चालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५


राष्ट्रीय शेअर बाजाराचा मॉरिशस स्टॉक एक्स्चेंजशी करार

    National Stock Exchange
  • भांडवलविषयक ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस (एसईएम) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
  • या करारांतर्गत नव्या निर्देशांकाची निर्मिती करण्याविषयी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दोन्ही भांडवल बाजार समन्वयाने यापुढे काम करणार आहेत. 
  • दोन्ही शेअर बाजार मिळून सिक्युरिटीज मार्केट्स, निर्देशांक निर्मिती आणि भांडवलविषयक नव्या योजना यांसाठी प्रशिक्षण, शिक्षण तसेच ज्ञानाचे आदानप्रदान करणार आहेत. अशा प्रयत्नामुळे दोन्ही देशांतील व्यापारविषयक संबंध अधिक दृढ होतील.
  • एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ : चित्रा रामकृष्ण
 स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस 
  • एसईएम जुलै १९८९पासून कार्यरत आहे. अल्पावधीतच या भांडवल बाजाराने चांगली उलाढाल केली आहे.
  • आज एसईएम आफ्रिकेतील महत्त्वाचे स्टॉक एक्स्चेंज आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मॉरिशस शेअर बाजाराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • बहुचलनी भांडवल उभारणी तसेच आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये ट्रेडिंग यासाठीही हा शेअर बाजार महत्त्वाचा आहे.

नौदलात महिलांना पूर्ण सेवाकाळ

    Indian Navy Logo
  • लष्कर व हवाई दलापाठोपाठ नौदलातही महिलांची पूर्ण सेवाकाळासाठी नियुक्ती करण्यास दिल्ली हायकोर्टाने परवानगी दिली आहे. यामुळे देशरक्षणाच्या तिन्ही आघाड्यांवर महिलांचे कर्तृत्व झळाळणार आहे.
  • नौदलात आत्तापर्यंत महिला अधिकाऱ्यांची कमाल १४ वर्षांसाठीच नियुक्ती होत असे. संरक्षण दलांमध्ये पेन्शनसाठी २० वर्षांच्या सेवाकाळ पूर्ततेची अट असल्याने, महिलांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.
  • याविरोधात नौदलातील १९ महिला अधिकाऱ्यांनी दिल्ली हायकोर्टाकडे दाद मागितली होती. या याचिकेत त्यांनी लष्कर व हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पूर्ण सेवाकाळ नियुक्तीकडे लक्ष वेधले होते व हा भेदाभेद संपवण्याची विनंती केली होती. त्यानंतर हायकोर्टाने हा निर्णय घेतला.
  • संरक्षण दलांत महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीचा मुद्दा २०१० साली दिल्ली हायकोर्टाकडेच एका याचिकेद्वारे आला होता. त्यावर हायकोर्टाने या दोन्ही दलांमध्ये महिलांना पूर्ण सेवाकाळाचा अधिकार बहाल केला होता. तेव्हापासून लष्कर व हवाई दलात पुरुष-महिला अधिकारी समान स्तरावर आले.

१९६५च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त नाणे

  • भारत पाकिस्तानदरम्यान १९६५ मधील युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ५ रुपयांचे नवे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • भारतीय नाणे कायदा २०११ नुसार हे नाणे चलनात आणण्यात येईल. याशिवाय सध्या असलेले पाच रुपयांचे नाणेही चलनात असेल.
  • नाण्याच्या एका बाजूला तीन सिंह असलेला अशोकस्तंभ आणि इंग्रजी अक्षरात ‘इंडिया’ असे लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला मध्यभागी ‘अमर जवान’चे स्मारक दोन्ही बाजूला ऑलिव्ह वृक्षाची पाने असतील.
  • शौर्य आणि बलिदानाचा अर्थ प्रतित करणारे इंग्रजी शब्दही दुसऱ्या बाजूला नाण्याच्या आतील परिघावर लिहिलेली असतील. तसेच ‘अमर जवान’च्या स्मारकाच्या चित्राखाली २०१५ हे वर्षही लिहिलेले असेल. तसेच नाण्यावर ‘१९६५ च्या कारवाईचे सुवर्ण वर्ष’ असे शब्द इंग्रजी भाषेत लिहिलेले असतील.

उदय प्रकाश साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार

    Uday Prakash
  • कन्नड विचारवंत आणि साहित्यिक कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आता साहित्यिकांनी निषेधाचे हत्यार उपसले आहे. हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक उदय प्रकाश यांनी २०१०-११मध्ये मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेत हत्येचा कडाडून निषेध केला आहे.
  • उदय प्रकाश यांनी कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ संताप व्यक्त करत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी पुरस्कार नम्रतापूर्वक आणि संपूर्ण विचारपूर्वक परत करत असल्याचे म्हंटले आहे.
  • ज्यांच्यामुळे पुरस्कार मिळाला त्या निर्णायक मंडळाचे सदस्य, अशोक वाजपेयी आणि चित्रा मुद्गल यांच्याप्रती त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
  • ‘मोहन दास’ या साहित्यकृतीसाठी उदय प्रकाश यांना वर्ष २०१०-११चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसुझा यांचे निधन

  • गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसुझा यांचे पणजी येथील मणिपाल रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. विल्फ्रेड डिसुझा यांनी तीन वेळा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहिली होती. 
  • आधी दोनवेळा ते काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले त्यानंतर 'गोवा राजीव काँग्रेस'च्या रुपाने त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि स्वत:च्या बळावर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.
  • प्रथम १८ मे १९९३ ते २ एप्रिल १९९४, नंतर ८ एप्रिल १९९४ ते २३ नोव्हेंबर १९९८ आणि तिसऱ्यांदा २९ जुलै १९९८ ते ८ फेब्रुवारी १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ राहिला.
  • बेणोली, कलंगुट आणि साळगाव अशा तीन मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. २००७मधील विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
  • विल्फ्रेड यांना ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या त्यांना दोन फेलोशीप मिळाल्या होत्या. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना १९९६ मध्ये माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

मर्वान अटापट्टूचा श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

    Marvan Atapattu
  • गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तान आणि भारताविरोधातील कसोटी मालिकांमध्ये श्रीलंकेचा पराभव झाल्याने, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक मर्वान अटापट्टूने श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्याचा राजीनामा 'श्रीलंका क्रिकेट'चे प्रमुख सिदाथ वेट्टिमुनी यांनी स्वीकारला आहे.
  • श्रीलंकेचे तत्कालीन प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांची नियुक्ती इंग्लंडच्या सहायक प्रशिक्षकपदी झाल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी अटापट्टूची निवड सप्टेंबर २०१४मध्ये झाली होती. पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून काम करण्यापूर्वी २०११पासून फलंदाजी प्रशिक्षक आणि हंगामी प्रशिक्षक प्रमुख म्हणूनही त्याने काही काळ काम केले होते.
  • अटापट्टूने श्रीलंकेसाठी खेळताना ९० कसोटी सामन्यांमध्ये आणि २६८ एका दिवसाच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे ५५०२ आणि ८५२९ धावा केल्या आहेत.
  • अटापट्टूच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेचा माजी फलंदाज चंडिका हथुरुसिंघेचा विचार मुख्य प्रशिक्षक म्हणून होण्याची शक्यता आहे. हुथुरूसिंघेने बांगलादेशचा प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. हथुरूसिंघेबरोबरच ग्रॅहम फोर्डचाही विचार होण्याची शक्यता आहे.
  • फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर श्रीलंकेच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक चामिंडा वाझ यांनीही राजीनामा दिला होता.

1 टिप्पणी: