चालू घडामोडी : २८ व २९ फेब्रुवारी


‘बॅंक बोर्ड ब्यूरो’च्या अध्यक्षपदी विनोद राय

    Vinod Rai
  • सरकारी क्षेत्रातील बँकांना सध्या भेडसावणाऱ्या थकित, बुडित कर्जांच्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी तसेच, सरकारी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत सल्ला देण्याची मोदी सरकारने ‘बॅंक बोर्ड ब्यूरो’ची स्थापना केली. माजी महालेखा नियंत्रक (कॅग) विनोद राय हे या ब्यूरोचे अध्यक्ष असतील.
  • ‘ब्युरो’च्या अन्य सदस्यांमध्ये ‘आयसीआयसीआय बँके’चे माजी संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एच. एन. सिनोर, बँक ऑफ बडोदाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल खंडेलवाल आणि पतनिर्धारण संस्था ‘क्रिसिल’च्या माजी प्रमुख रुपा कुडवा यांचा समावेश आहे. अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल.
  • राय यांनी जानेवारी २००८ ते मे २०१३ दरम्यान महालेखापाल म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्याच कारकीर्दीत ‘टू जी’ आणि कोळसा घोटाळा उघडकीला आला होता. ‘युपीए २’च्या कार्यकालात अनेक प्रकरणांत राय यांनी घेतलेले निर्णय गाजले होते.

‘ब्रिक्स’ बँकेचे पहिले कर्ज भारताला

  • सदस्य विकसनशील देशांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘ब्रिक्स’ बँके’तर्फे पहिले कर्ज भारताला वितरित करण्यात येणार आहे. या कर्जाचा विनियोग ‘ग्रीन सोलर एनर्जी प्रोजेक्ट’ उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. 
  • चालू वर्षासाठी भारताला दीड अब्ज डॉलरचे कर्ज वितरित करण्यात येणार आहे. गेले सहा महिने बँकेच्या व्यवस्थापनासंबंधी काम पूर्ण केल्यानंतर आता कर्ज वितरण आदी बाबींकडे पाहिले जाणार आहे.
  • भारताशिवाय लवकरच ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका आदी देशांनाही कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.
  • ‘ब्रिक्स’ बँकेचे अध्यक्ष : के. व्ही. कामत
 ‘ब्रिक्स’ बँक 
  • ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’ जिला ब्रिक्स बँक असेही संबोधले जाते ही एक बहुराष्ट्रीय वित्तसंस्था असून ती ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांच्या बनलेल्या ब्रिक्स गटाद्वारे चालविली जाते.

अम्मा कायपेसी योजना

  • तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी ‘अम्मा’ ब्रॅंडखाली सुरू केलेल्या लोकप्रिय योजनांच्या यादीत मोफत मोबाईल फोनची ‘अम्मा कायपेसी (मोबाईल फोन)’ या योजनेची भर पडली आहे. 
  • या योजनेची घोषणा जयललिता यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केली होती. महिलांच्या स्व-मदत गटांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे.
  • या योजनेनुसार राज्यातील स्व-मदत गटातील प्रशिक्षणार्थींना सॉफ्टवेअरसह मोफत मोबाईल फोन पुरविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २० हजार प्रशिक्षणार्थींना फोन देण्याचे नियोजन आहे.
  • गटाच्या बैठका, सभासद शुल्क, अंतर्गत काम, बचत व कर्जपुरवठा व अन्य कामासंबंधीच्या अनेक नोंदी या प्रशिक्षणार्थींना ठेवाव्या लागतात. याबाबतची सर्व माहिती एकत्र ठेवण्यासाठी व त्याचे जतन करणे सहज शक्य व्हावे, यादृष्टीने या मोबाईलसाठी तमीळ भाषेतून विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. 
 स्व-मदत गट 
  • राज्यातील गरीब व महिलांच्या उद्धारासाठी जयललिता सरकारने २००५ मध्ये जागतिक बॅंकेच्या सहकार्याने ‘तमिळनाडू न्यू लाइफ स्कीम’ ही योजना सुरू केली.
  • तसेच, दारिद्र्यनिर्मूलनासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांनी १९९१मध्ये महिलांच्या स्व-मदत गटांची स्थापना केली. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला.
  • याअंतर्गत एकूण सहा लाख स्व-मदत गट स्थापन झाले असून, सदस्य संख्या सुमारे ९३ लाख आहे.  

अब्दुल कलाम व्हिजन इंडिया पार्टी

  • देशाचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने तामिळनाडूत एका राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
  • ‘अब्दुल कलाम व्हिजन इंडिया पार्टी’ असं या पक्षाचं नाव असून कलाम सरांचे साहाय्यक वी पोनराज यांनी हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे. 
  • डॉ. अब्दुल कलाम यांच्या कबरीवर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पोनराज यांनी पक्षाची घोषणा केली. हा पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी तरुणांना १५ दिवसांचे प्रशिक्षण देऊन निवडणुकीचे तिकीट देणार आहे.

अर्थसंकल्प २०१६, रेल्वे अर्थसंकल्प २०१६ तसेच आर्थिक पहाणी २०१५-१६ यावर स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करण्यात येतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा