चालू घडामोडी : ३१ मार्च

कर्जबुडव्यांची यादी सर्वोच्च न्यायालयात सादर

  • रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ७२ बड्या कंपन्यांच्या समावेश असलेली कर्जबुडव्यांची यादी सर्वोच्च न्यायालयात सादर केली. त्यांच्याकडे ५,५३,१६७ कोटींचे कर्ज थकीत आहे.
  • ७२ पैकी ४० कंपन्यांनी तीन वर्षात थोडी देखील कर्जाची रक्कम भरलेली नाही. त्यामध्ये पाच बड्या कंपन्यांवर रु. १.४ लाख कोटींचे कर्ज आहे.
  • बड्या करबुडव्यांची नावे जाहीर केल्यास त्याचा सध्याचे कर्मचारी व व्यावसायिक या दोहोंवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आरबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
यादीतील पाच प्रमुख कंपन्या
कंपनीचे नाव कर्ज
अदानी पॉवर ४४,८४० कोटी
लॅन्को इन्फ्रा ३९,८९० कोटी
जीव्हीके पॉवर २५,०६२ कोटी
सुझलॉन १८,०३५ कोटी
एचसीसी १२,१७० कोटी

भारत उपांत्य सामन्यात पराभूत

  • वेस्ट इंडिजने टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्यात यमजान भारतावर सात गडी राखून मात करत अंतिम सामन्यात धडक मारली. ३ एप्रिल रोजी इडन गार्डन्सवर रंगणाऱ्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा सामना इंग्लंडशी होईल.
  • भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १९२ धावा केल्या. कोहलीने ४७ चेंडूंमध्ये एक षटकार व ११ चौकारांसह नाबाद ८९ धावा केल्या. कोहलीने कर्णधार धोनीसह ४.३ षटकांत नाबाद ६४ धावांची भागीदारी केली.
  • आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या विंडीजच्या सिमॉन्सने ५१ चेंडूंत पाच खणखणीत षटकार व सात चौकारांसह नाबाद ८३ धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याला जॉन्सन चार्ल्स (५२) व आंद्रे रसेल (नाबाद ४३) यांची साथ लाभली.
  • या सामन्यात नाबाद ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत विरत कोहलीने टी-२० करीयर मधील आपले १६ वे अर्धशतक केले.
  • या अर्धशतकाबरोबरच टी-२०मध्ये १६ अर्धशतकं ठोकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ब्रेण्डन मॅक्युलमचा १५ आणि  विंडिजच्या ख्रिस गेलचीही १५ अर्धशतकांचा विक्रम मोडला आहे.
  • विंडीजच्या महिलांनी संघानेही वर्ल्ड टी-२०च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

  • दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण, कुपोषण या सामाजिक विकास निर्देशांक तसेच प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रतन टाटा यांच्या उपस्थितीत विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात हे करार करण्यात आले.
  • राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात राज्य शासनाबरोबर काम करण्यात येणार आहे. अनेक सुविधा टाटा ट्रस्ट शासनाला विनामुल्य उपलब्ध करून देणार आहेत.

युरियाच्या उत्पादनात विक्रमी वाढ

  • देशात यंदा युरियाचे उत्पादन २४५ लाख टन झाले असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख टन एवढी विक्रमी वाढ झाली आहे.
  • आगामी तीन वर्षांत भारताला युरिया उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्याचे उद्दिष्ट खत उत्पादक कंपन्यांनी गाठावे, असे आवाहन 
  • गेल्या वर्षी जूनपासून युरिया धोरण लागू झाल्यानंतरची ही वाढ आहे. म्हणजे केवळ नऊ महिन्यांत उत्पादनात मोठी वाढ झाली.
  • युरियाची देशांतर्गत गरज ३१० लाख टनांची असून दर वर्षी ८० लाख टन युरियाची आयात होते. यंदाच्या विक्रमी वाढीमुळे युरियाची आयात ६० ते ६५ लाख टन एवढीच असेल.

 ‘टाटा स्टील’ची ब्रिटनमधील व्यवसायाची विक्री

  • ‘टाटा स्टील’ या भारतातील आंतराष्ट्रीय कंपनीने ब्रिटनमधील आपल्या संपूर्ण व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • प्रामुख्याने स्टीलच्या घसरत्या किंमती, वाढता उत्पादन खर्च आणि चीनशी निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे कंपनीला तेथील व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
  • कंपनीच्या या निर्णयामुळे अनेकांच्या नोकऱ्या व रोजगार धोक्यात येणार आहेत. ब्रिटनमध्ये टाटा स्टीलमध्ये १५,००० कर्मचारी कार्यरत आहेत.
  • गेल्या वर्षभरात कंपनीची ब्रिटनमधील कामगिरी अत्यंत ढासळली आहे. स्टील उद्योगाला मागणी कमी झाली असून भविष्यातदेखील सुधारणेचे कोणतेही संकेत नसल्याने कंपनीने लवकरात लवकर व्यवसायाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकातामध्ये फ्लायओव्हर कोसळला

  • उत्तर कोलकाता शहरात २ कि.मी. लांब निर्माणाधीन फ्लायओव्हर कोसळून त्याखाली किमान २१ जण ठार तर सुमारे ८८ जण जखमी झाले आहेत.
  • कोलकात्यातील सर्वात मोठा घाऊक बाजार असलेल्या बडाबाजारजवळील टागोर मार्गावर ही घटना घडली. अतिशय दाट वस्ती असलेला हा भाग आहे.
  • पुलाचा भाग कोसळला तेव्हा त्याच्याखाली मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या. तसेच काही दुकान देखील गाडली गेली आहेत.
  • पश्चिम बंगाल राज्य सरकार मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख तर गंभीर जखमींना तीन लाख रुपयांची मदत देण्यासह जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा