चालू घडामोडी - १६ ऑगस्ट २०१५


नरेंद्र मोदी ‘यूएई’ दौऱ्यासाठी रवाना

  Narendra Modi
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑगस्ट २०१५ रोजी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यासाठी रवाना झाले झाले असून तब्बल ३४ वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान यूएईत दाखल होणार आहे. यापूर्वी १९८१ साली इंदिरा गांधी यांनी यूएई दौरा केला होता.
 • अबू धाबी विमानतळावर दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदी तेथील भारतीय कामगारांच्या छावणीला भेट देणार आहेत. यावेळी एक लाखाच्या आसपास भारतीय कामगार तेथे उपस्थित असतील. मोदी त्यांना संबोधित करणार आहेत.
 • त्यानंतर नरेंद्र मोदी यूएईमधील सर्वात मोठी मशिद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख जायद मशिदीला भेट देणार आहेत. तेथे युवराज शेख मोहम्मद बिन जायद यांच्याशी चर्चा करतील.
 • १७ ऑगस्ट रोजी मोदी दुबईला पोहोचणार असून तेथे पंतप्रधान आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेणार आहेत. जगातील सर्वात मोठी इमारत असलेल्या बुर्ज खलिफा येथेही मोदी जाणार आहेत.
 • झीरो कार्बन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसदर या हायटेक शहराचालाही मोदी भेट देणार आहेत. शेवटच्या टप्प्यात मोदी दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवरून भारतीयांना संबोधित करणार आहेत.
 • दौऱ्यात मोदी व्यापार व दहशतवाद विरोधात उपाययोजनांसदर्भात त्या देशाच्या नेत्यांशी चर्चा करतील.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला रौप्य

  Saina Nehwal
 • जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर उमटविण्याचे भारताची फुलराणी सायना नेहवालने स्वप्न अधुरे राहिले आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
 • असे असले तरी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणारी सायना पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
 • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या आणि गतविजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनने सायनाला १६-२१, १९-२१ अशा सेटमध्ये पराभूत केले.
 • या स्पर्धेत सायना आजपर्यंत सायनाने पाच वेळा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, यावेळी सायनाने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा नजराणा पेश करीत यंदाच्या स्पर्धेत थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. सायनाच्या रूपाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदा भारतीय खेळाडूने धडक मारली होती.
 • सायनाने उपांत्यफेरीत अवघ्या ४५ मिनिटांत २१-१७, २१-१७ अशा फरकाने लिंडावेनी फॅनेट्रीला धूळ चारली होती.
 • यंदाच्या वर्षांतील सायनाचा अंतिम फेरीतील सलग दुसरा पराभव आहे. याआधी ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पध्रेच्या अंतिम फेरीत कॅरोलिननेच सायनाला रौप्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले होते.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतायांची कामगिरी
सायना नेहवालरौप्यपदक२०१५
पी. व्ही. सिंधूकांस्यपदक२०१३ आणि २०१४
ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा (दुहेरी)कांस्यपदक२०११
प्रकाश पदुकोनकांस्यपदक१९८३

घरकामगारांकरिता राष्ट्रीय धोरण

 • घरकामगारांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी एनडीए सरकारने 'घरकामगारांचे राष्ट्रीय धोरण' तयार केले आहे.
 • या धोरणामुळे घरकामगारांना या सुविधांबरोबरच सामाजिक सुरक्षा मिळणार असून, लैंगिक शोषण आणि वेठबिगारीविरोधातही आवाज उठवता येणार आहे.
 • कामगार कल्याण विभागाच्या महासंचालकांनी या धोरणाचा मसुदा केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांना गेल्या आठवड्यात सुपुर्द केला असून, हे धोरण लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
 धोरणात करण्यात आलेल्या शिफारसी 
 • या धोरणाच्या मसुद्यात घरकामगारांच्या अकुशल, अर्धकुशल, कुशल आणि उच्च दर्जाचे कुशले कामगार अशा श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार किमान मासिक वेतनाची शिफारस करण्यात आली आहे.
 • पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या उच्च दर्जाच्या कुशल कामगारांना किमान नऊ हजार रुपये वेतन मिळणार.
 • कामगारांना वार्षिक १५ दिवसांची भरपगारी रजा आणि प्रसूतीरजेची शिफारसही करण्यात आली आहे.
 • घरकामगार आणि त्यांची सेवा घेणाऱ्यांमध्ये मध्यस्थी करणारी एक संस्था असेल. या तिघांमध्ये त्रिपक्षीय करार होईल आणि या कराराला कायदेशीर आधार असेल.
 • कामगारांना शिक्षणाचा अधिकार, कामावर सुरक्षित वातावरण आणि त्यांच्या दुःखांचे निवारण करण्यासाठी यंत्रणा तयार करण्याबाबत तरतुदींचा समावेश.

गुजरातमध्ये प्लास्टिकबंदी

 • स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर गुजरात राज्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी स्वातंत्र्यदिनी ट्विटरवरून जाहीर केला.
 • प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईलच, शिवाय जनावरांचेही रक्षण होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
 • राज्यातील अनेक महापालिकांनी ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. मात्र, राज्य सरकारने थेट सरसकट प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा निर्णय घेतला आहे.

अष्टविनायकांच्या दर्शनासाठी ‘भक्तमार्ग’

 • अष्टविनायकांचे दर्शन आता केवळ २४ तासांतच (एक दिवस) घेण्यासाठी ‘भक्तमार्ग’ बांधण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
 • अष्टविनायक गणपतींना जोडण्याऱ्या रस्त्यांची एकूण लांबी ६६० किलोमीटर आहे. या रस्त्याचे रुंदीकरण, दुरुस्ती, मजबुतीकरण यावर १८१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या संपूर्ण मार्गावर कुठेही टोल आकारला जाणार नाही
 • त्याचा पहिला टप्पा म्हणून मोरगाव ते सिद्धटेक दरमान्यच्या रस्त्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे काम वर्षभरात पूर्ण केले जाणार आहे.
 • मोटारीने अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी दोन दिवस लागतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे केवळ एका दिवसातच अष्टविनायकांचे दर्शन शक्य होणार आहे.
 • गणेशभक्तांचा हा प्रवास जलद, सुलभ आणि टोलमुक्त राहणार आहे, असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
 अष्टविनायक 
 • अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले.
महाराष्ट्रातील अष्टविनायक
नावेठिकाणे (जिल्हा)
श्री मयुरेश्वर अथवा मोरेश्वरमोरगाव (पुणे)
श्री चिंतामणीथेऊर (पुणे)
महागणपतीरांजणगाव (पुणे)
विघ्नेश्र्वरओझर (पुणे)
श्री गिरिजात्मकलेण्याद्री (पुणे)
श्री सिद्धिविनायकसिद्धटेक (अहमदनगर)
वरदविनायकमहड (रायगड)
श्री बल्लाळेश्वरपाली (रायगड)

अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ सचिन तेंडुलकरही व्याघ्रदूत

 • ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ आता सचिन तेंडुलकर आणि हेमा मालिनी यांनीही महाराष्ट्राच्या वन व वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर होण्याची तयारी दर्शविली आहे. 
 • राज्यातील वनपर्यटनाला चालना मिळावी यासाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान द्यावे, अशी विनंती केली होती.
 • बच्चन यांनी १० ऑगस्टला व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला होता. आता सचिनचाही यास होकार आला आहे.
 • याशिवाय हेमा मालिनी राष्ट्रीय पक्षी मोर याची ब्रॅंड ऍम्बेसेडर होण्यास उत्सुक असल्याची माहिती देण्यात आली.
 • महाराष्ट्र वनमंत्री : सुधीर मुनगंटीवार

आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची घोषणा

 • प्रशासकीय सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत व्हावी यासाठी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची घोषणा स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर केली.
 • पाच नव्या जिल्ह्यांमध्ये बिस्वनाथ, चारायदेव, होजाय, दक्षिण सालमारा-मनकाचार आणि पश्चिम कारबी यांचा समावेश आहे. सध्या आसाममध्ये २७ जिल्हे आहेत.
 • आसाम राज्य सरकारने जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण केले असून त्यामुळे विकासाच्या दृष्टीने अधिक सविस्तर काम करता येणार आहे.

पाकिस्तानातील पंजाबच्या गृहमंत्र्यांचा मानवी बॉम्बहल्ल्यात मृत्यू

 • पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानजादा यांच्यासह आठ जणांचा मानवी बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला. शुजा यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली.
 • घडविण्यात आलेला स्फोट हा इतका तीव्र होता की कार्यालयाचे छत कोसळले आणि यामध्ये शुजा यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला, तर ढिगाऱयाखाली अजूनही अनेक जण अडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
 • स्फोटाची तीव्रता इतकी होती की परिसरातील इमारतींच्या तावदानांनाही तडे गेले आहेत. गृहमंत्री शुजा खानजादा यांची सहकाऱ्यांसोबत बैठक सुरू असताना एका अज्ञाताने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी रोखल्यानंतर त्याने स्वत:जवळील स्फोटके उडवून दिली.

आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल यांचे निधन

 • पाकिस्तानचे कट्टर इस्लामवादी जनरल आणि आयएसआयचे (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स) माजी प्रमुख हमीद गुल (वय ७८) यांचे निधन झाले. गुल हे १९८७ ते १९८९ या काळात आयएसआयचे प्रमुख होते.
 • मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्यासह अनेक अतिरेक्यांबरोबर त्यांनी विविध मंचांवर हजेरी लावली होती. 
 • अमेरिकेने अफगाणिस्तानात सोविएत फौजा असताना जिहादला प्रोत्साहन दिले होते, त्या वेळी गुल यांनी जिहादला मदतच केली.
 • ते कट्टर इस्लामी विचारांचे होते आणि काश्मीर तसेच पंजाबमधील अतिरेकी गटांना त्यांनी ८०-९० च्या काळात गुप्तपणे मदत केली होती.
 • गुल १९५८ मध्ये पाकिस्तानी लष्करात १९ लान्सर्स या तुकडीत प्रथम दाखल झाले व ते १९६५ च्या भारत-पाक युद्धात चाविंडा आघाडीवर रणगाडा कमांडर होते.
 • १९७२ ते ७६ या काळात त्यांनी जनरल झिया उल हक यांच्या काळात बटालियन कमांडर म्हणून काम केले. गुल हे काश्मीर व अफगाणिस्तानात जिहादी गटाचे सक्रिय समर्थक होते.

No comments:

Post a Comment