चालू घडामोडी : २७ मार्च

पाकिस्तानचे तपास पथक भारतात दाखल

  • पठाणकोट येथील हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचे तपास पथक (जेआयटी) २७ मार्च रोजी भारतात दाखल झाले.
  • या पथकात पाकिस्तानी गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्याही एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
  • २ जानेवारी रोजी पठाणकोट येथील हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप असून त्यात सुरक्षा दलाचे ७ कर्मचारी मारले गेले होते.
  • एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाकरिता पाकिस्तानच्या गुप्तचर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख (सीटीडी) महंमद ताहीर राय हे या पथकाचे प्रमुख आहेत.
  • लाहोरच्या जनरल गुप्तचर यंत्रणेचे उपसंचालक महंमद अझिम अर्शद, आयएसआयचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल तन्वीर अहमद, लष्करी गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा आणि गुजरानवाला येथील सीटीडीचे तपास अधिकारी शाहीद तन्वीर आदींचा पथकात समावेश आहे.
  • हे पथक २९ मार्च रोजी पठाणकोटला जाणार आहे. तत्पूर्वी २८ मार्च रोजी ते राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या मुख्यालयात जाणार असून तेथे सुमारे ९० मिनिटे त्यांच्यासमोर हल्ल्याच्या तपासाबाबत सादरीकरण केले जाणार आहे.
  • या सहकार्याच्या बदल्यात भारतीय तपास पथकाला पाकिस्तानात जाऊन तपास करण्याची परवानगी मिळावी, अशी भारताची अपेक्षा आहे.

भारताचे हवाईदल प्रमुख इस्राईलच्या दौऱ्यावर

  • भारताचे हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल अरुप राहा हे चार दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
  • भारत व इस्राईलमधील लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही भेट होत असून; या दौऱ्यादरम्यान राहा हे इस्राईलचे संरक्षण मंत्री मोशे यालून यांची भेट घेणार आहेत.
  • संरक्षण मंत्र्यांबरोबरच राहा हे इस्राईलच्या अनेक लष्करी उच्चाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

उत्तराखंडमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट

  • कॉंग्रेसच्या नऊ आमदारांनी बंड पुकारल्यामुळे अस्थिर बनलेल्या उत्तराखंडमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घेतला आहे.
  • केंद्राने तशी शिफारस केल्यानंतर कलम ३५६ अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
  • उत्तराखंडमध्ये नऊ आमदारांच्या बंडखोरीनंतर राजकीय परिस्थिती अस्थिर बनली होती. राज्यपाल के. के. पॉल यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री हरीश रावत यांना २८ मार्चपर्यंत मुदत दिली होती.
  • परंतु बहुमत सिद्ध करण्याच्या एक दिवस अगोदरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 
  • उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असली तरी विधानसभा बरखास्त करण्यात आलेली नाही.

निदा फाजली यांना उर्दू अकादमीचा पुरस्कार

  • उर्दू अकादमीचा मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार प्रसिद्ध शायर निदा फाजली यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांना अमिर खुसरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
  • याशिवाय विविध क्षेत्रांतील पाच जीवनगौरव पुरस्कार आणि दोन राष्ट्रीय एकता पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
 प्रमुख पुरस्कार 
  • डॉ. सुराग मेहंदी राष्ट्रीय एकता पुरस्कार : अख्तरुल वासे आणि डॉ. सगीर अफ्राहीम 
  • अमिर खुसरो पुरस्कार : माजी राज्यपाल अझीझ कुरेशी 
  • प्रेमचंद पुरस्कार  : डॉ. अली अहमद फातिमी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा