चालू घडामोडी : ६ जुलै

शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने कर्ज

  • शेतकऱ्यांना अल्प मुदतीसाठी (एक वर्ष कालावधी) तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ७ टक्के व्याजदराने देण्याच्या निर्णयावर सरकारने शिक्कामोर्तब केले.
  • या कर्जासाठी नऊ टक्के व्याज आकारणी होणार असली, तरी त्यातील पाच टक्के व्याजाची रक्कम सरकार ज्यांनी कर्ज दिले असेल त्या बँकेस देणार आहे.
  • मात्र शेतकऱ्यांनी घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज ठरलेल्या मुदतीत फेडले नाही तर त्याच्या व्याजापैकी पाच टक्क्यांऐवजी फक्त दोन टक्क्यांचाच बोजा सरकार उचलेल.
  • सर्व शेतकरी या कर्जासाठी पात्र असतील. शेतकऱ्यांनी घेतलेल्या एक वर्ष मुदतीपर्यंतच्या व तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांना ही योजना लागू होईल.
  • ‘इंटरेस्ट सबव्हेंशन’या योजनेखाली शेतकऱ्यांच्या पीककर्जाच्या व्याजापैकी काही भार सरकारने उचलण्यासाठी निधी मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.
  • कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले व त्याच्या पीककर्जाचे पुनर्गठन केले गेले तर पुनर्गठित कर्जावर पहिल्या वर्षाच्या व्याजापैकी दोन टक्के व्याज सरकार भरेल, असेही ठरविण्यात आले आहे.
  • व्याज कपात म्हणजे अनुदान योजना आधी अर्थमंत्रालयाने राबवली होती आता ती कृषी मंत्रालय राबवत आहे.

‘ब्लेड रनर’ला ६ वर्षाची शिक्षा

  • ‘ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी ६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
  • २०१३साली मॉडेल रिव्हा स्टिनकॅम्प हिची हत्या झाली होती व ऑस्करवर तिच्या खुनाचा आरोप लावण्यात आला होता. 
  • त्याने केलेल्या गोळीबारातच रिव्हाचा मृत्यू झाला होता. परंतु, घरात चोर शिरल्याच्या संशयावरून आपण गोळीबार केल्याचा दावा ऑस्करने केला होता.
  • या हत्येच्या खटल्यात, द. आफ्रिकेतील कनिष्ठ न्यायालयाने ऑस्करला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर तो १२ महिने तुरुंगात राहिला आणि नंतर जामिनावर सुटला.
  • ऑस्करला १५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सरकारी पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु, ऑस्करचा गुन्हा पाहता त्याला एवढी शिक्षा देणे हा त्याच्यावर अन्याय ठरेल, असे नमूद करत न्यायमूर्तींनी त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावली.
  • पॅराऑल्मपिकमध्ये सहा सुवर्णपदके मिळवणाऱ्या ऑस्कर २०१२ लंडन मुख्य ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झाला होता. शारीरीकदृष्टया अपंग असूनही मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला धावपटू ठरला होता.

औषधांच्या निर्यातीतील भारत आघाडीवर

  • औषधांच्या निर्यातीतील आघाडी भारताने कायम ठेवली असून, मागील वर्षीही यात चीनला मागे टाकण्यात भारताला यश आले.
  • अमेरिका, आफ्रिका आणि युरोपीय समुदाय या महत्त्वाच्या बाजारपेठांत औषध निर्यात करण्यात भारत चीनच्या पुढे आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.
  • भारताची औषध निर्यात २०१५मध्ये चीनपेक्षा अधिक आहे. युरोपीय समुदाय आणि आफ्रिका या विभागात औषध निर्यात करण्यात भारताने आघाडी कायम ठेवली आहे.
  • जगभरात जेनेरिक औषधांचा भारत सर्वांत मोठा पुरवठादार देश आहे. जागतिक निर्यातीत भारतीय जेनेरिक औषधांचा वाटा २० टक्के आहे.
  • स्वस्त व परवडण्यायोग्य औषधांचा पुरवठा भारताकडून होत असल्याने जगभरातून मागणी वाढत असून, पर्यायाने भारताची निर्यात वाढत आहे.

सौदी अरेबियात आत्मघाती हल्ले

  • इस्लामधर्मियांचे पवित्र स्थान असलेल्या मदिनासह सौदी अरेबियातील तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ले केल्याने येथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • मदिना येथे रमजाननिमित्त विविध कार्यक्रमांची तयारी सुरू असतानाच आणि पैगंबरांच्या मशिदीमध्ये संध्याकाळच्या नमाजची तयारी सुरू असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला.
  • मशिदीच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत सुरक्षारक्षकांना संशय आला होता. त्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न करताच त्याने आत्मघाती स्फोट घडवून आणला. यामध्ये त्याच्याबरोबरच चार रक्षकही मारले गेले.
  • थेट मदिनावरच हल्ला झाल्याने मुस्लिम नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याशिवाय गेल्या चोवीस तासांत इतर दोन ठिकाणीही हल्ले झाले.
  • सुन्नी इस्लाममधील सर्वोच्च केंद्र मानल्या जाणाऱ्या इजिप्तमधील कैरो येथील अल अजहर या संस्थेने या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
  • या हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतली नसली, तरी यामागे ‘इसिस’चाच हात असण्याची दाट शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा