चालू घडामोडी : २४ फेब्रुवारी


नऊ मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन

  • महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या नऊ मार्चपासून सुरू होणार असून, १८ मार्च २०१६ रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे.
  • विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातील तात्पुरते कामकाज ठरविण्यासाठी विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळात झाली.
  • या बैठकीत ९ मार्च ते १७ एप्रिलदरम्यान अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. याशिवाय अधिवेशनात शासकीय व अशासकीय कामकाजाबरोबरच प्रस्तावित सहा विधेयके व तीन अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ
पद विधानसभा विधानपरिषद
सभापती हरिभाऊ बागडे रामराजे नाईक-निंबाळकर
उपसभापती पद रिक्त वसंत डावखरे
विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील धनंजय मुंडे

एनएसईचे पाच नवीन निर्देशांक

    National Stock Exchange
  • राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने पाच नवीन निर्देशांकांना सुरुवात करण्यासह, विद्यमान निफ्टी-५० निर्देशांकाच्या रचनेतही फेरबदल येत्या १ एप्रिलपासून अमलात आणत असल्याचे घोषित केले आहे.
  • एनएसईची उपकंपनी इंडिया इंडेक्स सर्व्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स लि. (आयआयएसएल)ने नव्याने अमलात येणाऱ्या पाच निर्देशांकासह एनएसईवर एकूण ११ निर्देशांकांच्या रचनेची घोषणा केली आहे.
  • नव्या निर्देशांकांनुसार कोणतीही कंपनी केवळ एकाच म्हणजे लार्ज, मिड व स्मॉल या श्रेणीत समाविष्ट असेल.
  • निफ्टी मिडकॅप १५०, निफ्टी स्मॉलकॅप २५०, निफ्टी फुल मिडकॅप १००, निफ्टी स्मॉलकॅप ५० आणि निफ्टी फुल स्मॉलकॅप १०० असे पाच नवीन निर्देशांक एप्रिलपासून कार्यान्वित होतील.
  • तर विद्यमान सहा निर्देशांक निफ्टी ५००, निफ्टी १००, निफ्टी ५०, निफ्टी नेक्स्ट ५०, निफ्टी मिडकॅप ५० आणि निफ्टी २०० जमेस धरल्यास एकूण ११ निर्देशांक असतील.
  • नव्याने दाखल होणाऱ्या निफ्टी स्मॉलकॅप ५० निर्देशांकामुळे आता प्रत्येक श्रेणीत ५० समभागांचा निर्देशांक अस्तित्वात येईल.

‘आयएनएस अरिहंत’ नौदलात समावेश होण्यास सज्ज

    INS Arihant
  • अणु इंधनावर चालणारी आणि अण्वस्त्रधारी अशी भारतात बांधलेली पहिली पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ नौदलात कामगिरीसाठी सज्ज झाली आहे.
  • सर्व चाचण्या ‘आयएनएस अरिहंत’ने यशस्वीपणे पूर्ण केल्या असून नौदलात दाखल करण्याबाबत सरकारी पातळीवरील निर्णय होताच ती नौदल ताफ्यात सामील होईल.
  • विशाखापट्टणम येथील नौदल जहाजबांधणी गोदीत ‘आयएनएस अरिहंत’ची बांधणी केली गेली व गेल्या पाच महिन्यांपासून रशियाच्या मदतीने तेथेच तिच्या खोल सागरी सफरीच्या चाचण्या सुरू होत्या.
  • ‘एसएसबीएन’ या तांत्रिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘अरिहंत’च्या वर्गातील एकूण पाच आण्विक पाणबुड्या बांधण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
  • सध्या भारतीय नौदलात ‘अकुला’ वर्गातील ‘आयएनएस चक्र’ ही एकमेव आण्विक पाणबुडी कार्यरत आहे. ती रशियाकडून काही काळासाठी भाड्याने घेण्यात आली आहे. म्हणूनच ‘आयएनएस अरिहंत’ ही नौदलात दाखल होणारी भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी असेल.
  • याच वर्गातील आणखी दोन पाणबुड्यांचे काम सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या पाणबुड्या ‘अरिहंत’हून अधिक मोठ्या व अत्याधुनिक असतील.
  • तसेच भविष्यात नौदलात दाखल होणाऱ्या सर्व आण्विक युद्धनौका व पाणबुड्यांसाठी पूर्व किनाऱ्यावर काकिनाडाजवळ ‘आयएनएस वर्षा’ हा नवा सामरिक तळ उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे.
 ‘आयएनएस अरिहंत’ची वैशिष्ट्ये 
  • वजन : ६,००० टन.
  • आखूड पल्ल्याची के-१५ अथवा बीओ-५ क्षेपणास्त्रे तैनात आहेत. मारक क्षमता ७०० कि.मी.हून अधिक.
  • के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे. मारकक्षमता ३५०० कि.मी.पर्यंत.
  • पाण्याच्या आतून आणि पृष्ठभागावरून अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता.
  • पाण्यात असताना एखाद्या विमानालाही लक्ष्य करू शकते.

रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ‘व्हिएन्ना’

  • डॅन्युब नदीच्या तीरावर वसलेली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहर रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • या यादीत व्हिएन्नानंतर स्वित्झर्लंडमधील झ्युरिच, न्यूझीलंडमधील ऑकलंड, जर्मनीतील म्युनिक आणि कॅनडातील व्हॅन्कुव्हर या शहरांचा समावेश आहे.
  • मर्सर क्वालिटी ऑफ लाईफ या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून विविध कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी जगातील २३० शहरांचा अभ्यास केला. हे अशा प्रकारचे १८वे सर्वेक्षण आहे.
  • यादी तयार करताना या संस्थेने राजकीय स्थैर्य, आरोग्यसुविधा, शिक्षण, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक निकष लावले.
  • व्हिएन्ना शहराची लोकसंख्या १७ लाख असून, शहरात असलेली विविध संग्रहालये, रंगभूमी, ऑपेरा आणि कॅफे संस्कृतीचा आनंद हे नागरिक घेत असतात. इतर शहरांची तुलनेत येथील सार्वजनिक वाहतूकही बरीच स्वस्त आहे.
  • एकेकाळी जागतिक व्यापाराचे केंद्र असलेले इराकची राजधानी बगदाद दहशतवादाने होरपळल्याने या यादीत अखेरच्या स्थानावर आहे.
  • या यादीत पहिल्या १०० शहरांत भारतातील एकाही शहराचा समावेश नाही, मात्र हैदराबाद १३९, पुणे १४४, बंगळुरु १४५, चेन्नई १५०, मुंबई १५२, कोलकाता १६० आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली १६१व्या क्रमांकावर आहे.
  • लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या जगप्रसिध्द शहरांना पहिल्या तीसमध्येही स्थान मिळवता आलेले नाही.

इस्माईल महंमद यांना फ्रान्स सरकारचा नाइटहूड किताब

  • आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल इस्माईल महंमद या भारतीय वंशाच्या कलाकाराला फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन त्याचा सन्मान केला आहे.
  • दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल महंमद यांना फ्रेंच राजदूताने ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर’ हा किताब दिला.
  • फ्रान्स सरकारकडून १९५७ पासून हा किताब दिला जात आहे. कला आणि साहित्याद्वारे फ्रान्सच्या संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या कलाकारांना हा किताब दिला जातो.
  • अनेक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करत असलेल्या इस्माईल महंमद यांना आधीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते नाट्यलेखकही आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा