चालू घडामोडी - १९ व २० नोव्हेंबर २०१५


न्या. तीरथसिंग ठाकूर भारताचे नवे सरन्यायाधीश

 • भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. तीरथसिंह ठाकूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. न्या. ठाकूर ३ डिसेंबर रोजी पदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे २ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
 • न्या. ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. न्या. ठाकूर यांची सरन्यायाधीशपदाची मुदत ४ जानेवारी २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे.
 न्या. तीरथसिंह ठाकूर यांच्याबद्दल 
 • न्या. ठाकूर हे सुखवस्तू पंजाबी-काश्मिरी कुटुंबातले असून त्यांचे वडील देविदास ठाकूर हेही प्रथितयश वकील होते. १९७२ मध्ये तीरथ सिंग हे इंग्लंडहून वकिलीची पदवी घेऊन परतले.
 • १९७३ मध्ये देविदास हे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले होते. ते पद सोडून, राजकारणात येऊन जम्मू-काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्रिपदापर्यंत त्यांनी मजल मारली.
 • १९९४ साली न्या. तीरथसिंह ठाकूर यांची जम्मू-काश्मीर न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांची बदली कर्नाटक उच्च न्यायालयात झाली आणि पुढल्या वर्षी पूर्णवेळ न्यायाधीश म्हणून बढतीही मिळाली. 
 • कर्नाटक उच्च न्यायालयात सुमारे दहा वर्षे काढल्यावर २००४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, २००८ मध्ये दिल्लीचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश, तर ऑगस्ट २००८ ते नोव्हेंबर २००९ या काळात पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अशा पदांवर त्यांनी काम केले.

नरेंद्र मोदी ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’साठी चर्चेत

 • जगातील प्रसिद्ध टाइम मासिकाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’चे नामांकन मिळालेल्या ५० जणांच्या यादीमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिलायन्स इंड्रस्टीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ‘गुगल’चे नवे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा समावेश आहे.
 • टाइम पर्सन ऑफ द इयर २०१५ ची घोषणा पुढील महिन्यात होणार आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानानुसार मोदींना १.३ टक्के मते मिळाली आहेत. तितकीच मते सुंदर पिचई आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही मिळाली आहेत. 
 • गेल्यावर्षीही नरेंद्र मोदी यांचे नाव ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ किताबासाठी चर्चेत होते. मात्र, त्यावर्षी ‘इबोला फायटर्स’ला ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले होते.

नितीशकुमार पाचव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

 • बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी २० नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पाचव्यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. 
 • बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नितीश यांच्यासह २८ मंत्र्यांना शपथ दिली. या वेळी जदयू व राजदच्या प्रत्येकी १२ व काँग्रेसच्या ४ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांचे सुपुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यांचाही समावेश आहे.
 • मुख्यमंत्री नितीशकुमार हे गृहखाते आपल्याकडेच ठेवणार असून त्यासोबत सामान्य प्रशासन आणि माहिती-जनसंपर्क विभागाचा कार्यभारही त्यांच्याकडेच राहील.
 • तेजस्वी यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले असून ते रस्तेबांधणी विभागाचे मंत्रिपद सांभाळतील. तर तेजप्रताप यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा देण्यात आली आहे.

‘एमएसएमई’साठी नवीन तंत्रज्ञान निधी स्थापन

 • अतिलघु, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) नवे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान घेता यावे यासाठी केंद्र सरकारने 'टेक्नॉलॉजी अॅक्विझिशन अँड डेव्हलपमेंट फंड' (टीएडीएफ) हा नवा निधी स्थापन केला आहे. हा निधी राष्ट्रीय निर्मिती धोरणाचाच एक भाग आहे.
 • या निधीचा उपयोग एमएसएमई गटातील उद्योगांची निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी होणार आहे.
 • आधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे एमएसएमई गटातील उद्योगांच्या कार्यक्षमतेवर बंधने येतात. त्याचवेळी हे तंत्रज्ञान खरेदी करणे सर्वच एमएसएमई उद्योगांना परवडणारे नसते. टीएडीएफ निधीमुळे असे तंत्रज्ञान खरेदी करणे शक्य होईल. 
 • या अंतर्गत एमएसएमई गटातील एखाद्या उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी येणाऱ्या तंत्रज्ञानासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के खर्च किंवा तंत्रज्ञान वापरण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कापैकी २० लाख रुपये सरकार देणार आहे. पेटंटच्या माध्यमातून तंत्रज्ञान घेण्यासाठीही या निधीअंतर्गत साह्य देण्यात येणार आहे.
 • यामुळे जगभरातील तंत्रज्ञान देशातील एमएसएमई उद्योगांना घेता येईल. तंत्रज्ञान किंवा पेटंट यांना परवाना देताना तो निवडक कंपन्यांनाच दिला जाणार आहे.
 • टीएडीएफ निधीअंतर्गत निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करणे, उपकरणांची खरेदी करणे, प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी साधने घेणे, वीज बचतीसाठी यंत्रणा उभारणे तसेच जलसंवर्धनासाठी उपाययोजना करणे इत्यादी कारमांसाठीही एमएसएमई गटातील उद्योगांना पैसा पुरवला जाणार आहे.
 • याशिवाय ग्रीन बिल्डिंगची उभारणी, कचऱ्यावरील प्रक्रिया आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प यांची उभारणी करण्यासाठी याच निधीअंतर्गत सवलती देण्यात येतील.
 • केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री : निर्मला सीतारामन

मोदींचा मलेशिया, सिंगापूर दौरा

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ नोव्हेंबरपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेला आणि दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.
 • त्यानंतर पंतप्रधान मोदी पुढे सिंगापूरला रवाना होतील. मलेशियाचे पंतप्रधान महंमद नजीब बिन तुन हाजी अब्दुल रझाक हे या दोन्ही परिषदांच्या अध्यक्षस्थानी असतील. या वेळी आसिआन आणि पूर्व आशियाई परिषदांमधील सहभागी देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

1 टिप्पणी: