चालू घडामोडी : २२ एप्रिल

एफडीआय खेचण्यात भारताने चीनच्या पुढे

  • परकीय गुंतवणूक खेचून आणण्याच्या स्पर्धेत भारताने चीनला मागे टाकले आहे. २०१५मध्ये भारतात विविध क्षेत्रातील ६३ अब्ज डॉलर्सच्या एफडीआय गुंतवणूकीच्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे.
  • भारतातील एफडीआय प्रकल्पांची संख्या ८ टक्क्यांनी वाढून ६९७ झाली आहे. फॉक्सकॉन आणि सन एडीसन या कंपन्यांनी भारतामध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे.
  • फॉक्सकॉन भारतामध्ये ५ अब्ज डॉलर्स आणि सन एडीसन ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आणि अपारंपारिक ऊर्जा या क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणावर एफडीआय येणार आहे. 
  • २०१५ मध्ये संपूर्ण जगामध्ये भारताने पहिल्यांदा एफडीआय गुंतवणूकीत आघाडी घेतली होती. भारताने त्यावेळी अमेरिका आणि चीनपेक्षा जास्त एफडीआय गुंतवणूक खेचून आणली होती.
  • २०१५मधील एफडीआय गुंतवणूकीच्या दहा सर्वोत्तम ठिकाणांमध्ये पाच ठिकाणे भारतातील आहेत. 
  • परकीय गुंतवणूकदारांनी गुजरातमध्ये १२.४ अब्ज तर महाराष्ट्रामध्ये ८.३ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची तयारी दाखवली आहे.  

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट बरखास्त

  • उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकार राष्ट्रपती राजवट लागू करून खाली खेचण्याचा केंद्र सरकारचा निर्णय तेथील उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
  • न्यायालयाने कॉंग्रेस नेते हरीश रावत यांना उत्तराखंड सरकारचा कार्यभार सांभाळण्यास सांगताना २९ एप्रिलला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे निर्देशही दिले. 
  • उत्तराखंडमध्ये २७ मार्चला लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयांच्या विरोधात असल्याचेही उत्तराखंड उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
  • उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला कॉंग्रेसचे नेते हरीश रावत यांनी आव्हान दिले होते. 
  • ९ बंडखोर कॉंग्रेस आमदारांच्या अपात्रतेविषयी न्यायालयाने सांगितले, की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे घटनात्मक पाप आहे. आमदारांना सदस्यत्व गमावून या पापाची किंमत मोजावी लागेल. बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आता २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

शी जिनपिंग चीनचे लष्करप्रमुखही

  • चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आता चीनचे लष्करप्रमुखही (कमांडर इन चीफ) झाले आहेत.
  • शी यांच्याकडे याआधीच कम्युनिस्ट पक्षाचे महासचिवपद (जनरल सेक्रेटरी) आणि ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधील लष्करी अधिकाऱ्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपद आहे.
  • दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कावरुन सुरु असलेला राजनैतिक संघर्ष अधिकाधिक आक्रमक होण्याची चिन्हे असतानाच शी यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारण्यासंदर्भात घेतलेल्या या निर्णयाचे जागतिक राजकारणामध्ये मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सर्वात सुंदर महिला म्हणून जेनिफर अॅनिस्टनची निवड

  • पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली आहे. 
  • पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय जेनिफरचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकन टेलिव्हीजनवरील 'फ्रेंडस' या शो मधील रेचल हे तिचे पात्र गाजले. या शो मधील भूमिकेमुळे जेनिफरला नाव, प्रसिद्धी मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा