चालू घडामोडी : १९ फेब्रुवारी


शेतमालासाठी डिजिटल बाजार

  • शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना आपला माल देशभरात कुठल्याही बाजारपेठेत विकता येईल, असा डिजिटल प्लॅटफॉर्म येत्या १४ एप्रिलला म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
  • सरकार राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय कृषी बाजारपेठ सुरू करत असून ती प्रत्यक्ष आणि डिजिटल अशी दोन्ही स्वरूपात असेल. 
  • या प्लॅटफॉर्मवरून शेतकरी मोबाइल फोनचा वापर करून आपला शेतमाल चांगल्या भावात देशभरातील बाजारपेठांपर्यंत पोहचवू शकतील.
  • 'ई अॅग्री' प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत २०१८पर्यंत देशभरातील ५८५ कृषी उत्पन्न बाजार समित्या टप्प्याटप्प्याने जोडल्या जाणार असून त्यासाठी आत्तापर्यंत २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • येत्या मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यात २०० बाजार समित्या जोडल्या जातील, तर २०१७ पर्यंत २०० आणि २०१८ पर्यंत उरलेल्या बाजार समित्या जोडल्या जाणार आहेत. 

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा समारोप

  • देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित समारोप झाला.
  • या सप्ताहात स्मार्ट सिटी, पायाभूत सेवासुविधा, कृषी, वाहन, संरक्षण या क्षेत्रांत १५.२ लाख कोटींची गुंतवणूक झाली. त्यापैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्राने मिळविली आहे. त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांना गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश आले.
  • मेक इन इंडिया सप्ताहात महाराष्ट्र राज्य सरकारने २५९४ सामंजस्य करार केले. यातून राज्यात ७.९४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, तीस लाख रोजगार निर्माण होतील.
  • एकूण करारांपैकी २०९७ करारांमुळे मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योगांना चालना मिळणार आहे. एकूण गुंतवणुकीच्या ३० टक्के गुंतवणूक परदेशी कंपन्यांकडून आली आहे.
  • एमएमआरडीए मैदानावर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

केंद्रीय विद्यापीठांमध्ये राष्ट्रध्वज लावण्याचे आदेश

  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांनी भारत विरोधी घोषणा दिल्याने मोठे वादळ उठले असताना केंद्र सरकारने देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये राष्ट्रध्वज लावण्याचे आदेश जारी केले आहेत.
  • स्मृती इराणी यांच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हे आदेश दिले आहेत. सर्व विद्यापीठांसाठी हा आदेश बंधनकारक आहे. झेंड्यासाठी २०७ फूट उंच खांब असावा आणि १२५ किलो वजनाचा तिरंगा असावा, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा झेंडा कायमस्वरूपी फडकवण्यात यावा असेही आदेशात म्हटले आहे.
  • देशाची एकता आणि अखंडता अबाधित राहावी, यासाठी इराणी यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेतली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे याची सुरुवात दिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठातून करावी, असे या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले.
  • कुलगुरूंच्या या बैठकीमध्ये बिहार विद्यापीठाचे कुलगुरु हरीशचंद्र सिंह राठौर यांनी हा प्रस्ताव मांडला. यावेळी ४६ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसह मंत्री स्मृती इराणी यासुद्धा सहभागी झाल्या होत्या.

तामिळनाडूमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना

  • तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेची घोषणा केली आहे. सुरवातीला ही योजना चेन्नईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून, त्यानंतर प्रतिसाद पाहून ती संपूर्ण राज्यात लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
  • या योजनेनुसार राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक सरकारी बससेवेचा मोफत लाभ घेऊ शकणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारीला जयललिता यांचा वाढदिवस असून, त्या दिवसापासून ही योजना कार्यान्वित होईल.
  • २०११च्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जाहीरनाम्यातील वचनपूर्ती करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्या.

अरुणाचलमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

  • अरुणाचलमधील स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आपला यापूर्वीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने तेथे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
  • अरुणाचल विधानसभेतील काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांची अपात्रता गुवाहटी हायकोर्टाने कायम ठेवण्याच्या निर्णयावर आम्ही समाधानी असून अरुणाचलमध्ये जैसे थे स्थिती ठेवण्याबाबत आम्ही यापूर्वी दिलेला निर्णय रद्द करत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
  • ६० सदस्यांच्या अरुणाचल विधानसभेत काँग्रेसचे ४७ तर भाजपचे ११ आमदार आहेत. मात्र काँग्रेसच्या २१ आमदारांनी बंडखोरी केल्याने नाबाम तुकी यांचे सरकार अल्पमतात गेले.
  • या अस्थिरतेमुळे केंद्र सरकारने २६ जानेवारीला अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांपैकी १४ जणांना विधानसभेचे अध्यक्ष नाबाम रेबिया यांनी अपात्र ठरवल्याने यातील गुंता वाढला आहे.

उस्ताद अब्दुल राशिद खान यांचे निधन

  • ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खान यांचे १८ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०७ वर्षांचे होते.
  • खान यांना २०१३मध्ये पद्भभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
  • अब्दुल रशीद खान गेली २० वर्षे आयटीसी संगीत अकादमीत संगिताचे निवासी गुरु होते. प्रकृती साथ देत नव्हती तरी त्यांचे अध्यापनाचे कार्य अव्याहतपणे सुरु होते.

मेस्सीचे ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ३०० गोल

  • बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लियोनाल मेस्सी याने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ३०० गोलचा टप्पा पार केला. स्पोर्टिंग गिनोज संघाला ३-१ असे हरविताना त्याने २ गोल केले. ला लिगामध्ये ३०० गोल करणारा मेस्सी हा पहिला खेळाडू बनला आहे.
  • सामन्याच्या २५व्या मिनिटाला मेस्सीने नोंदविलेला गोल हा त्याचा ला लिगामधील ३००वा गोल ठरला. मेस्सीचा हा ३३४वा ला लिगा सामना होता. आता त्याचे ३०१ गोल झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा