चालू घडामोडी : २७ फेब्रुवारी


एफडीआयमध्ये दिल्ली आघाडीवर

    FDI in India
  • गेल्या दोन वर्षांत थेट परकीय गुंतवणुकीत दिल्ली आघाडीवर असून, महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. थेट परकीय गुंतवणुकीत दिल्ली आणि महाराष्ट्रात जवळपास १० टक्क्यांचे अंतर आहे.
  • दिल्लीत दोन वर्षांत १६२७ कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली असून, महाराष्ट्रात याच काळात ११२३ कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली.
  • ‘मेक इन इंडिया’मध्ये जास्तीतजास्त परकीय गुंतवणुकीबाबत राज्याने प्रयत्न केले, परंतु विदेशी गुंतवणूकदारांना दिल्लीचे जास्त आकर्षण असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
  • एप्रिल ते नोव्हेंबर या काळात देशात एकूण ३४.८ अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक झाली. गतवर्षी याच काळात (२०१४) २७.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती.
  • थेट परकीय गुंतवणुकीत माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात सर्वाधिक एकूण गुंतवणुकीच्या १७.८ टक्के गुंतवणूक झाली आहे.
  • सेवा क्षेत्र, बँकिंग व वित्तीय सेवा (१६.५ टक्के), ट्रेडिंग क्षेत्र (१०.५ टक्के), वाहन उद्योग (६.७ टक्के), दूरसंचार (४ टक्के), पायाभूत सुविधा क्षेत्रात (५.५ टक्के) गुंतवणूक झाली आहे.
  • एकूण परकीय गुंतवणुकीत सिंगापूर आणि मॉरिशस या दोन देशांमधूनच भारतात ६० टक्के गुंतवणूक झाली आहे. करांमध्ये सवलत मिळण्याकरिता काही पाश्चात्त्य राष्ट्रांमधील कंपन्यांनी या दोन देशांमधून गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे.
एफडीआयमध्ये आघाडीवरील राज्ये व त्यांचा एकूण वाटा
(एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१५)
१. दिल्ली २९.२० टक्के
२. महाराष्ट्र २०.१६ टक्के
३. कर्नाटक १२.०४ टक्के
४. तामिळनाडू १०.२४ टक्के
५. गुजरात ५.१३ टक्के
६. आंध्र प्रदेश ३.७३ टक्के

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकची जेआयटी

  • पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी व तपास करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाच सदस्यांच्या संयुक्त चौकशी पथकाची (जेआयटी) नियुक्ती केली आहे.
  • या हल्ल्यात पाकमधील जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा भारताचा आरोप आहे. तसेच, त्याबाबतचे काही पुरावेही पाकिस्तानला दिले होते.
  • याप्रकरणी पाकने प्राथमिक माहिती अहवाल दाखल (एफआयआर) केला असून त्यात पाकिस्तानच्या जैश ए महंमद या संस्थेचा अतिरेकी मसूद अझर याचा समावेश नाही.
  • पंजाब प्रांताचे दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मोहंमद ताहिर हे जेआयटीचे समन्वयक आहेत. हे पथक पुरावे गोळा करण्यासाठी मार्चमध्ये पठाणकोटला भेट देऊ शकते.
  • पथकामध्ये महंमद ताहीर यांच्याव्यतिरिक्त पोलिस उपमहासंचालक महंमद अझीम अर्शद, आयएसआयचे तन्वीर अहमद, लष्करी गुप्तचर खात्याचे लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा, तपास अधिकारी शाहीद तन्वीर यांचा समावेश आहे.

मोदी ‘वर्ल्ड सुफी फोरम’च्या परिषदेत सहभागी होणार

  • देशाला जिहादींपासून वाचविण्यासाठी आणि देशातील मुसलमांनापर्यंत पोहोचण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वर्ल्ड सुफी फोरम’च्या चार दिवसीय परिषदेत सहभागी होणार आहेत.
  • ‘सुफीझम’वर चर्चा करण्यासाठी होणारी ही परिषद १७ मार्च २०१६ला दिल्लीत भरणार आहे. सुफी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अध्यात्मिक गुरू आणि विद्वान असे एकूण २०० लोक या परिषदेत सहभागी होणार आहेत.
  • गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुफी व सुन्नी मौलवींच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान मोदी यांना भेटून त्यांना परिषदेची कल्पना दिली होती. त्याचवेळी मोदी यांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता.
  • पंतप्रधान मोदी परिषदेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

‘सॅन्टिना’ची विजयी घोडदौड खंडित

  • भारताची टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांची सलग ४१ सामने जिंकण्याची विजयी घोडदौड कतार ओपनमध्ये खंडित झाली.
  • जागतिक क्रमवारीतील नंबर वन असणाऱ्या सानिया आणि हिंगीस या जोडीचा एलेना वेस्निना आणि दारिया कसात्किना या रशियन जोडीने २-६, ६-४, १०-५ असे पराभूत केले.
  • महिला दुहेरीतील सलग तीन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या ‘सॅन्टिना’ला गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सिनसिनाटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
  • दोहामध्ये पराभूत होण्यापूर्वी मार्टिना-सानिया जोडीने महिला दुहेरीचे सलग तीन ग्रँण्डस्लॅम किताब जिंकले आहेत. 
  • या पराभवामुळे महिला दुहेरीत सर्वाधिक विजयाचा विश्वविक्रम रचण्याची त्यांची संधी हुकली. १९९०च्या दशकात जाना नोवोटना आणि हेलेना सुकोव्हा या जोडीने सलग ४४ सामने जिंकले होते.

अहमदाबाद शहराला ६०५ वर्षे पूर्ण

  • ऐतिहासिक वारसा असलेल्या गुजरातमधील अहमदाबाद शहराला २६ फेब्रुवारी रोजी ६०५ वर्षे पूर्ण झाली. सुमारे ६५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहराचा शोध अहमदशाहने १४११मध्ये २६ फेब्रुवारीला लावल्याची नोंद इतिहासात आहे.
  • अहमदाबादचा शोध लागण्यापूर्वी येथे सोळंकी व त्यानंतर मुघलांची, मराठ्यांची आणि अखेर ब्रिटिशांची सत्ता होती.
  • एकेकाळी भारताची कापड उद्योगाची प्रमुख बाजारपेठ असलेले हे शहर आज मेट्रो सिटी म्हणून उदयास येत आहे.
  • इतिहासकार मिरात-ए-अहमदी यांच्या इस्लामिक कॅलेंडरनुसार हा स्थापना दिवस साजरा करण्यात येत असून, अहमदशाहने शहराचा शोध लावल्यामुळेच त्याला अहमदाबाद असे नाव पडल्याची आख्यायिका आहे.
  • आज संपूर्ण देशात औद्योगिक क्षेत्रात अहमदाबाद आघाडीवर आहे, तसेच महात्मा गांधी यांनी येथे स्थापन केलेल्या साबरमती आश्रमामुळे याला स्वातंत्र्यलढ्याचाही वेगळा इतिहास आहे.
  • यामुळेच नरेंद्र मोदी सरकारने अहमदाबाद हे शहर जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यासाठी शिफारस केली आहे. आतापर्यंत २८७ शहरांचा या यादीत समावेश झाला असून, यामध्ये भारताशेजारील नेपाळमधील भक्तीपूर आणि श्रीलंकेतील गल्ले या शहरांचा समावेश आहे.
  • युनेस्कोकडून याबाबतची घोषणा जून २०१७ पर्यंत होण्याची शक्यता असून, अहमदाबाद हे भारतातील पहिले जागतिक वारसा शहर होऊ शकते.

मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला

  • पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या कार्यकाळात २००७मध्ये घटना बाजूला सारल्याबद्दल त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालविण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • या प्रकरणाच्या चौकशीतून आपल्याला वगळण्याची मागणी पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश अब्दुल हमीद डोगर यांनी केली होती. ही मागणी मान्य करून फक्त मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
  • मुशर्रफ हे पाकिस्तानच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी २००७मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती. या प्रकरणी घटनेला बाजूला सारल्याचा आरोप ठेवत मुशर्रफ यांच्याविरोधात २०१३मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • या प्रकरणातून माजी सरन्यायाधीश डोगर यांच्यासह इतर दोघांची नावे वगळून फक्त मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा