चालू घडामोडी : ९ मार्च

दूरसंचार कंपन्यांचा ४६,००० कोटींचा घोटाळा

    CAG
  • देशातील सहा प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ४६,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे.
  • रिलायन्स कम्युनिकेशन्स, आयडिया, टाटा, एअरटेल, व्होडाफोन व एअरसेल कंपन्यांनी वर्ष २००६-०७ आणि वर्ष २००९-१० दरम्यान मिळालेल्या उत्पन्नाचा खोटा आकडा दाखवला असा कॅगचा आरोप आहे. 
  • कॅगने या सहा कंपन्यांच्या जमाखर्चाच्या केलेल्या परीक्षणानुसार, या कंपन्यांनी वर्ष २००६-०७ आणि वर्ष २००९-१० दरम्यान आपल्या खात्यावर ४६,००० कोटी रुपयांचे उत्पन्न कमी करुन दाखवले आहे. शिवाय, सरकारचा १२,४०० कोटी रुपयांचा हिस्सा नाकारला आहे. 
  • सरकारने २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात धोरणातील चुका लक्षात घेऊन तोट्याचे अनुमान लावले होते. परंतु यावेळी कॅगने सर्व दूरसंचार कंपन्यांचे जमाखर्चाचे परीक्षण करुन प्रत्यक्ष आकडेवारी काढली आहे.
  • २००९ साली दूरसंचार कंपन्यांचा जमाखर्च तपासण्यास कॅगला बंदी घालण्यात आली होती. परंतु न्यायालयात झालेल्या खटल्यानंतर पुन्हा २०१४ साली कॅगला त्यासाठी परवानगी देण्यात आली.

जावेद अख्तर डॉ. ऑर्थोचे ब्रँड अम्बेसेडर

  • वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित अशा दिवासा हर्बल केअर कंपनीच्या डॉ. ऑर्थो या प्रसिद्ध ब्रँडचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून विख्यात लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना नेमण्यात आले आहे.
  • त्यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या जाहिरातीचे चित्रीकरणही कंपनीने नुकतेच पूर्ण केले असून ते लवकरच वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवर प्रदर्शित होणार आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगला पाच कोटीचा दंड

    Art Of Living, Sri Sri Ravishankar
  • आर्ट ऑफ लिव्हिंग प्रतिष्ठानचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित केलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवाला राष्ट्रीय हरित लवादाने काही अटींवर मंजुरी दिली.
  • त्याचवेळी या कार्यक्रमामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाची भरपाई म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग प्रतिष्ठानला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • त्याचबरोबर दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपले काम चोखपणे न केल्यामुळे त्यांना एक लाख रुपयांचा आणि दिल्ली विकास प्राधिकरणाला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • यमुना नदीमध्ये कोणतेही दुषित पाणी सोडण्यात येणार नाही आणि पर्यावरणाचा आणखी ऱ्हास होईल, अशी कोणतीही कृती करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र गुरुवारी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्याचे आदेश आर्ट ऑफ लिव्हिंग प्रतिष्ठानला देण्यात आले आहेत.
  • सदर कार्यक्रम यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. या क्षेत्रात बांधकाम करण्यासाठी वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक का नाही, ते प्रतिज्ञापत्र सादर करून स्पष्ट करावे असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्र सरकारला दिला आहे.
  • एनजीटीचे अध्यक्ष : न्या. स्वतंत्रकुमार 

विजय मल्ल्याचे देशातून पलायन

  • कर्जबुडवेगिरीसंदर्भातील प्रकरणामध्ये आरोपी असलेले किंगफिशर एअरलाईन्स या बुडीत कंपनीचे संचालक उद्योगपती विजय मल्ल्या यांनी देश सोडल्याची माहिती महाधिवक्ते मुकुल रोहतागी यांनी दिली आहे. 
  • केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) यासंदर्भात माहिती विचारल्यानंतर मल्ल्यांनी देश सोडल्याची माहिती मिळाल्याचे रोहतागी यांनी स्पष्ट केले. 
  • मल्ल्या यांचे पारपत्र जप्त करुन त्यांना हा देश सोडण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी मल्ल्या यांनी कर्ज घेतलेल्या १७ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये केली होती.
  • मागील महिन्यामध्ये मल्ल्यांनी ‘युनायटेड स्पिरिट्‌स’ या मद्य कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मल्ल्या यांनी ब्रिटनमध्ये स्थायिक होण्याचा मानस व्यक्त केला होता. 
  • मल्ल्या यांनी ‘युनायटेड स्पिरिट्‌स’ या कंपनीचे अध्यक्षपद सोडल्याच्या बदल्यात ब्रिटनमधील ‘दिएगो’ कंपनी त्यांना ५१५ कोटी रुपये देणार होती. ‘युनायटेड स्पिरिट्‌स’ या कंपनीची स्थापना मल्ल्या यांच्या कुटुंबीयांनी केली असून, आता तिच्यावर ‘दिएगो’चे नियंत्रण आहे.

श्रीलंका निवड समितीच्या अध्यक्षपदी अरविंदा डिसिल्व्हा

  • नुकत्याच झालेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका संघाचा झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंकेची राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती बरखास्त करण्यात आली आहे.
  • या निवड समितीची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता नवी समिती माजी क्रिकेटपटू अरविंदा डिसिल्व्हा यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली आहे.
  • त्याच्यासह कुमार संगकारा, रोमेश कालुविथरणा व ललित कालुपेरुमा यांचा या नव्या समितीत समावेश असेल. १९८० मध्ये श्रीलंकेचा कसोटीपटू म्हणून खेळलेल्या रणजीत मदुरासिगेचा समावेशही या समितीत करण्यात आला आहे.
  • नव्या निवड समितीने मलिंगाला दुखापतीमुळे कर्णधारपद सोडण्यास सांगितले. आशिया कपमध्ये दुखापतीमुळे मलिंगा खेळू शकला नाही. त्याच्याजागी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजचा श्रीलंकेचा कर्णधार म्हणून समावेश करण्यात आला आहे.
  • २०१४मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा कर्णधार म्हणून मलिंगा होता आणि त्यावेळी श्रीलंकेने ती स्पर्धा जिंकली होती.

नेपाळी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शेर बहादूर देऊबा

  • नेपाळी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी तीन वेळा पंतप्रधान राहिलेले शेर बहादूर देऊबा यांची निवड झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या १३व्या राष्ट्रीय सर्वसाधारण अधिवेशनात त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
  • देऊबा यांना १८२२ मते मिळाली असून, हंगामी अध्यक्ष असलेले रामचंद्र पौड्याल यांना १२९६ मते मिळाली. एकूण ३१४० इतके मतदान झाले. त्यात ३११८ मते वैध होती. नेपाळी काँग्रेसच्या घटनेननुसार अध्यक्षीय निवडणूक जिंकण्यासाठी ५० टक्के मते मिळणे आवश्यक असते.
  • देऊबा यांचा पक्षाध्यक्षपदासाठी हा तिसरा प्रयत्न होता. दिवंगत गिरिजाप्रसाद कोईराला व सुशील कोईराला यांनी त्यांचा २००० व २०१० मध्ये पराभव केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा