असून, त्यात विख्यात निर्माता-दिग्दर्शक राजू हिरानी व अभिनेत्री विद्या बालन यांच्यासह राहुल सोलापूरकर, पल्लवी जोशी, अनघा घैसास आदी मराठी नावांचाही समावेश आहे. 
  • याशिवाय चित्रपट, नाट्य, पत्रकारिता, शिक्षण, ललितकला, लोककला आदी क्षेत्रांतील व्यक्ती व सरकारी अधिकाऱ्यांचीही कार्यकारी मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसारभारतीचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे, पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, मंत्रालयाचे संयुक्त सचिव व विशेष अधिकारी चैतन्य प्रसाद, मुंबईच्या फिल्म डिव्हिजनचे महासंचालक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नियुक्ती कार्यकारिणीवर करण्यात आली आहे.

दक्षिण चिनी समुद्रात जपान आणि फिलीपीन्सचा संयुक्त सराव
  • दक्षिण चिनी समुद्रात चीन आक्रमक धोरण राबवित असल्याने त्यांना शह देण्यासाठी जपान आणि फिलीपीन्स याच भागात संयुक्त नौदल सराव करणार आहेत. २२ ते २६ जून या तारखांदरम्यान होणारा हा या वर्षातील दुसरा नौदल सराव असणार आहे. 
  • या सरावादरम्यान दोन्ही देशांचे नौदल नव्या तंत्रज्ञानाची आदानप्रदान करणार आहेत.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग विजयी
  • पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. शरीफ यांचा पक्ष २४ पैकी १४ जागांवर विजयी झाला आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी त्यांचे २७२ उमेदवार उभे केले होते. 
  • भारताने मात्र येथील निवडणुकीस तीव्र आक्षेप घेतला असून, पाकिस्तानचे हे कृत्य राजकीय छळवणुकीचा प्रकार असून ही निवडणूक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. 
  • पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. माजी मुख्यमंत्री मेहदी शाह यांच्या पक्षालाही या निवडणुकीत अपयश आले. 
  • इम्रान खान यांचा ‘तेहरिके इन्साफ’ हा पक्षदेखील या निवडणुकीत म्हणावे तसे मिळवू शकलेला नाही. माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचा ‘ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग’ या पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

बांगलादेशच्या सीआयडीला गुजरातमध्ये प्रशिक्षण
  • बांगलादेशच्या केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीआयडी) विशेष पोलिस पथकाच्या सहा अधिकाऱ्यांना गुजरातमधील गांधीनगरच्या न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात (जीएफएसयू) १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
  • या सहा अधिकाऱ्यांना विशेष क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांगलादेशमध्ये अन्वेषण विभाग हा दहशतवाद, खून आणि अन्य प्रकारच्या गंभीर खूनाचा तपास करतो. बांगलादेशमधील १६ अधिकाऱ्यांना तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचे प्रशिक्षण जीएफएसयूने दिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा