चालू घडामोडी : १३ मार्च

सांगलीच्या बेदाण्याला जीआय मानांकन

  • भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ‘सांगलीचा बेदाणा’ जीआय मानांकन (भौगोलिक उपदर्शन) देवून गौरवला आहे. जगभरात निर्यात करताना हे मानांकन हिरव्या, पिवळ्या बेदाण्याचे मुल्य वाढवणारे ठरेल.
  • केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाकडून देशातील वैशिष्टपूर्ण उत्पादनांना हे मानांकन दिले जाते. पहिले मानांकन दार्जिलिंगच्या चहाला मिळाले.
  • त्या यादीत आता सांगलीच्या बेदाण्याचा समावेश झाला. १९७२ पासूनची द्राक्ष लागवड, त्यावरील संशोधन अहवाल जोडून प्रस्ताव सादर केला होता.
  • इथली माती, पाणी व निसर्गाची रचना या गोष्टी द्राक्षनिर्मिती व त्यातून बेदाणा निर्मितीसाठी सर्वात आदर्श ठरल्या. त्यामुळे भौगोलिक उपदर्शन मानांकन मिळू शकले.
  • आता पाच ते सात जणांची समिती निकषांवर बेदाण्याची पडताळणी करेल. शेतकऱ्यांनी औषधांचा मारा कमी करून बेदाणा निर्मिती केली, आकार एकसारखा राहिला, रंग उत्तम असेल तर तो प्रमाणपत्रास पात्र ठरेल. 
 भौगोलिक उपदर्शन म्हणजे काय? 
    Geoagraphical Indications
  • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक उपदर्शन. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  • उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी व पेटंटची मान्यता दिली जाते, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक उपदर्शन (जीआय)ची मान्यता दिली जाते. 
  • एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शन या नावाने मिळतो.
  • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  • भौगोलिक उपदर्शन नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१ साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यू.टी.ओ.) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक उपदर्शन नोंदणी कायदा हा एक आहे.
  • आतापर्यंत महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सोलापूर चादर, सोलापूर टेरी टॉवेल, पुणेरी पगडी, नाशिकची वाईन, पैठणी साडी, कोल्हापुरी गुळ आणि नाशिकच्या द्राक्षांना अशा प्रकारचे जीआय मिळालेले आहे.
मानांकनाचे फायदे
  • जागतिक बाजारात मुल्यवर्धी 
  • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख 
  • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव

कर्ज बुडवणाऱ्यांसाठी सेबीची नवीन नियमावली

  • सहेतूक कर्ज बुडवणाऱ्यांपासून (विलफुल डिफॉल्टर) गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी सेक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या नियामक संस्थेने कर्जबुडव्या कंपन्या आणि व्यक्तींवर कठोर र्निबध लागू केले.
 नवीन नियमावली 
  • सहेतूक कर्जबुडव्यांना शेअर बाजारातून किंवा बाँडद्वारे सार्वजनिक निधी उभारणीस बंदी 
  • शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळावरील नियुक्तीस बंदी 
  • सहेतूक कर्जबुडव्यांना म्युच्युअल किंवा ब्रोकरेज कंपनी स्थापण्यासही मनाई तसेच कोणत्याही कंपनीचा ताबा घेणेही अशक्य
  • आर्थिक तपासणी अहवालाचा परिणाम स्वतंत्र कागदपत्राद्वारे प्रसिद्ध करणे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांवर बंधनकारक
  • रोखे आणि वस्तू बाजारांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी देखरेख यंत्रणा बळकट करण्यावर सेबी भर देणार.
  • शेअर दलाल आणि इतर मध्यस्थांच्या व्यवहारांवर काटेकोर नजर ठेवणार
 परिणाम 
  • सेबीने घातलेल्या र्निबधांमुळे सरकारी बँकांकडून घेतलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवणाऱ्या वादग्रस्त उद्योगपती विजय मल्या याच्यासारख्यांना विविध पदांचा राजीनामा देणे भाग पडणार आहे.
  • सेबीच्या र्निबधांमुळे येथून पुढे कर्जबुडव्यांना कोणत्याही संस्थांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती करता येणार नाही. तसेच त्यांना दुसऱ्या नोंदणीकृत कंपनीचा ताबा घेता येणार नाही.

‘द जंगल बुक’ चित्रपट हिंदीमध्येही

    The_Jungle_Book_2016
  • हॉलिवूडमधील ‘द जंगल बुक’ ऍनिमेटेड चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला असून, या चित्रपटातील पात्रांना प्रियांका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर आणि शेफाली शहा यांचा आवाज देण्यात आला आहे.
  • ‘द जंगल बुक’ हा चित्रपट ८ एप्रिलला प्रदर्शित होत असून, भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक नील सेठी मोगलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
  • दूरदर्शनवरील ‘मोगली’ या मालिकेतील ‘शेर खान’ या पात्राला नाना पाटेकर यांनी आवाज दिला होता. आता पुन्हा एकदा नाना ‘शेर खान’साठी (वाघ) आवाज देणार आहेत.
  • याशिवाय ओम पुरी हे मोगलीचा जीवलग मित्र ‘बगिरा’ (चित्ता), प्रियांका चोप्रा ही ‘का’ (अजगर) या पात्राला तर इरफान खान ‘बल्लू’ (अस्वल) या पात्राला आवाज देणार आहे. अभिनेत्री शेफाली ही ‘रक्षा’ (लांडगा) या पात्राला आवाज देईल. 
  • बिल मुरे, बेन किंग्सले, इदरिस एल्बा, ल्युपिटा न्योंगओ, स्कार्लेट जॉन्सन, क्रिस्तोफर वॉकेन आणि जियानकार्लो स्पोसितो यांनी इंग्रजीतील ‘द जंगल बुक’ला आवाज दिले आहेत.

जेएनयुच्या आठ विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द

  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रशासनाने देशद्रोहाच्या आरोपात अडकलेला विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार, उमर खालीद आणि अनिर्बन यांच्यासह आठ विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले आहे.
  • ९ फेब्रुवारीला विद्यापीठ परिसरात आयोजित कथित राष्ट्रविरोधी कार्यक्रमानंतर या आठ विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
  • त्यानंतर चौकशीसाठी स्थापित उच्चस्तरीय समितीने आपला तपास पूर्ण केल्यावर हे निलंबन रद्द करण्याचा निर्णय झाला.
  • चौकशी सुरू असल्याने विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता चौकशी संपल्याने ते पुन्हा वर्गात जाऊ शकतात; परंतु याचा अर्थ त्यांना क्लीन चिट देण्यात आली असा नाही.
  • प्रशासनातर्फे समितीच्या शिफारशींचे अध्ययन केल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या शिक्षेबाबत निर्णय घेतला जाईल. अफजल गुरूच्या फाशीविरुद्ध कार्यक्रमाच्या आयोजनानंतर ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

बांगलादेशमध्ये मोबाईल बॅंकिंग धोकादायक

  • मोबाईल बॅंकिंगसह एकूण इंटरनेटच्याबाबतीत बांगलादेश हा देश सर्वांत असुरक्षित असल्याची माहिती कॅस्परस्काय नावाच्या सॉफ्टवेअर सिक्युरिटी कंपनीने केलेल्या एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.
  • व्हायरसने बाधीत झालेल्या डिव्हाईसद्वारे नागरिकांची बॅंकिगसंबंधीची आणि अन्य खाजगी माहिती सर्वाधिक असुरक्षित आहे. त्या माहितीचा उपयोग करून बांगलादेशमध्ये गुन्हे घडविण्यात येतात.
  • बांगलादेशमधील नागरिकाने जर मोबाईल डिव्हाईसवरून ऑनलाईन बॅंकिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ऍण्ड्राईड ऍप डाऊनलोड करण्याची सूचना आणि लिंक दिसते. वास्तविक सायबर हल्ल्याच्या हेतूने ती लिंक दाखविण्यात येते.
  • त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये व्हायरस शिरतो. त्यातून मोबाईलधारकाच्या बॅंकिंगसंदर्भातील माहितीसह अन्य खाजगी माहिती हॅकर्सपर्यंत सहजपणे पोचते, असे या अहवालात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा