चालू घडामोडी : १५ जून

भारतासंबंधी विधेयक अमेरिकन सिनेटने फेटाळले

  • भारतास ‘व्यूहात्मक व संरक्षणात्मक क्षेत्रातील जागतिक भागीदार’ असे विशेष स्थान देण्यासंदर्भातील तरतूद असलेले विधेयक अमेरिकेमधील सिनेटने फेटाळून लावले. 
  • हा प्रस्ताव संमत झाल्यास भारतास अमेरिकेचा व्यूहात्मक व संरक्षणात्मक क्षेत्रातील जागतिक भागीदार देश असा दर्जा मिळणार होता.
  • मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर भारताला अमेरिका ‘मेजर डिफेन्स पार्टनर’ करून घेणार असल्याची घोषणा केली होती. 
  • यामुळे अमेरिकेच्या अत्यंत निकटवर्तीय मित्रदेशांना पुरविण्यात येणाऱ्या संरक्षणविषयक तंत्रज्ञान व व्यापारासाठी भारत पात्र ठरणार होता 
  • एनडीएएला सिनेटने मोठ्या बहुमताने मंजुरी दर्शविली होती. परंतु, यानंतर सुचविण्यात आलेल्या काही दुरुस्त्या संमत करण्यात सिनेटला अपयश आले.
  • रिपब्लिकन पक्षाचे प्रभावशाली नेते जॉन मॅककेन यांनी भारताला राष्ट्रीय संरक्षण अधिकार कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे. भारताला भागीदार न करता आल्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

भारत व घानामध्ये संरक्षण क्षेत्रात सहकार्य

  • भारत व घानाला दहशतवादाचा समान धोका असल्याने सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे या दोन्ही देशांनी जाहीर केले.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पश्चिम आफ्रिकी देशांच्या दौऱ्यात घानाला भेट दिली. घानाचे अध्यक्ष जॉन द्रमाणी महामा यांच्याशी मुखर्जी यांची विविध विषयांवर चर्चा झाली.
  • आंतरराष्ट्रीय दहशतवाद ही एक आपत्ती असून, दोन्ही देश त्याच्या छायेखाली आहे. त्यामुळेच अधिक सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यात येणार आहे.
  • घानाच्या विकासासाठी सवलतीच्या दरातील कर्जरूपाने भारतातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल घानाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
  • तसेच कॉन्टिनंट कोमेंडा साखर कारखाना व एलमिना मत्स्यप्रक्रिया प्रकल्पांसारख्या आर्थिक-सामाजिक योजनांमध्ये भारताच्या सहकार्याबद्दल घानाच्या अध्यक्षांनी मुखर्जी यांचे आभार मानले.

स्टेट बँकेच्या संलग्न बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी

  • स्टेट बँकेच्या पाच संलग्न बँकांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचा समावेश आहे.
  • सरकारच्या या निर्णयानंतर शेअर बाजारात स्टेट बँक आणि संलग्न बँकांच्या समभागांच्या किमतीत २० टक्क्यांपर्यंतची वाढ पाहायला मिळाली.
  • विलीनीकरणाची ही प्रक्रिया मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे.

फेसबुकचे आत्महत्या प्रतिबंधक टूल

  • आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबुकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले.
  • फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती. त्यामुळेच फेसबुकने पुढाकार घेऊन ‘सुसाईड प्रिव्हेंन्शन’ हे नवे टूल भारतात दाखल केले.
  • ज्या व्यक्ती तणावात आहेत, अशा व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी काही पोस्ट टाकत असतील तर त्या पोस्टचा अंदाज घेऊन हे टूल मित्रपरिवाराला नोटिफिकेशन पाठवते.
  • फेसबुक यूजरच्या पोस्टमध्ये काही विपरीत दिसल्यास ते कळविण्याची सोय या टूलमध्ये करण्यात आली आहे.
  • दरम्यान, हे टूल अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये याआधीच सुरू करण्यात आले होते. फेसबुकच्या या टूलला या देशांत चांगला प्रतिसाददेखील मिळाला.
  • फेसबुकने हे टूल भारतात ‘एएएसआरए’ आणि ‘द लाइव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ या स्थानिक कंपन्यांच्या मदतीने सुरू केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा