चालू घडामोडी : १५ मार्च

डेफएक्स्पो इंडिया-२०१६

    DefExpo India 2016
  • गोव्यात होणाऱ्या ‘डेफएक्स्पो इंडिया-२०१६’ प्रदर्शनाचे दिल्लीबाहेर पहिल्यांदाच गोव्यात आयोजन करण्यात आले आहे.
  • २८ ते ३१ मार्चदरम्यान दक्षिण गोव्यातील क्वेपेम तालुक्यातील नॅक्वेरी क्विटॉल येथे आयोजित करण्यात आलेले हे नववे प्रदर्शन आहे.
  • नौदल, पायदळ आणि अंतर्गत सुरक्षा प्रणालीच्या या प्रदर्शनात ४६ देशांमधील संरक्षण क्षेत्रातील ९७७ कंपन्या सहभागी होणार असून यासाठी या सर्व कंपन्यांनी नोंदणीही केली आहे.
  • भारतातील या नवव्या प्रदर्शनात अमेरिका, रशिया, स्वीडन, कोरिया प्रजासत्ताक, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात आणि पोर्तुगालसह ४६ देश सहभागी होत आहेत.
  • आठवे प्रदर्शन फेब्रुवारी २०१४ मध्ये आयोजित करण्यात आले होते. यातही देश-विदेशातील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी लक्षणीय सहभाग नोंदविला होता.

३४४ औषधांवर आरोग्य मंत्रालयाची बंदी

  • दोन किंवा त्यापेक्षा जास्त औषधांचे निश्चित मिश्रण असलेल्या किमान ३४४ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे.
  • या ३४४ औषधांवरील बंदी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे आणि मंत्रालयाने या संदर्भात राजपत्रात एक अधिसूचनाही जारी केली आहे.
  • सरकारच्या या अधिसूचनेनंतर ‘प्रॉडक्ट अ‍ॅण्ड गॅम्बल’ने (पी अ‍ॅण्ड जी) आपल्या लोकप्रिय ब्रॅण्ड ‘विक्स अ‍ॅक्शन ५०० एक्स्ट्रा’च्या उत्पादनावर आणि विक्रीवर त्वरित बंदी घातली आहे.
  • भारत सरकारने पॅरासिटामोल, फेनिलाफ्राईन आणि कॉफिन यांचे निश्चित खुराकांचे मिश्रण असणाऱ्या औषधींवर बंदी घातली आहे.
  • ‘विक्स अ‍ॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ हे उत्पादन सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत येते. त्यामुळे त्याच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी रेल्वेच्या ४ नवीन सुविधा

  • प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि रेल्वेची प्रणाली मजबूत करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्लीत ४ नवीन सेवा/उपक्रमांचा शुभारंभ केला.
    1. ई-कॅटरिंग सेवेची व्याप्ती ४५ प्रमुख स्थानकांवरुन ४०८ ‘अ’ श्रेणीच्या रेल्वे स्थानकांपर्यंत वाढवणे.
    2. मान्यताप्राप्त पत्रकारांसाठी सवलतीच्या पासच्या माध्यमातून ई-तिकिट आरक्षण सुविधा.
    3. वाहतूक क्षमतेमध्ये वाढ.
    4. कपूरथला येथील रेल्वे कोच कारखान्यामध्ये ॲक्रुअल अकाउंटिंग आणि अपग्रेडेड कॉस्टिंग प्रणाली सुरु करण्यासाठी पथदर्शी अभ्यासाचा प्रारंभ.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी बांतुलचा वापर

  • पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच दशकांपासून आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या ‘बांतुल द ग्रेट’ या व्यंग्यचित्राचा वापर करून आयोगाने विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 
  • ‘बांतुल द ग्रेट’ ही व्यंग्यचित्र मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि सध्या पश्चिम बंगालमधील हावडा विधानसभा मतदारसंघात त्याचा वापर सुरू केला आहे.
  • आयोगाने बांतुलचा वापर विविध होर्डिंग्ज, वर्तमानपत्रातील जाहिराती आणि दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमध्येही केला आहे. या जाहिरातींमध्ये बांतुल मतदारांना त्यांच्या लोकशाही हक्काची जाणीव करून देतो.
  • तसेच, पैसे देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही देत आहे. राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार नागरिकांनी वापरला पाहिजे, अशी विनंती बांतुल जाहिरातींमधून करत आहे. 
  • या चित्रमालिकेतीलच केल्तू, नॉन्टे आणि फॉन्टे या पात्रांचाही योग्य वापर आयोगाने केला आहे. एका जाहिरातीमध्ये केल्तू हा मतदारांना पैसे देऊन भुलविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, नॉन्टे आणि फॉन्टे प्रशासनाला याबाबत माहिती देतात.
  • ‘बांतुल द ग्रेट’ ही ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार नारायण देवनाथ यांची कलाकृती आहे. ते हावडाचे रहिवासी आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना बांतुल, केल्तू, नॉन्टे आणि फॉन्टे ही पात्रे इतर कोणाही पेक्षा अधिक जवळचे वाटतात.

विजय मल्याच्या मालमत्तांचा लिलाव

  • स्वतःला 'किंग ऑफ गुड टाइम्स' म्हणवून घेत तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवणाऱ्या विजय मल्याच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.
  • मल्ल्यांचे खासगी विमान एसीजे ३१९ जेट विकून व्याज आणि दंडासह ८१२ कोटी रुपयांचा सेवाकर वसूल करण्याचा सरकारचा विचार आहे.
  • या एअरबससोबतच, किंगफिशर एअरलाइन्सची पाच छोटी विमाने आणि तीन हेलिकॉप्टर विकण्याचाही सरकारचा मानस आहे.
  • एका साधारण एअरबस ए-३१९ ची किंमत ६०० कोटींच्या आसपास असते. मल्ल्यांकडून सेवाकर विभागाला ८१२ कोटी रुपये वसूल करायचेत. त्यातील बहुतांश किंवा संपूर्ण रक्कमही लिलावातून मिळू शकते.

लिन डॅन सहाव्यांदा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता

  • आपल्याच देशाच्या तिआन होवेईला २१-९, २१-१० असे सहज पराभूत करत चीनच्या लिन डॅनने सहाव्यांदा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
  • तियानने आपल्याच देशाच्या डॅनला पराभूत करण्याचा सातव्यांदा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. लिन डॅनची ही ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची नववी वेळ होती.
  • चार वर्षांपूर्वी त्याने ही स्पर्धा जिंकली होती. १२ वर्षांपूर्वी डॅनने पहिले ऑल इंग्लंड विजेतेपद पटकाविले होते.
  • या विजयामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून आपल्या ऑलिम्पिक पदकांची संख्या तीन करण्याची त्याची आता इच्छा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा