चालू घडामोडी : ३० जानेवारी


झिका विषाणूला रोखण्यासाठी तांत्रिक गटाची स्थापना

 • झिका विषाणूचा परदेशात प्रसार सुरू असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल केंद्र सरकारने घेतली असून त्याचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये यावर देखरेख करण्यासाठी एका तांत्रिक गटाची स्थापना केली आहे. झिका विषाणूचा फैलाव झाल्याच्या स्थितीवर हा गट लक्ष ठेवेल तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आखणी करेल.
 • काही देशात झिका विषाणू फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. आरोग्य मंत्रालयाचे आणि एम्सचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
 • जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार हा विषाणू धोकादायक असून वेगाने पसरत आहे, शिवाय तो भारतासारख्या देशावर परिणाम करू शकतो.
 झिका विषाणू 
 • ताप, डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार पसरविण्यास जबाबदार असलेल्या ‘एडिस इजिप्ती’ या डासांद्वारेच झिका विषाणूचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 • या विषाणूमुळे मातेच्या गर्भात असलेल्या बालकांच्या मेंदूची वाढ खुंटण्याची (मायक्रोसेफॅली) शक्यता असते. प्रादुर्भाव झाल्यास अविकसित मेंदू असलेल्या बालकाचा जन्म होतो. त्यामुळे गर्भवती महिलांना या विषाणूपासून मोठा धोका आहे. 
 • प्रादुर्भाव झाल्यास ठळक लक्षणे दिसत नसल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड असते. या विषाणूमुळे मोठ्या माणसांनाही अर्धांगवायू होण्याची शक्यता असते.
लक्षणे
 • या रोगामुळे मृत्यू दुर्मिळ असला तरी डोकेदुखी, सांधेदुखी, त्वचा खाजणे, उलट्या, ताप आणि डोळे दुखणे अशी साधारण त्याची लक्षणे आहेत. प्रादुर्भाव झालेल्या चारपैकी एकाच व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात.
प्रसार व तीव्रता
 • १९४७मध्ये आफ्रिका खंडातील युगांडामध्ये प्रथम या विषाणूच्या प्रादुर्भावाची घटना आढळली होती. १९६०मध्ये नायजेरियामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळला. काही काळातच अशी अनेक प्रकरणे समोर आल्याने त्याचे गांभीर्य वाढले.
 • २०१४ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आलेल्या विदेशी नागरिकांकडून हा विषाणू दक्षिण अमेरिकेत आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसह २३ देशांमध्ये विषाणू पसरला आहे 
 • या विषाणूमुळे आतापर्यंत ५० नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून एकट्या ब्राझीलमध्ये आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
उपाय
 • या रोगावर उपचार करणारी कोणतीही लस अथवा औषध सध्या अस्तित्वात नाही. मात्र, लक्षणे आढळलेल्या रुग्णांना अधिक पाणी पिण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
 • अमेरिका आणि कॅनडाच्या संशोधकांनी या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेची तातडीची बैठक
 • या समस्येचा सामना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारीला तातडीची बैठक बोलाविली आहे.
 • जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, या विषाणूने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. इबोलाप्रमाणेच या विषाणूबाबतही जागतिक पातळीवर धोक्याचा इशारा जारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.

महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक स्टम्पिंगचा विक्रम

 • टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टी-२० सामन्यादरम्यान दोन मोठे विक्रम स्वत:च्या नावे केले. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.
 • याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० स्टम्पिंग करणारा तो पहिलाच यष्टिरक्षक बनला आहे. लंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकारा याचा १३९ स्टम्पिंगचा विक्रम त्याने मोडित काढला. धोनीने जडेजाच्या चेंडूवर फॉल्कनरला यष्टिचित करीत हा मान मिळविला.

अमृता शेरगिल यांचा १०३वा जन्मदिन

  Three Girls by Amrita Sher Gil
 • अमृता शेरगिल या भारतातील विसाव्या शतकातील प्रसिद्ध महिला चित्रकार होत्या. देशातील कलेवरील बंधने झुगारून स्वतःला भावणारी, समाजाचे वास्तव चित्रण करणारी चित्रे त्यांनी चितारली.
 • शेरगिल यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे ३० जानेवारी १९१३ मध्ये झाला. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील उमरावसिंग शेरगिल हे भारतीय तर आई अँटोनी गोट्‌समन ही हंगेरियन होती.
 • कलेचे शिक्षण त्यांनी पॅरिसमध्ये घेतले. पूर्व युरोप व दक्षिण आशियाई चित्रकलेचा त्यांच्यावर प्रभाव होता. चित्रकार म्हणून त्यांनी कामाला पॅरिसमधून सुरवात केली. परंपरेला छेद देणारी चित्रे काढण्याकडे त्यांचा कल होता.
 • भारतात आल्यानंतर त्यांनी आपले कुटुंब व मित्रपरिवातील सदस्यांची अनेक चित्रे काढली. भारतीय महिलांची चित्रे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्यांच्या चित्रांमधून महिलांच्या सामाजिक स्थितीचेही दर्शन घडते. यात ‘तीन लडकियॉं’ हे त्यांचे चित्र विशेष गाजले.
 • वयाच्या केवळ २९ व्या वर्षी १९४१ मध्ये आजारामुळे त्यांचे निधन झाले. चित्रकार म्हणून त्यांची कारकीर्द अल्प ठरली. त्यांनी या काळात १७४ चित्रे काढली. त्यातील ९५ चित्रे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जतन करण्यात आली आहेत. 
 • शेरगिल यांचे आयुष्य व चित्रकलेतील संस्मरणीय कारकीर्द पाहून त्या भारताच्या ‘फ्रिडा काहोल’ असल्याचे गुगलने म्हटले आहे. फ्रिडा काहोल या मेक्सिकोतील विसाव्या शतकातील महिला चित्रकार होत्या. त्यांची अनेक व्यक्तिचित्रे प्रसिद्ध आहेत.

अँजेलिक कर्बरला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

 • जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अँजेलिकचे हे कारकीर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
 • केर्बरने अंतिम सामन्यात सेरेनावर ६-४, ३-६, ६-४ अशी मात केली. ग्रँडस्लॅम जेतेपद पटकाविणारी अँजेलिक कर्बर जर्मनीची दुसरीच खेळाडू ठरली. यापूर्वी स्टेफी ग्राफने ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले होते. 
 • सध्या जागतिक रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावरील अँजेलिकने या जेतेपदामुळे दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • ऑस्ट्रेलियन ओपनमधील ७वे आणि एकूण २२वे ग्रॅंड स्लॅम जेतेपद मिळविण्याचे सेरेनाचे लक्ष्य होते. हे विजेतेपद पटकावून सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम जिंकण्याच्या जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी सेरेनाला होती. 

जनरल के व्ही कृष्णराव यांचे निधन

 • निवृत्त लष्कर प्रमुख जनरल के व्ही कृष्णराव यांचे ३० जानेवारी रोजी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
 • जनरल के व्ही कृष्णराव यांची १९८१ साली १४वे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी भारतीय लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार जुलै १९८३ पर्यंत पाहिला. तसेच, ते चिफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षही होते.
 • काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले असतानाच्या काळातच त्यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. तसेच १९७१च्या बांग्लादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांग्लादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 • त्यांनी बजावलेल्या अतुलनीय लष्करी सेवेबद्दल त्यांचा परमविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवही करण्यात आला होता.

फेसबुकवर हत्यारांच्या विक्रीस बंदी

 • ऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लोकांनी परस्परांना बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेत नसल्याचे कारण सांगत फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
 • अमेरिकेमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांवर गोळ्या घालून त्यांना ठार मारण्याच्या अनेक घटना घडल्यानंतर अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोशल नेटवर्किंग साईट्सना आवाहन केले होते, की त्यांनी त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या हत्यारांच्या व्यवहारांना आळा घालावा. 
 • याआधी फेसबुकने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मारिजुआना, बेकायदेशीर ड्रग्ज विकण्यास बंदी घातलीच होती, त्यामध्ये आता हत्यारांची भर पडली आहे.

No comments:

Post a Comment