चालू घडामोडी - १२ ऑगस्ट २०१५


अर्जुन पुरस्कार

 • केरळ हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश (निवृत्त) व्ही.के. बाली यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची शिफारस केली आहे.
 • या शिफारशी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवल यांच्याकडे पाठविण्यात येतील आणि ते यावर अंतिम निर्णय घेतील. क्रीडामंत्र्यांनी या नावावर आपल्या स्वाक्षरीद्वारे शिक्कामोर्तब केल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते २९ ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
शिफारस करण्यात आलेले अर्जुन पुरस्कार विजेते
जितू राय (नेमबाजी)पी. आर. श्रीजेश (हॉकी)रोहित शर्मा (क्रिकेट)
दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक्स)अनुप कुमार (रोलरस्केटिंग)अभिलाषा म्हात्रे (कबड्डी)
मनजीत चिल्लर (कबड्डी)एम.आर. पूवम्मा (अॅथलेटिक्स)शरथ गायकवाड (पॅरासिलिंग)
सन्थोई देवी (वुशू)सतीश शिवलिंगम (वेटलिफ्टिंग)स्वर्णसिंग विर्क (रोइंग)
के. श्रीकांत (बॅडमिंटन)मनदीप जांगरा (बॉक्सिंग)बजरंग (कुस्ती)
बबिता (कुस्ती)संदीप कुमार (तिरंदाजी)

नेस्लेवर ६४० कोटींचा दावा

 • मॅगी नूडल्समध्ये जास्त प्रमाणात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट सापडल्याच्या प्रकरणी अयोग्य व्यापार पद्धती, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती या कारणास्तव स्वित्र्झलडच्या नेस्ले कंपनीकडून सरकारने ६४० कोटी रुपये भरपाई मागितली आहे.
 • सरकारने नेस्ले कंपनीवर आर्थिक दंडाशिवाय इतर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला असून लवकरच ग्राहक कामकाज मंत्रालय कंपनीच्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे.
 • देशातील ग्राहकांच्या हितासाठी केंद्र किंवा राज्य सरकार राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर तक्रार दाखल करू शकतं. ग्राहक संरक्षण कायदा १९८६च्या कलम १२ (ड) मध्ये तशी तरतूद आहे. 
 • परंतु, आतापर्यंत कोणत्याही कंपनीविरुद्ध तसा खटला दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे मॅगीवर केंद्र सरकारने दावा ठोकल्यास तो देशातील अशा प्रकारचा पहिलाच खटला ठरेल.
 • जूनमध्ये एफएसएसएआय या संस्थेने मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती व नेस्ले कंपनीने मॅगीच्या पाकिटांवरील माहितीतही नियमांचे उल्लंघन केले होते असे एफएसएसएआयने (भारतीय अन्नसुरक्षा व प्राधिकरण) म्हटले असून, त्यात चववर्धक मोनो सोडियम ग्लुटामेट व शिसे जास्त असल्याचा आक्षेप घेतला होता.

सामाजिक उपक्रमांसाठी व्हेन्चर कॅपिटल

 • सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदत मिळावी यासाठी व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्री निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.
 • सामाजिक उपक्रमांसाठी देशांतर्गत स्तरावर व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्री निर्माण करताना यातून इम्पॅक्ट फंडाला अर्थपुरवठा नियमित व्हावा असाही प्रयत्न होणार आहे.
 • प्रत्येक कंपनीने आपल्या नफ्यातील २ टक्के रक्कम अशा सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतवल्यास मोठा निधी यातून उभारला जाईल, असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला.
 • सामाजिक किंवा पर्यावरणीय परिणाम करणारे परंतु फायदेशीर असणारे उपक्रम करण्यासाठी एखाद्या संस्थेने गुंतवणूक केल्यास अशी गुंतवणूक इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखली जाते.

नेमबाज नंजप्पाचा ऑलिम्पिक प्रवेश

 • भारताचा नेमबाजपटू प्रकाश नंजप्पाला रिओ येथे २०१६ मध्ये पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. ३९ वर्षीय नंजप्पाने ५० मीटर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत ५६७ गुण नोंदविले. त्याची ही कामगिरी ऑलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण करणारी ठरली.
 • अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ५० मीटर पिस्तूल प्रकारात त्याने आठवे स्थान मिळविले. 
 • ऑलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण करणारा तो भारताचा सहावा नेमबाज आहे. भारताच्या जितू राय, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, कांस्यपदक विजेता गगन नारंग, अपूर्वी चंडेला व गुरप्रीतसिंग यांनी यापूर्वीच ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे.
 • नंजप्पाने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक मिळविले होते.
 • मात्र त्याच वर्षी ग्रेनाडा येथील जागतिक स्पर्धेत त्याला अर्धागवायूचा आजार झाला. त्याच्या चेहऱ्याचा एक भाग बधिर झाला. मात्र त्यावर उपचार घेतल्यानंतर व पुरेशा विश्रांतीनंतर तो पुन्हा नेमबाजीचा सराव करू लागला.
 • त्याने आशियाई एअर गन स्पर्धेत ५० मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक मिळविले. गतवर्षी त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक व आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.

हॉकीपटू गुरबाज सिंग नऊ महिन्यांसाठी निलंबित

 • दोनशेहून अधिक सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या हॉकीपटू गुरबाज सिंगवर गटबाजी करणे आणि संघात मतभेद निर्माण करण्याच्या कारणांसाठी नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
 • हरबिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हॉकी इंडियाच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय सुनावला असून त्यामुळे या अनुभवी मध्यरक्षकाचे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे. हरबिंदरसह माजी खेळाडू आर. पी. सिंग, ए. बी. सुब्बाइह आणि जस्जीत हंडा यांचाही समितीत सहभाग होता.
 • गत महिन्यात बेल्जियम येथे झालेल्या जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत मध्यरक्षक आणि भारताचे माजी प्रशिक्षक ज्युड फेलिक्स यांनी अहवाल तयार करून गुरबाजवर आरोप केले होते.
 • या बंदी विरोधात दाद मागण्याचा अधिकार गुरबाजला असून एका महिन्याच्या कालावधीत तो हॉकी इंडियाच्या लवादाकडे दाद मागू शकतो.
 • हे निलंबन मे २०१६ अखेपर्यंत आहे आणि त्याने या निर्णयाला आवाहन दिल्यास त्याच्यावरील बंदी उठू शकते व तो त्वरित संघात खेळू शकतो.

अवकाश स्थानकात खाण्यायोग्य भाजीचे उत्पादन

 • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील अवकाशवीरांनी अवकाश स्थानकातच यंत्राच्या मदतीने उगवलेली लाल रंगाची पालेभाजी खात असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला, अशी भाजी खाणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.
 • तसेच, यामुळे यंत्राच्या मदतीने अवकाशातच खाण्यायोग्य भाजीचे उत्पादन घेण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. 
 • अवकाश स्थानकातील स्कॉट केली, जेल लिंडग्रेन आणि किमिया यूई या अंतराळवीरांनी ही किमया केली आहे. अवकाश स्थानकातील युरोपीय अवकाश संस्थेच्या कोलंबस प्रयोगशाळेत भाजी उगविण्याचा प्रयोग केला गेला.
 • यासाठी ‘व्हेजी’ ही भाजी उगविण्याची यंत्रणा विकसित केली गेली. अत्यंत नियंत्रित वातावरणात या भाजीची वाढ करण्यात आली. 
 • याआधीही ‘व्हेजी’मध्ये भाजीचे उत्पादन घेतले गेले असले, तरी अंतराळवीरांना आज प्रथमच ती खाण्याची ‘अधिकृत’ परवानगी देण्यात आली होती. अवकाश स्थानकातील रशियाच्या काही अंतराळवीरांनी आधी अशी भाजी खाल्ल्याची अनधिकृत माहिती आहे. 

गुजरातमध्ये आंबेडकरांचे पुस्तक अभ्यासक्रमातून बाद

  Dr. Babasaheb ambedkar
 • गुजरातमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत अभ्यासाला असलेले ‘राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 • या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
 • डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त हे पुस्तक छापण्यात आले होते. प्रख्यात विचारवंत पी.ए. परमार यांनी गुजराती भाषेत लिहिलेले हे पुस्तक राज्याच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याने अभ्यासक्रमात लागू करून ते राज्यभरातील सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरितही केले होते.
 • तथापि, या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्यामुळे हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा