चालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१५


महाराष्ट्राला केंद्राची ३,०५० कोटी रुपयांची मदत

  • दुष्काळाच्या तीव्र झळांनी होरपळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने ३,०५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या राज्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने ही घोषणा केली.
  • राष्ट्रीय आपत्ती निधीतून महाराष्ट्रासाठी ३,०५० कोटींची तर मध्य प्रदेशसाठी २,०३३ कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली.
  • अल निनो प्रभावामुळे १४ टक्के नैऋत्य मोसमी पाऊस कमी झाला आहे. गेल्या वर्षी पावसाची ही तूट १२ टक्के होती. देशाच्या काही भागात पूरपरिस्थिती उद्भवली असली तरी अनेक भागात अपुरा पाऊस झालेला आहे.
  • महाराष्ट्र गेल्या ३ वर्षांपासून सतत दुष्काळसदृश परिस्थितीत आहे. केंद्रीय पथकाने महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी केली होती. या पथकाने अहवाल सादर केल्यानंतर मदतीची ही घोषणा करण्यात आली.
  • यापूर्वी केंद्र सरकारने राज्यासाठी ९२० कोटी रुपयांचा दुष्काळ निवारण निधी जाहीर केला होता.
 राज्य सरकारचे १० हजार कोटी 
  • नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
  • मात्र या पॅकेजमधून दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येत आहेत. केंद्राच्या मदतीमधून सध्याच्या उपाययोजना केल्या जातील.

महत्वाच्या नियुक्त्या

  • उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या निर्गुतवणूक खात्याच्या सचिव आराधना जोहरी यांच्या जागी सार्वजनिक उद्योग खात्याचे विशेष सचिव नीरजकुमार गुप्ता यांची नेमणूक करण्यात आली आहे.
  • आराधना जोहरी यांना मंत्रिमंडळ सचिवालयात राष्ट्रीय रासायनिक अस्त्रे राष्ट्रीय प्राधिकरणच्या अध्यक्षा म्हणून नेमणूक दिली आहे.
  • सध्या पश्चिम बंगालमध्ये काम करणारे संजय मित्रा यांना रस्ते वाहतूक व महामार्ग सचिवपद देण्यात आले आहे. ते विजय छिब्बर यांच्याकडून कार्यभार घेतील.
  • औद्योगिक धोरण व बढती विभागाचे सचिव अमिताभ कांत यांना निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. सध्या सिंधुश्री खुल्लर या पदावर होत्या.
  • खुल्लर यांना एक वर्षांसाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद देण्यात आले होते, तो कालावधी ७ डिसेंबर रोजी संपत आहे.
  • बिहार केडरच्या आयएएस अधिकारी रश्मी वर्मा यांना वस्त्रोद्योग खात्याच्या सचिव नेमण्यात आले आहे. त्या सध्या महसूल खात्यात विशेष सचिव आहेत. सध्या या विभागाचे सचिव असलेले संजयकुमार पांडा निवृत्त होत आहेत.

मेस्सीला ‘ग्लोब सॉकर’ पुरस्कार

    Lionel Messi
  • दिग्गज फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘ग्लोब सॉकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर बार्सिलोनाला वर्षांतील सर्वोत्तम संघाचा मान मिळाला आहे.
  • बार्सिलोनाने २०१५च्या हंगामात स्पॅनिश लीग, कोपा डेल रे, चॅम्पियन्स लीग, युरोपियन सुपर चषक आणि क्लब विश्वचषक अशा पाच स्पर्धाचे जेतेपद पटकावले. स्पॅनिश सुपर चषक स्पर्धेत त्यांना अ‍ॅटलेटिको बिलबाओ संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने वर्षांतील सर्व स्पर्धा जिंकण्याचा विक्रम या संघाला करता आला नाही.
  • बेल्जियमचे प्रशिक्षक मार्क विल्मोट्स यांना सर्वोत्तम व्यवस्थापकाचा़, तर बेनफिकाला सर्वोत्तम अकादमी क्लबचा पुरस्कार देण्यात आला. तसेच इटलीचा आंद्रेआ पिर्लो व इंग्लंडचा फ्रँक लॅम्पर्ड यांना दीर्घकालीन सेवेबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऑस्ट्रेलियासोबत नागरी अणु सहकार्य करार

  • ऑस्ट्रेलियासोबतच्या नागरी अणु सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे भारतातील अणुभट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाकडून युरेनिअम पुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे.
  • गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान टोनी अबॉट यांच्यासोबत हा करार करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचे सध्याचे पंतप्रधान माल्कर टर्नबुल यांनी १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कराराची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले होते. 
  • सध्या ऑस्ट्रेलियाकडे युरेनिअमचा मोठा साठा आहे. युरेनिअमच्या साठ्याच्या दृष्टीने जगात ऑस्ट्रेलियाचा तिसरा क्रमांक लागतो.
  • ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेचा वापर करीत नसल्यामुळे त्यांच्याकडील युरेनिअमची जास्तीत जास्त निर्यातच केली जाते. अणुऊर्जेचा विस्तार करण्याची योजना आखल्यामुळे भारतासाठी युरेनिअमचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने या कराराला अत्यंत महत्त्व आहे.

खाद्यपदार्थांवर एक्स्पायरी डेट छापणे अनिवार्य

  • देशात खाद्यपदार्थांची निर्मिती करणाऱ्या सर्व कंपन्या व व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांवर आता त्याच्या निर्मितीची तारीख (मॅन्युफॅक्चरिंग डेट) आणि वापराच्या अंतिम मुदतीची तारीख (एक्स्पायरी डेट) नमूद करावी लागेल.
  • खाद्यपदार्थांच्या वापराबाबत असलेल्या संभ्रमांना दूर करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादकांना उत्पादनाच्या लेबलवर या दोन्ही तारखा स्पष्टपणे छापण्याचे निर्देश दिले आहेत.
  • त्यामुळे आता आता खाद्यपदार्थांवर ‘बेस्ट बिफोर’ (अमुक तारखेपर्यंत वापरल्यास उत्तम) असे छापता येणार नाही. असे लिहिल्याने ग्राहक न्यायालयांत अनेक प्रश्न उद्भवत होते.
  • केंद्रीय अन्न व पुरवठा तसेच ग्राहक मंत्री : रामविलास पासवान

इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगवास

  • इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ओल्मर्ट यांच्यावर १,२८,५०० डॉलरची लाच घेतल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
  • एखाद्या माजी पंतप्रधानांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याची इस्रायलमधील ही पहिलीच वेळ आहे. सध्या ओल्मर्ट ७० वर्षांचे आहेत. २००६-०९ या कालावधीमध्ये ते पंतप्रधानपदी होते.
  • लाचखोरीचे आरोप झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होणार असल्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला आणि त्यांनी पंतप्रधानपद सोडले होते.
  • या प्रकरणी मे २०१४ मध्ये ओल्मर्ट यांना दोन प्रकरणांमध्ये एकूण ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने यापैकी एका प्रकरणात त्यांना निर्दोष ठरवून दुसऱ्या प्रकरणात दीड वर्षांची शिक्षा दिली आहे.

यशवंत होळकर यांचे नायरिका गोदरेजसोबत लग्न

  • अहिल्याबाई होळकरांचे वंशज रिचर्ड होळकरांचा छोटा मुलगा राजकुमार यशवंत होळकर (तिसरे) यांचे २९ डिसेंबरला नायरिका गोदरेजसोबत महेश्वर किल्यातील राजवाड्यात थाटात लग्न झाले.
  • हरिद्वारच्या कुशावर्त घाटाची नियमबाह्य विक्री प्रकरणाच्या चौकशी अहवालात मध्यप्रदेशातील होळकर राजांच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचा उल्लेख आहे. सरकारसोबत झालेल्या करारानुसार, या संपत्तीच्या देखरेखीची जबाबदारी देण्याबदल्यात होळकर संस्थानाला २,९१,९५२ कोटी रुपये दिले आहेत.
  • नायरिका गोदरेज ही प्रसिद्ध उद्योगपती विजय कृष्ण गोदरेज यांची मुलगी आहे. फोर्ब्स मासिकाने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात गोदरेज कुटुंबांची संपत्ती ७५,३१८ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. आशियातील ५० श्रीमंत कुटुंबांपैकी हे कुटुंब १५व्या स्थानी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा