चालू घडामोडी - २५ व २६ डिसेंबर २०१५

  Atal Bihari vajpeyi
 • २५ डिसेंबर २०१५ : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ९१वा जन्मदिन. सध्या सत्तेत असलेल्या भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ते पहिले पंतप्रधान होते.
 • २५ डिसेंबर २०१४पासून २५ डिसेंबर हा दिवस ‘सुशासन दिन’ (Good Governance Day) म्हणून साजरा केला जातो.

सय्यद किरमाणी यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार

 • माजी क्रिकेटपटू यष्टिरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी यांना २०१५या वर्षीचा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकूर आणि हिंदूचे संपादक एन. राम यांचा समावेश होता.
 • क्रिकेटमधील सेवेसाठी भारत सरकारने १९८२मध्ये किरमाणी यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान केला आहे. तसेच ते कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.
 किरमाणी यांची कारकीर्द 
  Syed Kirmani
 • किरमाणी यांनी १९७६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. भारताच्या दिग्गज फिरकीविरुद्ध यष्टिरक्षणाचे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले.
 • किरमाणी फक्त उत्तम यष्टिरक्षक म्हणून प्रसिद्ध झाले नाही, तर फलंदाज म्हणूनही त्यांनी मैदान गाजवले. तळाच्या स्थानावर फलंदाजी करून त्यांनी २ शतकांची नोंदही केली आहे.
 • १९८१-८२ मध्ये इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामन्यात किरमाणी यांनी एकही अवांतर धाव दिली नाही. याशिवाय १९८३ च्या विश्वचषकात किरमाणी यांचा सर्वोत्तम विकेटकीपर म्हणून गौरव झाला.
 • वेस्ट इंडीजविरुद्ध भारताकडून सुनील गावसकर यांनी २३६ धावांची द्विशतकी खेळी केली. या खेळीत गावसकर-किरमाणी यांनी नवव्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी करून डाव सावरला होता.
 सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार 
 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून भारताचे पहिले कसोटी कर्णधार कर्नल सी. के. नायडू यांच्या नावे क्रिकेटमध्ये अतुल्य योगदान देणाऱ्या खेळाडूला सन्मानित करण्यात येते.
 • पुरस्कार स्वरुपात ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश विजेत्या खेळाडूला प्रदान केला जातो.

मोदींचा आकस्मिक पाकिस्तान दौरा

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबुलहून मायदेशी परतताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी अचानक लाहोरला भेट दिली. पाकिस्तान दौरा करणारे मोदी हे चौथे भारतीय पंतप्रधान आहेत.
 • मोदींच्या आधी त्यांच्याच पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर जाणारे शेवटचे भारतीय पंतप्रधान होते. अकरा वर्षापूर्वी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते.
 • वाजपेयी २००४ साली १२व्या शिखर परिषदेसाठी इस्लामाबादला गेले होते. वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान बनलेले मनमोहन सिंग पाकिस्तान दौऱ्यावर जातील अशी शक्यता होती. मात्र २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान दौरा केला नाही.
 • भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सहा वर्षांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९५३ साली पाकिस्तान दौरा केला. सप्टेंबर १९६०मध्ये नेहरु एक करार करण्यासाठी पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. 
 • नेहरु यांच्यानंतर २८ वर्षांनी राजीव गांधी यांनी डिसेंबर १९८८ आणि जुलै १९८९ मध्ये पाकिस्तान दौरा केला. राजीव गांधी यांनी त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याबरोबर परस्परांच्या अणूऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा महत्वपूर्ण करार केला होता.

केंद्र सरकारची गरोदर महिलांसाठी अभिनव योजना

 • केंद्र सरकारने गरोदर महिलांसाठी अभिनव योजना सुरू केली असून त्यानुसार गरोदर महिलांना मोबाइलवर दर आठवड्याला एक कॉल येईल. त्यात गर्भारपण आणि प्रसूतीनंतर काय काय खबरदारी घ्यायची, याबाबत माहिती असेल. गर्भवतींना चौथ्या महिन्यापासून असे संदेश मिळतील.
 • बाळ एक वर्षाचे होईपर्यंत ते सुरू असतील. त्यासाठी १८००११६६६६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपले नाव आणि मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. त्यानंतर १७ महिन्यांत त्यांना एकूण ७२ कॉल येतील.

टाटा पॉवरचा रशियाशी सामंजस्य करार

 • ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक व विस्ताराच्या संधी या संदर्भात टाटा पॉवरने रशियाच्या विकास मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे. दोन्ही बाजूने ऊर्जा क्षेत्रातील विस्तार व गुंतवणूक संधी याबाबत हा करार आहे.
 • यामध्ये रशियाच्या अतिपूर्व भागातील विस्ताराबाबत प्रामुख्याने भर राहील. करारानुसार या संधी व विस्ताराच्या प्रत्येक टप्प्यावर रशियाचे विकास मंत्रालय टाटा पॉवरला सहकार्य करणार आहे. स्थानिक तसेच प्रशासकीय पातळीत संवाद साधण्याचे काम मंत्रालय करणार आहे. 
 • या सामंजस्य करारावर टाटा पॉवरचे सीओओ अशाक सेठी आणि रशियाचे विकास मंत्री अलेक्झांडर गालुश्का यांनी सह्या केल्या.

२००५पूर्वीच्या नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ

 • २००५पूर्वीच्या चलनी नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने पुन्हा वाढविली आहे. यानुसार २००५ पूर्वीच्या सर्व नोटा आता ३० जून २०१६ पर्यंत बदलता येतील.
 • २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची यापूर्वीची मुदत येत्या ३१ डिसेंबर २०१५ रोजीची होती. या कालावधीपर्यंत सर्वच बँक शाखांमध्ये २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची सुविधा आहे.
 • मात्र १ जानेवारी २०१६ पासून ही सुविधा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात तसेच मध्यवर्ती बँकेने निवडलेल्या काही बँक शाखांमध्येच उपलब्ध असेल. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ या १३ महिन्यांच्या कालावधीत रिझर्व्ह बँकेकडे २००५ पूर्वीच्या १६४ कोटी नोटा येऊन पडल्या आहेत.

भारतीय वंशाचे अमित मजूमदार ओहियोचे पहिले महाकवी

 • अमेरिकेतील ओहियो प्रांताने भारतीय वंशाचे अमेरिकी डॉक्टर अमित मजूमदार यांचे ‘महाकवी’ म्हणून नामांकन केले आहे. विविध शैलीच्या कविता रचल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
 • अमित मजूमदार हे ओहियोचे पहिले महाकवी ठरले आहेत. हे पद मानद आहे.

No comments:

Post a Comment