चालू घडामोडी : २९ जानेवारी


सानिया-मार्टिना अजिंक्य

 • भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
 • सानिया आणि मार्टिनाने चेक प्रजासत्ताकच्या अँड्रिया हॅलव्हाकोव्हा आणि लुसी हॅरडेका या जोडीचा ७-६, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
 • जेतेपदासह सानिया-मार्टिना जोडीने सलग ३६ लढतीत अपराजित राहण्याचा विक्रमही प्रस्थापित केला आहे. या लढती जिंकताना या जोडीने सलग आठ जेतेपदांवर नाव कोरले आहे. 
 • चालू मोसमातील सानिया आणि मार्टिना जोडीचे हे पहिले ग्रॅंडस्लॅम आहे. तर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे सानियाचे दुसरे जेतेपद आहे. २००९ म
 • ध्ये सानियाने महेश भूपतीच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले होते.

सायबर सुरक्षेसंदर्भातील सामंजस्य करारांचा आढावा

 • सायबर सुरक्षेबाबत भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सीईआरटी-इन आणि मलेशिया, सिंगापूर आणि जपानमधल्या संबंधित संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली.
 • या सामंजस्य करारांमुळे भारत आणि संबंधित देश यांच्यात सायबर सुरक्षेसंदर्भातल्या घटनांचा तपास, अशा घटना रोखणे याबाबत ज्ञान आणि अनुभवांच्या आदान-प्रदानाला चालना मिळून सहकार्य अधिक दृढ व्हायला मदत  होईल.
 • सायबर सुरक्षेसंदर्भात सहकार्य करण्याबाबतच्या तीन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याचा तपशील याप्रमाणे-
 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यात २३ नोव्हेंबर २०१५ला सायबर सुरक्षेसंदर्भात सीईआरटी-इन आणि सायबर सिक्युरिटी मलेशिया यांच्यात सामंजस्य करार झाला.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यात २४ नोव्हेंबर २०१५ला सायबर सुरक्षेबाबत सीईआरटी-इन आणि सिंगापूर कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सायबर सुरक्षा एजन्सी सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार झाला.
 3. सीईआरटी-इन आणि जपान कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्यात ७ डिसेंबर २०१५ला सायबर सुरक्षेबाबत सामंजस्य करार झाला. स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान २२ डिसेंबर २०१५ला पूर्ण झाले.

गुजरातचे वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक माघारी

 • गुजरात विधानसभेने पारित केलेले वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अतिरिक्त माहितीची पूर्तता करण्याची सूचना करत परत पाठवले आहे. राष्ट्रपतींनी हे विधेयक माघारी पाठवण्याची ही तिसरी वेळ आहे.
 • ‘गुजरात कण्ट्रोल ऑफ टेररिझम अ‍ॅण्ड ऑर्गनाइझ्ड क्राइम विधेयक २०१५’ या नावाने हे विधेयक गुजरात विधानसभेत एप्रिल २०१५मध्ये मंजूर करण्यात आले होते.
 • हे विधेयक यापूर्वी गुजरात विधानसभेने दोनदा मंजूर करून राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, कठोर तरतुदी असल्याने दोन्ही वेळेस तत्कालीन राष्ट्रपतींनी हे विधेयक फेटाळले होते.
 • तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००४मध्ये पहिल्यांदा हे विधेयक परत पाठवले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीदेखील हे विधेयक राज्य सरकारला परत पाठवले होते.
 • संबंधितांचे दूरध्वनी ‘टॅप’ करून न्यायालयात त्याचा वापर पुराव्यादाखल करण्याचे अधिकार पोलिसांना देण्याची वादग्रस्त तरतूद या विधेयकामध्ये आहे.
 • तसेच पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब न्यायालयात सादर करता येऊ शकेल तसेच आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी तपासाचा सध्याचा कालावधी ९० दिवसांवरून १८० दिवसांवर वाढविण्याच्या तरतुदीही या विधेयकात आहेत.

ई-तिकिटांचा काळा बाजार बंद होणार

 • रेल्वे प्रवासाचे ऑनलाइन बुकिंग करण्यासंदर्भातील नियमांमध्ये रेल्वे खात्याने (आयआरसीटीसी) बदल केले आहेत. 
 • ऑनलाईन तिकिट बुक करताना एका व्यक्तीचे लॉग-इन वापरून एका दिवसात दोनवेळा व एका महिन्यात फक्त सहावेळाच तिकिटे बुक करता येणार आहेत. सध्या एका युजरला महिनाभरात १० तिकिटे बुक करता येतात.
 • रेल्वेकडून १५ फेब्रुवारीपासून नवा नियम लागू करण्यात येणार आहे. एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याने काही प्रवाशांना अडचणी येतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा बदल केला आहे.
 • या नव्या नियमानुसार तत्काळ बुकिंगमध्ये एका व्यक्तीला सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत फक्त दोन तिकीटे घेता येतील.

एनसीसी संचालनात महाराष्ट्र तिसरा

 • गेल्या २५ वर्षांपैकी १७ वेळा पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळवणाऱ्या महाराष्ट्राला एनसीसी संचालनात यावर्षी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • पंजाब, चंदिगड, हरियाणा हिमाचल प्रदेश या संयुक्त संचालनालयाला पंतप्रधान बॅनरचा तर कर्नाटक, गोवा या संयुक्त संचालनालयाला उपविजेतेपदाचा मान मिळाला आहे.
 • दिल्लीतील छावणी भागातील गॅरीसन परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा व वितरण करण्यात आले.

विन्सन मॅसिफ सर करणारी पहिली आयपीएस : अपर्णा कुमार

 • उत्तर प्रदेश कॅडरची आयपीएस अधिकारी अपर्णा कुमार हिने अंटार्क्टिकातील सर्वांत उंच शिखर माऊंट विन्सन मॅसिफ सर करुन विक्रम केला आहे. या शिखरावर तिरंगा फडकावणारी ती पहिली प्रशासकीय अधिकारी ठरली आहे.
 • ५ जानेवारी रोजी वेगवेगळ्या देशातील १० सदस्याच्या टीमसोबत ही मोहिम सुरु करण्यात आली होती. त्यात अपर्णाचा समावेश होता. तिने १७ जानेवारी रोजी हा विक्रम आपल्या नावावर केला.
 • आता जगभरातील ७ आव्हानात्मक शिखरांपैकी ५ शिखरांना पादाक्रांत करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मोहिमेतही ती सहभागी होणार आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले या शिखरांचाही समावेश यात आहे.
 • लखनौच्या पोलिस डेलिकॉम विभागात अर्चना डीआयजी आहे. २००२ च्या बॅचची ती आयपीएस अधिकारी आहे.
 • गिर्यारोहणात अनेक विक्रम आपल्या नावावर केल्याने मार्च २०१५ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ देऊन अपर्णाला गौरविले होते. प्रजासत्ताक दिनाला तिला स्पेशल डीजीपी रिकमेंडेशन डिस्कही प्रदान करण्यात आली.

धोनीच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती

 • एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात धोनीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याप्रकरणी धोनीविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला आणि त्याच्यावर बजावण्यात आलेल्या वॉरंटला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
 • महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात ८ जानेवारीला अनंतपूरमधील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
 • एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात धोनीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते वाय. श्यामसुंदर यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका धोनीवर ठेवण्यात आला.

भारताच्या महिला क्रिकेट संघाचा विक्रम

 • भारताच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत मालिका विजयाचा इतिहास घडवला. तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. 
 • मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १० विकेट्सने पराभूत केले.
 • पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी १० षटकांत ६६ धावांचे आव्हान होते. भारताच्या सलामी जोडीने हे आव्हान अवघ्या ९.१ षटकांत पूर्ण केले.

अयोनिका पॉलचा रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित

 • राष्ट्रकुल पदकप्राप्त मुंबईकर अयोनिका पॉलने आशियाई ऑलिम्पिक नेमबाजी पात्रता स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदकासह रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.
 • २३ वर्षीय आयोनिकाने २०५.९ गुणांची नोंद केली. इराणच्या नारमेह खेदामती हिने सुवर्ण पदक मिळविले. तिचेही २०५.९ गुण झाले. त्यामुळे टायब्रेकर घेण्यात आला. त्यामध्ये आयोनिकाने ९.९ गुण नोंदविले, तर खेदामती हिने १०.१ गुणांची नोंद केली.
 • रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती अकरावी भारतीय नेमबाज आहे.

इडियन-अमेरिकन फॉर ट्रम्प २०१६

 • अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष पदासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त करून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका समूहाने त्यांच्या प्रचारासाठी एक राजकीय कृती समिती स्थापन केली आहे.
 • आयोगाकडे ‘इडियन-अमेरिकन फॉर ट्रम्प २०१६’ची नोंदणी राजकीय कृती समिती म्हणून करण्यात आली आहे. अमेरिकेचे पुढील अध्यक्ष ट्रम्प हेच व्हावेत यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचा पाठिंबा मिळविण्याचा या गटाचा उद्देश आहे.
 • अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणे, जागतिक पातळीवर अमेरिकेला योग्य पद्धतीने आणणे, दहशतवादाचा नि:पात करणे हे ट्रम्प यांचे कार्यक्रम उत्तम आहेत असे या समूहाला वाटत आहे.
 • सेटन हॉल विद्यापीठातील प्राध्यापक ए. डी. अमर हे या समूहाचे अध्यक्ष आहेत, तर न्यूयॉर्कमधील अॅटर्नी आनंद अहुजा हे उपाध्यक्ष आहेत.

नथुराम गोडसे- अ स्टोरी ऑफ अ‍ॅन अ‍सॅसिन

 • ‘नथुराम गोडसे- अ स्टोरी ऑफ अ‍ॅन अ‍सॅसिन’ असे या पुस्तकाचे नाव असून ते अनुप अशोक सरदेसाई यांनी लिहिले आहे. 
 • त्याचे प्रकाशन गांधी पुण्यतिथी म्हणजेच ३० जानेवारीला मडगावच्या रवींद्र भवन येथे भाजप नेते दामोदर नाईक यांच्या हस्ते होणार आहे.

No comments:

Post a Comment