चालू घडामोडी : १२ मार्च

‘आधार’ला वैधानिक दर्जा

    Aadhar
  • ‘आधार’ क्रमांकाला कायदेशीर मान्यता देऊन त्यामार्फत अंशदान आणि इतर आर्थिक लाभ पोचविण्याच्या प्रक्रियेला वैधानिक दर्जा देणारे आधार विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
  • लोकसभा अध्यक्षांच्या संमतीने हे विधेयक ‘धनविधेयक’ म्हणून मंजूर करण्यात आले असून, त्यामुळे या विधेयकाला राज्यसभेच्या संमतीची आवश्यकता भासणार नाही.
  • यापूर्वी बालगुन्हेगार कायदा, दक्षिण आफ्रिकन बँक आणि जायबंदी कामगारांची नुकसान भरपाईसारख्या विधेयकांना आधीच्या सरकारांनी धन विधेयक म्हणून मंजूर केले आहे. 
  • सरकारने ते धन विधेयक म्हणून आणल्याबद्दल, तसेच यातून नागरिकांच्या खासगीपणावर आक्रमण होत असल्याबद्दल विरोधकांचा तीव्र आक्षेप होता.
  • सरकारने हा आक्षेप फेटाळताना यातून पात्र लाभार्थींपर्यंत अंशदान पोचेल आणि निधी वाटपातील गळती रोखली जाईल, असा दावा केला. नागरिकांचा वैयक्तिक तपशील कुठेही उघड केला जाणार नाही, अशीही ग्वाही दिली. 
  • ‘आधार आर्थिक व अंशदान लाभ आणि सेवांचे उद्दिष्टाधारित वितरण विधेयक’ असे या विधेयकाचे नाव आहे.
  • हे धन विधेयक म्हणून लोकसभेत मंजूर झाल्याने राज्यसभेत त्यावर केवळ चर्चा होईल. वित्त विधेयकात दुरुस्ती करण्याचा अधिकार वरिष्ठ सभागृहाला (राज्यसभेला) नाही.
  • तसेच धन विधेयक मांडल्यानंतर त्यावर चौदा दिवसांच्या आत राज्यसभेत चर्चा झाली नाही तर ते मंजूर मानले जाते.

काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पात गळती

  • गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पातील २२० मेगावॉट ऊर्जानिर्मितीची क्षमता असणाऱ्या क्रमांक एकच्या अणुभट्टीमधून जड पाण्याची गळती झाल्याचे लक्षात येताच ती तातडीने बंद करण्यात आली.
  • अणुभट्टीच्या ‘कुलिंग सिस्टिम’साठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो, या पाण्याची गळती झाल्याने या प्रकल्पामध्ये तत्कालिक आणीबाणी लागू करण्यात आली असून.
  • सध्या प्रकल्पातील स्थिती नियंत्रणात असून, कोठेही किरणोत्सर्गाची गळती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तूर्तास हा प्रकल्प आणि त्याबाहेरील किरणोत्सर्गाचे प्रमाण नियंत्रणात आहे. 
 काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प 
  • काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प हा सुरत आणि तापी जिल्ह्याच्या सीमेवर व्यारा खेड्याजवळ आहे. भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे या प्रकल्पावर नियंत्रण आहे. 
  • काक्रापार आण्विक प्रकल्पामध्ये दोन अणुभट्ट्या असून, त्या ‘प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर’ म्हणून ओळखल्या जातात. या दोन्ही अणुभट्ट्या साधारणपणे नव्वदच्या दशकामध्ये कार्यान्वित झाल्या होत्या.

मुंबई बंदरातून विक्रमी वाहन हाताळणी

  • मुंबई बंदराने (मुंबई पोर्ट ट्रस्ट) इतिहासातील सर्वाधिक वाहन वाहतूक हाताळणी चालू आर्थिक वर्षांतील आतापर्यंतच्या कालावधीत नोंदविली आहे.
  • बंदरात एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान १,५३,६४७ वाहनांची चढ-उतार झाली. आधीच्या वर्षांतील याच कालावधीतील १,३९,८१२ वाहनांच्या तुलनेत यंदाची वाढ १८ टक्के राखली गेली आहे.
  • बंदराच्या ‘एम व्ही होग ट्रान्सपोर्टर’कडून नियंत्रित केले जाणाऱ्या फलाट क्रमांक २ वरून सर्वाधिक ५३७६ वाहनांची निर्यात झाली आहे.
  • सर्वाधिक निर्यातीमध्ये फोक्सवॉगन, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, अशोक लेलॅन्ड, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, जनरल मोटर्स यांची आघाडी राहिली.
  • वाहन निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्या निवारणासाठी एक समिती नियुक्त केली गेली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा