चालू घडामोडी - २५ ऑगस्ट २०१५


धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर

    Our Census - Our Future (Census 2011)
  • देशाच्या धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर झाला असून देशात हिंदूंच्या लोकसंख्येत घट झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. तर मुस्लिम लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
  • एकूण लोकसंख्येपैकी देशात हिंदूंची लोकसंख्या ९६ कोटी ६३ लाख इतकी असून, देशात १७ कोटी २२ लाख मुस्लीम नागरिक आहेत. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशाची लोकसंख्या १२१ कोटी ९ लाखांच्या घरात गेली आहे.
  • अहवालानूसार, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंचे प्रमाण ०.७ टक्क्यांनी घटल्याचे व मुस्लीमांचे ०.८ टक्क्यांनी वाढले आहे. शिखांचे लोकसंख्येतील प्रमाण ०.२ टक्क्यांनी तर बौद्धांचे ०.१ टक्क्यांनी घटले असून जैन व ख्रिश्चनांच्या लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाणात फारसा बदल झालेला नाही.
धर्मनिहाय जनगणना अहवाल २०११
धर्मलोकसंख्यालोकसंख्येतील प्रमाणदशवार्षिक वाढ
हिंदू९६ कोटी ६३ लाख७९.८ टक्के१६.८ टक्के
मुस्लीम१७ कोटी २२ लाख१४.२ टक्के२४.६ टक्के
ख्रिस्ती२ कोटी ७८ लाख२.३ टक्के१५.५ टक्के
शीख२ कोटी ८ लाख१.७ टक्के८.६ टक्के
बौद्ध८४ लाख०.७ टक्के६.१ टक्के
जैन४५ लाख०.४ टक्के५.४ टक्के
अन्य धर्म आणि पंथ७९ लाख०.७ टक्के-
धर्म जाहीर न केलेले नागरिक२९ लाख०.२ टक्के-
एकूण१२१.०९ कोटी१०० टक्के१७.७ टक्के

महाराष्ट्रातील स्थिती
धर्मलोकसंख्यालोकसंख्येतील प्रमाण
हिंदू८ कोटी ९७ लाख७९.८ टक्के
मुस्लीम१ कोटी २९ लाख११.५४ टक्के
ख्रिस्ती१० लाख ८० हजार०.९६ टक्के
शीख२ लाख २३ हजार०.१९ टक्के
बौद्ध६५ लाख ३१ हजार५.८१ टक्के
जैन१४ लाख१.२४ टक्के
अन्य धर्म आणि पंथ१ लाख ७८ हजार०.१५ टक्के
धर्म जाहीर न केलेले नागरिक२ लाख ८६ हजार०.२५ टक्के
एकूण११ कोटी २४ लाख१०० टक्के

‘द्रोणाचार्य‘ पुरस्कारासाठी पाच जणांची निवड

    Dronacharya Award
  • भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांमधील प्रशिक्षकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘द्रोणाचार्य‘ पुरस्कारासाठी पाच जणांची क्रीडा मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे.
  • दीपांकर भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवडलेल्या आणि सूचवलेल्या आधारे पुरस्कारांची निवड करण्यात आली.
  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने समितीच्या शिफारसी आणि चौकशीनंतर कुस्तीचे प्रशिक्षक अनुप सिंग व पॅरालिंपिक प्रशिक्षक नवल सिंग यांची २०११ ते २०१४ या कालावधीतील कामगिरी विचारात घेऊन त्यांच्या नावावर सहमती दर्शवली.
  • तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारे कुस्ती प्रशिक्षक अनुप सिंग यांनी सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, सत्यवर्त कॅडीयन, बजरंग, अमित दाहिया यांच्यासह ५८ कुस्तीपटूंना मार्गदर्शन केलेले आहे.
  • जलतरण प्रशिक्षक निहार अमीन, मुष्टियुद्ध प्रशिक्षक स्वतंत्रसिंग सिंग आणि ऍथलेटिक्स प्रशिक्षक हरबन्स सिंग यांची जीवनगौरव कॅटेगरीनुसार गेल्या २० वर्षांत त्यांनी खेळासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करता द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाली.
  • रोमियो जेम्स (हॉकी), प्रकाश मिश्रा (टेनिस) आणि टी. पी. पी. नायर (व्हॉलिबॉल) यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे क्रीडापटू घडविणाऱ्या प्रशिक्षकांसाठी १९८५पासून द्रोणाचार्य पुरस्कार सुरू करण्यात आले होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये असे द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांचे (२००२ पासून सुरुवात) स्वरूप आहे.
  • याव्यतिरिक्त वर्ष २००९ पासून राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रारंभ करण्यात आला आहे. क्रीडा विकासासाठी सरकारी व खासगी क्षेत्रातील संस्था, तसेच बिगर सरकारी संघटनांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 
  • राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार विजेत्या संस्थांना प्रमाणपत्र आणि चषक प्रदान करण्यात येईल. २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून या विजेत्यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

संजीव चतुर्वेदी यांना अखेर पदोन्नती

    Sanjiv Chaturvedi
  • भारतीय वन खात्याचे आयएफएस अधिकारी व मॅगसेसे पुरस्कार विजेते संजीव चतुर्वेदी यांना बढती मिळाली असून त्यांना संचालक पद देण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती.
  • चतुर्वेदी यांना गेल्या वर्षी अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावरून काढण्यात आले होते. त्या संस्थेत राजकीय नेते वैद्यकीय सुविधांचा गैरफायदा घेतात, हे प्रकरण त्यांनी उघडकीस आणले. हरियाणातही त्यांना काही पदांवरून काढण्यात आले होते, कारण तेथे त्यांनी भ्रष्टाचार उघडकीला आणला होता.
  • आता त्यांना हरियाणासरकारचे बढतीचे पत्र मिळाले असून त्यांना १ जानेवारी २०१५ पासून उपसचिव पदाऐवजी संचालक पद देण्यात आले आहे.
  • चतुर्वेदी हे २००२च्या तुकडीतील भारतीय वनसेवा अधिकारी असून त्यांना १ जानेवारीलाच पदोन्नती मिळणे अपेक्षित होते, पण त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था व हरियाणा या दोन ठिकाणी काम करत असताना भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली होती त्यामुळे त्यांची पदोन्नती रोखली होती.
  • दोन विभागीय खातेनिहाय समित्यांनीही त्यांच्या अर्जाची दखल २७ जानेवारी व १६ जूनच्या बैठकात घेतली नव्हती. त्यांच्या तुकडीतील अनेक अधिकाऱ्यांना मात्र पदोन्नती मिळाली होती.
  • चतुर्वेदी हे सध्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात उपसचिव असून  त्यांनी १९ जूनला लवादाकडे दाद मागितली होती.

जागतिक मैदानी स्पर्धेत जमैकन शेलीची 'सुवर्ण' धाव

  • जमैकाच्या शेली अ‍ॅन फ्रेसर प्रायस हिने जागतिक मैदानी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. जागतिक स्पर्धेतील तिचे हे १०० मीटर शर्यतीतील तिसरे सुवर्णपदक आहे.
  • दोन वेळा ऑलिम्पिक विजेतीचा मान पटकावणाऱ्या शेलीने १०.७६ सेकंदाची वेळ नोंदवून जमैकन उसेन बोल्टच्या पावलावर पाऊल टाकत 'सुवर्ण' धाव घेतली.
  • नेदरलँडच्या डॅफने शिपरने १०.८१ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्य, तर अमेरिकेच्या टोरी बॉवीने १०.८६ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले. 
  • शेलीने २००९ आणि २०१३ मध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. दोन वर्षांपूर्वी मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत तिने १०० व २०० मीटर शर्यतीत बाजी मारून दुहेरी धमाका केला होता.

जयललिता यांची दोन मोठ्या आरोग्य योजनांची घोषणा

  • तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी विधानसभेत ‘अम्मा मास्टर हेल्थ चेक-अप प्लॅन’ आणि महिलांसाठी ‘अम्मा विशेष मास्टर हेल्थ चेक-अप प्लॅन’ या दोन मोठ्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांची घोषणा केली आहे.
  • या दोन्ही योजनांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चालू वर्षात दहा नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • त्याचबरोबर अड्यार येथील कर्करोग संस्थेला विशेष संस्थेचा दर्जा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून त्यासाठी सुमारे १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली.

ललिता बाबरचा नवा राष्ट्रीय विक्रम

    Lalita Babar in World athletics
  • भारताची महिला धावपटू ललिता बाबरने जागतिक मैदानी स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
  • आशियाई सुवर्णपदक विजेत्या ललिताने ९ मिनिटे २७.८६ सेकंदात हे अंतर पार केले आणि स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम (९ मिनिटे ३४.१३ सेकंद) मोडीत काढला.
  • जागतिक स्पर्धेच्या स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.
  • महाराष्ट्राच्या या महिला धावपटूने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
  • या शर्यतीत टय़ुनिशियाच्या हबिबा घिरिबीने हे अंतर ९ मिनिटे २४.३८ सेकंदात पार केले. जर्मनीच्या गेसा फेलिसिटासने ९ मिनिटे २४.९२ सेकंदात ही शर्यत पूर्ण करीत दुसऱ्या क्रमांकाने अंतिम फेरीत स्थान मिळविले.

सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धा : रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स विजयी

    Roger Federer and Serena Williams
  • स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने अप्रतिम खेळ करताना नोव्हाक जोकोव्हिचवर ७-६(७/१), ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवत सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. फेडररचे सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेचे हे सातवे जेतेपद आहे. 
  • त्याचे हे कारकीर्दीतील ८७वे आणि मास्टर्स १००० स्पर्धेतील २४वे जेतेपद आहे.
  • महिला गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने जेतेपद पटकावले. सेरेनाने तिसऱ्या मानांकित सिमॉन हॅलेपचा ६-३, ७-६ (७/५) असा पराभव करून दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारली.
  • फेडररने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचवर ९० मिनिटांत विजय मिळवला. या विजयामुळे फेडररने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून जोकोव्हिच अव्वल स्थानावर कायम आहे.

पटेल समाजाचे नेतृत्व हार्दिक पटेल यांच्याकडे

  • गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत असून २२ वर्षीय हार्दिक पटेल या समाजाचे नेतृत्व करत आहे.
  • २५ ऑगस्ट रोजी अहमदाबाद येथे पटेल समाजाच्या आरक्षणासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लाखो नागरिक सहभागी झाले.
  • आरक्षण हा पटेल समाजाचा हक्क असून आम्हाला भीक म्हणून आरक्षण नको आहे, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २०१७ मध्ये गुजरातमध्ये कमळ बहरु देणार नाही असा इशारा यावेळी हार्दिक पटेल यांनी दिला आहे.
  • गेल्या १० वर्षात गुजरातमध्ये सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आता आत्महत्या झाली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही पटेल यांनी म्हटले आहे.
  • देशातील तरुण आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मागत असेल व त्याला त्याचे हक्क मिळत नसतील तर त्यातूनच नक्षलवाद जन्माला येतो असेही पटेल यांनी नमूद केले. 
  • गुजरातमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असून गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच भाजपाविरोधात एवढे मोठे आंदोलन होत आहे.

व्यापमं घोटाळ्यातील तपास सीबीआयकडे

  • मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यातील सर्व प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करेल, असे स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाने तपास संस्थेला तीन आठवड्यांच्या आत सरकारी वकील नियुक्त करण्याचे आदेश दिले.
  • दिलेल्या मुदतीत सरकारी वकिलांची नियुक्ती न झाल्यास यासंदर्भात न्यायालयीन आदेश काढण्यात येईल, असेही पीठाने स्पष्ट केले.
  • विशेष तपास पथक (एसआयटी) आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) ७८ प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले असले तरी, व्यापमं घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयलाच करावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • या प्रकरणांची संख्या आता १८५ वरून वाढून २१२ झाली आहे. सीबीआयमध्ये तपास कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. गेल्या सुनावणीतही याकडे लक्ष वेधण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा