चालू घडामोडी : २० मार्च

आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरमीतसिंगला सुवर्णपदक

  • आशियाई २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकत भारताच्या गुरमीतसिंगने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
  • ३० वर्षीय गुरमितसिंगने २० किलोमीटर अंतर १ तास २० मिनिटे आणि २९ सेकंदांत चालून पूर्ण केले. त्याने जपानच्या इसामु फुजिसावा (१ तास २० मिनिटे ४९ सेकंद) याला मागे टाकत विजेतेपद पटकावले.
  • ३४ वर्षांच्या इतिहासात आशियाई अजिंक्यपद तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिलाच भारतीय धावपटू आहे.
  • हकम सिंग यांनी १९७८ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत २० किमी रोड रेसमध्ये, तर चंदराम यांनी १९८२ मध्ये याच प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
  • २०११ मध्ये याच स्पर्धेत गुरमीतला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. कामगिरीत सुधारणा करत २०१२मध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली.
  • २०१३ आणि २०१४ मध्ये त्याला कांस्यपदक मिळाले. गेल्या वर्षी त्याला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • या विजयासोबतच गुरमितने आपले रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील स्थान पक्के केले आहे. नऊ धावपटू आतापर्यंत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून, नऊपैकी केवळ तिघांचेच रिओवारीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

प्रणॉयला स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

  • आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये भारताचा उगवता तारा असलेल्या एचएस प्रणॉयने स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
  • प्रणॉयचे हे ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे दुसरे विजेतेपद ठरले. प्रणॉयने २०१४मध्ये इंडोनेशिया ओपन ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
  • १३व्या मानांकित प्रणॉयने ४५ मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या मार्क ज्वेबलरला २१-१८, २१-१५ असे नमवले. जागतिक क्रमवारीत प्रणॉय २७व्या, तर मार्क १९व्या स्थानावर आहे.
  • गेल्या वर्षी ही स्पर्धा भारताच्या के. श्रीकांतने जिंकली होती. सलग दुसऱ्या वर्षी भारतीय खेळाडूने या स्पर्धेत बाजी मारली. 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हिंदुजा बंधू

  • ब्रिटनमध्ये असलेल्या आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हिंदुजा बंधू पहिल्या क्रमांकावर आहेत. लागोपाठ चौथ्या वर्षी त्यांचा पहिला क्रमांक असून व्यक्तिगत संपत्ती १६.५ अब्ज पौंड आहे.
  • यादीची क्रमवारी ठरवताना ब्रिटनमधील आशियायी व्यक्तींचा विचार केला जातो. ही यादी एशियन मीडिया अँड मार्केट यांच्या वतीने प्रसारित केली जाते.
  • पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मित्तल यांची संपत्ती ३.३ अब्ज पौडांनी कमी झाली असून ती ६.४ अब्ज पौंड आहे.
  • या वर्षीच्या विश्लेषणानुसार श्रीमंत आशियायी व्यक्तींचे उत्पन्न २०१५ मध्ये ५४.४८ अब्ज पौंड होते ते आता ५५.५४ अब्ज पौंड झाले आहे.
  • श्रीप्रकाश लोहिया यांचा तिसरा क्रमांक लागला. त्यांची संपत्ती ३ अब्ज पौंड आहे. 

हरदीप रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र

  • भारताचा मल्ल हरदीपने (९८ किलो) कुस्तीच्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक मिळवले. यासह तो रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
  • रिओ ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताचे तीन कुस्तीपटू पात्र ठरले आहे. यापूर्वी योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव रिओसाठी पात्र ठरले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा