चालू घडामोडी : २२ मे

बीसीसीआय अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची एकमताने निवड झाली. ते बीसीसीआयचे आत्तापर्यंतचे सगळ्यात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
  • ४१ वर्षीय अनुराग ठाकूर हे भाजपचे खासदार असून हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 
  • शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष झाल्यामुळे भारतीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांची जागा ठाकूर घेतील.
  • सध्या पूर्व विभागाची अध्यक्षपदाची वेळ आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या उमेदवारीस सूचक तसेच अनुमोदक पूर्व विभागातील असणे आवश्यक आहे.
  • ठाकूर यांना पूर्व विभागातील बंगाल, आसाम, झारखंड, त्रिपुरा तसेच नॅशनल क्रिकेट क्लब या सर्व संघटनांनी एकमताने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित होती.
  • ठाकूर बिनविरोध अध्यक्ष झाल्यावर रिक्त झालेल्या सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीसी) अध्यक्ष अजय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

किरण बेदी पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल

    Kiran Bedi
  • माजी आयपीएस अधिकारी आणि भाजपच्या नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मागील जवळपास दोन वर्षांपासून या राज्याचा अतिरिक्त भार अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालांकडे होता. 
  • नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरीमध्ये कॉंग्रेस आघाडीचा विजय झाला असून, त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या असलेल्या बेदी यांची नायब राज्यपाल पदावर नियुक्ती होणे महत्त्वपूर्ण मानले जाते.
  • मोदी सरकारने सूत्रे स्वीकारताच पुद्दुचेरीचे तत्कालीन नायब राज्यपाल वीरेंद्र कटारिया यांना हटविले होते. कॉंग्रेस आघाडीने कटारिया यांची या नियुक्ती केल्याला त्या वेळी फक्त एक वर्षच झाले होते.
  • यानंतर अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ले. जन. अजयसिंह यांना पुद्दुचेरीची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. 
 किरण बेदी यांच्याविषयी 
  • १९७२च्या तुकडीच्या किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी असून, त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे नेतृत्व केले होते.
  • बेदी यांनी पोलिस सेवेतून २००७मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्या वेळी त्या पोलिस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक पदावर होत्या.
  • क्रीडाप्रेमी आणि लेखिका असलेल्या बेदी यांना पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कारही मिळालेला आहे. तसेच, त्यांना यूएन पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

सेबीने पी-नोटचे नियम कडक केले

  • परदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक करता यावी यासाठी तयार करण्यात आलेली पार्टिसिपेटरी नोटची (पी-नोट) सुविधा वादात सापडल्यामुळे भांडवल बाजार नियंत्रक सेबीने अखेर पी-नोटचे नियम कडक केले आहेत.
  • काळ्या पैशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या शिफारसींनुसार सेबीने खालील नियम तयार केले आहेत.
  • पी-नोट घेणाऱ्या सर्व परदेशी गुंतवणूकदारांना भारतातील काळा पैसा प्रतिबंधक कायद्याचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
  • पी-नोटच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनाला आल्यास या पी-नोट जारी करणाऱ्यांना त्याची माहिती तात्काळ देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • पी-नोट जारी करणाऱ्यांना यापुढे पी-नोटमधून देशात येणाऱ्या पैशाचा कालबद्ध आढावा घ्यावा लागणार आहे. हा आढावा घेऊन त्याचा अहवाल दर महिन्याला सेबीला देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
  • पी-नोट जारी करताना व त्याचा वापर करून देशात गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची ढिलाई यापुढे सहन केली जाणार नाही, असेही सेबीने बजावले आहे.

भारत आणि ओमान दरम्यान चार महत्त्वपूर्ण करार

  • भारत आणि ओमान यांनी आज द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने लष्करी सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करताना चार महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. 
  • संरक्षण सहकार्य, समुद्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध, समुद्राशी संबंधित मुद्दे आणि उड्डाण सुरक्षा माहितीची देवाणघेवाण यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
  • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पहिल्यांदाच मध्य पूर्वेतील जवळचा देश असलेल्या ओमानच्या दौऱ्यावर पोहचल्यानंतर हे करार झाले.
  • ओमानमधील नेतृत्वाशी झालेल्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व मुद्यांवर बोलणी झाली. त्याचप्रमाणे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढविण्यावर दोन्ही देशांनी सहमतीही दर्शविली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा