चालू घडामोडी : १९ मे

वूमन : ही फॉर शी टपाल तिकीट जारी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वुमन : ही फॉर शी’ हे टपाल तिकीट संयुक्तरित्या जारी करण्यासंदर्भातली माहिती देण्यात आली.
  • टपाल खाते आणि संयुक्त राष्ट्रसंघ टपाल प्रशासन (UNPA) यांच्यात या उद्देश्याने फेब्रुवारी २०१६मध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हे तिकीट संयुक्तरित्या जारी करतांना, २० से-टेनांटसचे पान तसेच २ तिकीटे असलेल्या छोट्या पानाच्या स्वरुपात ही तिकीटे छापण्यात आली.
 वूमन : ही फॉर शी 
  • संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘वूमन : ही फॉर शी’ हा उपक्रम लिंग समानतेसाठी एकता दर्शवणारी चळवळ आहे.
  • सर्व सामाजिक व्याख्यांच्या संदर्भातील फायद्यांसाठी मानवजातीतील अर्ध्या भागाचा दुसऱ्या भागाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आणण्याची ही चळवळ आहे.
  • हे संयुक्तरित्या जारी केलेले तिकीट जगभरातल्या सर्व महिलांच्या सक्षमीकरणाला समर्पित करण्यात आले आहे. यामुळे भारत सरकार ठामपणे समर्थन देत असलेल्या लिंग समानतेच्या मुद्याला मोठी चालना मिळेल.
  • अशाप्रकारे, टपाल खाते आणि UNPA यांच्यात ८ मार्च २०१६ हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याकरता संयुक्त टपाल तिकीट जारी करण्याबाबत एकमत झाले आहे.

बंगळुरूमध्ये अॅपल सॉफ्टवेअर प्रयोगशाळा उभारणार

  • नवोद्योगांना (स्टार्टअप्स) तसेच विकासकांना पाठिंबा देण्यासाठी बंगळुरू येथे सॉफ्टवेअर प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा अॅपल कंपनीने केली आहे.
  • अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक हे प्रथमच चार दिवसांच्या भारतभेटीवर आले आहेत. त्यादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. 
  • बंगळुरू येथे अॅप रचना व विकास केंद्राची सुरूवात २०१७च्या सुरुवातीला होणार आहे. त्याचप्रमाणे अॅपलतर्फे हैदराबाद येथे विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
  • १९ मे रोजी पहाटे कूक यांनी मुंबईत सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. तर रात्री त्यांच्यासाठी अभिनेता शाहरूख खानने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनेक बॉलिवुड कलाकार उपस्थित होते.

गोध्रा जळीतकांडाच्या प्रमुख आरोपीस अटक

  • गुजरातमध्ये गोध्रा येथे २००२ मध्ये रेल्वे जळीतकांडाच्या घटनेत गेली चौदा वर्षे फरारी असलेल्या प्रमुख आरोपीस गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे.
  • गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणावर दंगली उसळल्या होत्या. या प्रकरणात फारूक महंमद भाना हा प्रमुख आरोपी होता. त्याने २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे पेटवून देण्याचा कट रचला होता.
  • दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वे जाळण्यात आली, तेव्हा भाना हा गोध्राचा नगरसेवक होता. अटक टाळण्यासाठी तो मुंबईत आला व तेथे मालमत्ता एजंट म्हणून काम करीत होता.
  • मुंबईहून गोध्राकडे जात असताना पंचमहाल जिल्ह्यात कलोल शहरात टोल नाक्याजवळ आला असता त्याला अटक करण्यात आली.
  • गोध्रा जळीतकांडातील आरोपपत्रात भाना याच्यावर संबंधित रेल्वेचा ‘एस ६’ डबा जाळण्याच्या कटात हात असल्याचा उल्लेख आहे.
  • गोध्रा येथील रेल्वे जळीतकांडात साबरमती एक्सप्रेसचा ‘एस ६’ डबा जाळण्यात आला होता. त्यात ५९ लोक मरण पावले होते. त्यानंतर गुजरात राज्यात दंगली झाल्या व त्यात एक हजाराहून अधिक लोक मारले गेले होते.

ओपीआयसी संचालक मंडळावर देवेन पारेख

  • अमेरिकन सिनेटने ओव्हरसीज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या (ओपीआयसी) संचालक मंडळावर भारतीय-अमेरिकी उद्योगपती देवेन पारेख यांची नियुक्ती केली आहे.
  • अध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये देवेन पारेख यांचे नाव निश्चित केले होते. 
  • ते सध्या न्यूयॉर्कस्थित प्रायव्हेट इक्विटी अँड व्हेंचर कॅपिटल कंपनी 'इनसाईट व्हेंचर पार्टनर्स‘चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. २००१ पासून ते या पदावर आहेत.
  • ओपीआयसी ही अमेरिकन सरकारची वित्तीय संस्था आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा