चालू घडामोडी - ४ जुलै २०१५


यूपीएससी २०१४ परीक्षेत ईरा सिंघल देशात पहिली
    Ira Singhal
  • केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ४ जुलै रोजी जाहीर झाला असून, पहिल्या पाच उत्तीर्णांमध्ये चार मुलींचा समावेश आहे. 
  • यूपीएससीमध्ये मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारत, पहिल्या चार स्थानांवर स्थान मिळविले आहे. ईरा सिंघल, रेणू राज, निधी गुप्ता आणि वंदना राव यांनी अनुक्रमे पहिले चारही क्रमांक पटकाविले आहेत. तर, सुहर्षा मिश्रा हा विद्यार्थी पाचव्या स्थानावर आला आहे.
  • यूपीएससीमध्ये यंदा १२३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातून ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याबरोबरच २५४ जणांची राखीव यादी जाहीर करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्रातून अबोली नरवणे हिने पहिला क्रमांक पटकावला असून देशात ती ७८व्या क्रमांकावर आहे.
  • यूपीएससी परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशी तीन प्रकारे घेतली जाते. या परीक्षेतून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आयएफएस सेवेसाठी निवडले जातात.

‘सोलर इम्पल्स-२’चा विश्वविक्रम
    Bertrand Piccard and Andre Borschberg
  • सौरऊर्जेवर चाललेल्या विमानाने (सोलर इम्पल्स-२) जग प्रदक्षिणा करताना नवा विश्वविक्रम नोंदला आहे. अत्याधुनिक विज्ञानाचा हा नवा आविष्कार स्वित्झर्लंडमधील आंद्रे बोर्शबर्ग आणि बर्ट्रांड पिकार्ड यांनी जगापुढे आणला आहे.
  • सर्वांत मोठा सलग एकल विमान प्रवास अशी नवी नोंद या दोन संशोधकांनी केली आहे.
  • अबूधाबीमधून ९ मार्चला 'सोलर इम्पल्स'ची ही मोहीम सुरू झाली. सातव्या टप्प्यात ते जपानमधून २९ जून रोजी आकाशात झेपावले होते. 
  • जपानमधून उड्डाण केल्यानंतर ११८ तास प्रवास करून ‘सोलर इंपल्स-२’ हे विमान ५ जुलै रोजी अमेरिकेतील हवाई येथे उतरले. 
  • सुमारे ८ हजार किलोमीटरपेक्षाही अधिक अंतराचा ‘सोलर इंपल्स-२’च्या प्रवासातील सर्वांत अवघड टप्पा वैमानिक आंद्रे बोर्शबर्ग यांनी पूर्ण केला आणि जगात सर्वाधिक काळ एकट्याने विमान चालविण्याचा विक्रम बोर्शबर्ग यांच्या नावावर जमा झाला.
  • अमेरिकेतील धाडसी वैमानिक स्टीव्ह फोसेट यांच्या नावावर असलेला ७६ तास आणि ४५ मिनिटे न थांबता एकट्याने विमान उड्डाणाचा विक्रम बोर्शबर्ग यांनी मोडीत काढला. 
  • सोलर इम्पल्सबद्दल अधिक माहिती येथे वाचा. 

एअरबस, महिंद्रा लष्करासाठी बनविणार हेलिकॉप्टर
    Airbus logo
  • एअरबस हेलिकॉप्टर्स आणि महिंद्रा डिफेन्स यांनी भागीदारी करून भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर्स बनविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारत सरकारने हाती घेतलेल्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा संयुक्त उद्यम सुरू करण्यात येणार आहे.
  • लष्करासाठी हेलिकॉप्टर बनविणारा हा पहिलाच खाजगी भागीदारीतला उद्यम ठरणार आहे. हा उद्यम भारतीय लष्करासाठी टेहळणी आणि नौदलाच्या वापरासाठीच्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहे.
  • नौदलासाठी दोन प्रकारची हेलिकॉप्टर्स कंपनी बनविणार आहे. नियमित वापराचे हेलिकॉप्टर आणि बहुउपयोगी हेलिकॉप्टर असे त्यांचे प्रकार आहेत.
  • या भागीदारीतून हेलिकॉप्टरसाठी पूर्णत: देशी बनावटीची औद्योगिक व्यवस्था निर्माण करण्यात येणार असून, या संयुक्त उपक्रमातून भारतीय लष्कराला भारतातच बनविलेले हेलिकॉप्टर्स पुरविले जातील.

बीएसएनएलची ‘मोबाईल वॉलेट’ सेवा
    BSNL Logo
  • भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या प्रिपेड कार्डधारकांच्या सोयीसाठी ‘मोबाईल वॉलेट’ सेवा सुरू केली आहे. रकमेचे हस्तांतरण, विविध सेवांची देयके अदा करण्यासाठी या वॉलेट चा उपयोग करता येणार आहे. तसेच त्याद्वारे एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची सोयही उपलब्ध होणार आहे. 
  • ‘स्पीड पे’ नावाच्या या नव्या सेवेद्वारे ग्राहकाचे बॅंक खाते नसतानाही ते आपला मोबाईल रिचार्ज करू शकतील. मोबाईल वॉलेटमधील पैसे कोणत्याही बॅंकेच्या खात्यात हस्तांतरित करता येणार आहेत. 
  • तसेच बीएसएनएलच्या आउटलेटमधूनही हे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले आहे.
  •  ‘मोबाईल वॉलेट’ शिवाय ‘बीएसएनएल बझ’ नावाची मनोरंजनाची सुविधाही बीएसएनएलने सुरु केली आहे. त्याद्वारे ग्राहकांना स्मार्टफोनद्वारे दूरचित्रवाहिनीवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

मायक्रोसॉफ्टचे पुण्यात सायबर सुरक्षा केंद्र
  • मुख्यमंत्र्यांनी सिऍटलमधील मायक्रोसॉफ्टच्या सायबर क्राइम सेंटरला ४ जुलै २०१५ रोजी भेट दिली. या वेळी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. 
  • लघू व मध्यम उद्योगांसाठी तंत्रज्ञानविषयक साहाय्य, क्लाउड सर्व्हिसेस, सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर या वेळी विचारविनिमय झाला.
  • मायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रात एक स्मार्ट औद्योगिक वसाहत, तसेच पुण्यात सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल व्हिलेज या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कंपनीने मान्य केले आहे.
  • मुंबईत दोन मोठी डाटा सेंटर्स उभारल्यानंतर मायक्रोसॉफ्ट आता राज्याच्या सुरक्षिततेसाठी विशेष ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सामानवाहू सोयुझ अवकाश स्थानकाकडे रवाना
  • ४ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला अन्न, पाणी आणि अन्य सुविधा पुरविण्यासाठी रशियाचे सोयुझ हे सामान वाहून नेणारे रॉकेट रवाना झाले आहे. 
  • या सामानवाहू रॉकेटमध्ये सुमारे तीन टन एवढे साहित्य आहे. सद्यस्थिती पाहता रॉकेटमधील सर्व सामग्री सुरक्षित आहे. 
  • यापूर्वी अंतराळ स्थानकास सामान पाठविण्यासाठी सोडलेले फाल्कन-९ हे रॉकेट कोसळल्याने सोयुझ हे रॉकेट सोडण्यात आले आहे. 
  • सध्या अंतराळ स्थानकात सहा अंतराळवीर असून त्यांच्याकडे केवळ चार महिने पुरेल इतकाच अन्न आणि पाणीसाठा आहे. लवकरच आणखी तीन अंतराळवीर या स्थानकाकडे रवाना होणार आहेत.

कचरावेचकांना राष्ट्रीय पुरस्कार
  • देश स्वच्छ ठेवण्यात कचरा वेचणाऱ्यांचे योगदान लक्षात घेत त्यांच्या सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ३ जुलै रोजी जाहीर केले.
  • दीड लाख रुपयांचा हा राष्ट्रीय पुरस्कार असेल. 
  • देशातील तीन सर्वोत्तम कचरा वेचक आणि कचरा वेचण्याशी संबंधित नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या तीन संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.
  • देशात दरवर्षी ६.२ कोटी टन कचरा निर्माण होतो. २०३० साली हे प्रमाण १६.५ कोटी टनांवर तर २०५० पर्यंत ४५ कोटी टनांपर्यंत जाईल. देशातील ६८ टक्के कचरा आणि घाणीवर प्रक्रिया केली जात नाही, ही चिंतेची बाब आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा