चालू घडामोडी : १९ जानेवारी


अंदमान-निकोबार बेटांच्या संरक्षणासाठी पोसिएडोन-८१

 • अंदमान-निकोबार बेटांना दक्षिणपूर्व आशिया, चीन, जपान आणि इतर पूर्वेकडचे देश यांचे समुद्री मार्ग आहेत. त्यामुळे या बेटांचे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे.
 • त्यामुळे याठिकाणी भारताने पोसिएडोन-८१ विमानासोबत ड्रोन तैनात केले आहेत. शिवाय नौसेना आणि भारतीय वायू दल येथे इस्राएल बनावटीचे सर्चर-२ कॅटेगरीचे विमानसुद्धा अस्थायी स्वरूपात उतरवणार आहे.
 • चीन याठिकाणी न्यूक्लिअर आणि कन्वेंशनल पाणबुड्या वाढवत आहे. यामुळे समुद्री क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे. चीनच्या अशा हालचाली पाहता भारताने येथे पोसिएडोन-८१ आणि स्पाय ड्रोन यांना तैनात केले आहेत.
 अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचे महत्व 
 • हे द्वीपसमूह म्हणजे, भारतासाठी अशी एकमेव जागा आहे ज्या ठिकाणी भूदल, वायूदल आणि नौदल तिघांचे एक संयुक्तिक कमांड आहे.
 • तिथे भूदलाचे सहा हजारांहून जास्त सैनिक आहेत. शिवाय नौदलाचा मोठा बेस आहे, याशिवाय कारनिकोबार बेटावर वायूदलाचाही एक बेस आहे.
 • यांचा वापर आपण सामरिकदृष्ट्या करू शकतो. कारण सगळे समुद्री रस्ते या द्वीपसमूहामधून जातात. तसेच भारतापासून ते लांब असल्यामुळे चिनी नौदलाला तेथून बंगालच्या उपसागरातच अडवता येऊ शकते. चिनी नौदलाला भारताजवळ येण्यापासून रोखता येऊ शकते.
 ‘पोसिएडोन-८१’बद्दल 
 • सर्वात धोकादायक पाणबुडी शोधून तिला नेस्तनाबूत करण्याचे कौशल्य पोसिएडोन-८१ या लढाऊ विमानामध्ये आहे. याची ऑपरेटिंग रेंज १२०० नॉटिकल माइल्स तर मॅक्सिमम स्पीड ९०७ किलोमीटर प्रति तास आहे.
 • गुप्त माहिती मिळवणे आणि कुठे धोका आहे हे सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. 
 • यावर हार्पून ब्लॉक-२ मिसाइल, एमके-५४ हलके तारपीडो आणि रॉकेट्स आहेत. म्हणजेच गरज पडली तर हे हल्लाही करू शकते.
 • विशेष म्हणजे पाणबुडी आणि वॉरशिपच्या सिस्टमला हे न्युट्रिलाइज करू शकते. या प्रकारचे अजून चार विमान खरेदी करण्याची तयारी भारताने केली आहे.

तेजस विमान आंतराष्ट्रीय एअर शोमध्ये सहभागी होणार

 • संपूर्ण भारतीय बनावटीचे तेजस हे विमान प्रथमच आंतराष्ट्रीय एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. २१ जानेवारी रोजी बहारिन येथे साखिर हवाई तळावर हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने तेजस विमान प्रथमच परदेशी भूमीवर उतरणार आहे.
 • बहारिनमध्ये आयोजित हा एअर शो २३ जानेवारीपर्यंत चालणार असून या निमित्ताने भारतीय बनावटीच्या या वजनाने हलक्या पण शक्तिशाली लढाऊ विमानाची जगाला ओळख होणार आहे. या एअर शोमध्ये तेजस विमान आपली कौशल्ये व शक्ती दाखवून देईल. 
 ‘तेजस’बद्दल 
 • हिंदुस्थान एरॉनॉटिकल लिमिटेडचे तेजस हे एक आसनी लढाऊ विमान असून यात जेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे. या विमानाचे इंजिन एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने विकसित केलेले आहे.
 • आधुनिक युगात जगातील सर्वांत हलके व छोटे लढाऊ विमान म्हणून तेजस या विमानाची ख्याती असून प्रचंड वेग आणि लक्ष्य अचूक टिपण्याच्या क्षमतेमुळे आज या विमानाची जगभर चर्चा आहे. या विमानाचे कॉकपीट काचेचे असून सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या विमानाची क्षमता आहे.
 • या विमानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हवेत एका जागी काही वेळ स्थिर राहण्याचे कौशल्य या विमानात आहे. शिवाय यात आधुनिक रडार यंत्रणा असून ताशी १९२० किमी वेगाने ते उडू शकते.
 • या विमानाची बांधणी संपूर्ण भारतीय बनावटीची असून हलके वजन व अधिक क्षमता यामुळे ही विमाने निर्मितीनंतर जगभरात चर्चेत आली होती. आता तज्ज्ञांना ती प्रत्यक्षात पाहावयास मिळतील.

एनएसईचा बनारस हिंदु विश्वविद्यालयाशी करार

 • आर्थिक क्षेत्रासाठी दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुढाकार घेतला आहे. यासाठी एनएसईने बनारस हिंदु विश्वविद्यालयाशी करार केला आहे. या करारांतर्गत बी.कॉम हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना वित्त बाजार व्यवस्थापन यामध्ये ही पदवी घेता येईल. त्याचप्रमाणे एमबीए करताना ते वित्त व्यवस्थापन या विषयात करता येईल.
 • १९१५मध्ये विशेष कायद्यांतर्गत स्थापन झालेले बनारस हिंदु विश्वविद्यालय चालू आर्थिक वर्षापासूनच वरील दोन्ही अभ्यासक्रम राबवणार आहे.
 • व्यावसायिकदृष्ट्या कुशल व्यवस्थापक व उद्योजक तयार करणे, त्याद्वारे येत्या काही वर्षांत उद्योगजगताकडून येणारी या प्रकारच्या मनुष्यबळाची मागणी पूर्ण करणे हा यामागचा उद्देश आहे. या अभ्यासक्रमांमुळे कौशल्य उणीव भरून काढणे शक्य होईल.

क्रिस गेलचे वेगवान अर्धशतक

 • विंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या युवराज सिंगच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे.
 • त्याने युवीसारखेच १२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम अद्यापही युवराजच्या नावे आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हा विक्रम आता युवराज सिंग आणि क्रिस गेलच्या नावे संयुक्तपणे आहे.
 • गेलने लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून अॅडिलेड स्ट्राइकविरुद्ध हा विक्रम केला.

ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव आहेर यांचे निधन

 • राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव आहेर यांचे १९ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
 • १९८९ साली ते भाजप पक्षाकडून नाशिक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. युती सरकारच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रिपदाचा कारभार सांभाळला.
 • दौलतराव यांनी त्यांच्या कार्यकाळात वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, असा आग्रह धरला होता. याशिवाय, आहेर यांनी आमदारकीपासून खासदार, मंत्री, तापी खोरे महामंडळाचे अध्यक्ष ही महत्त्वपूर्ण पदे भूषविली.

No comments:

Post a Comment