चालू घडामोडी : ८ जुलै

भारत आणि मोझांबिक दरम्यान विविध करार

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफ्रिकेतील चार देशांच्या दौऱ्याला ८ जुलै रोजी मोझांबिकपासून सुरवात झाली. दोन्ही देशांदरम्यान, सुरक्षा, संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत करार करण्यात आले.
 • जगभरातील अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा जगाला सर्वांत मोठा धोका असल्याचा इशारा मोदी यांनी यावेळी दिला.
 • अमली पदार्थ तस्करीसह अन्य गुन्ह्यांचा दहशतवादाशी परस्परसंबंध असून, याला रोखण्यासाठी मोझांबिकशी करार करण्यात आला आहे.
 • भारतात डाळींचा तुटवडा निर्माण झाल्याने मोझांबिकमधून डाळ खरेदी करण्याचा दीर्घ मुदतीचा करार करण्यात आला. या करारावर मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी आणि मोदी यांनी स्वाक्षरी केली.
 • भारत आणि मोझाम्बिक हे हिंदी महासागराने जोडलेले देश असून, भारत हा मोझांबिकचा विश्वासू मित्र आणि भरवशाचा सहकारी आहे.
 • या देशाला एड्सशी लढण्यासाठी अन्य गरजेच्या औषधांचा भारत पुरवठा करणार आहे. आफ्रिकेतील या देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
 दोन्ही देशांमध्ये झालेले करार 
 • सुरक्षा व संरक्षण क्षेत्रात सहकार्य
 • डाळी खरेदी करण्यासाठी
 • युवक व क्रीडा क्षेत्रात सहकार्य
 • कृषी, आरोग्य, कौशल्य विकास

बराक ओबामा युरोपच्या दौऱ्यावर

 • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या आठवड्यात नाटो शिखर परिषदेला हजर राहण्यासाठी युरोपच्या दौऱ्यावर जाणार असून ते पोलंड आणि स्पेनला भेट देणार आहेत.
 • ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर होणाऱ्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. युरोप आणि अमेरिकेतील चर्चेद्वारे ब्रेग्झिटनंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
 • युरोपसमवेत ज्या विषयांवर सहकार्य करण्यात येत आहे त्याबाबतही चर्चा होणार आहे. त्यामध्ये दहशतवाद, स्थलांतर, आर्थिक प्रश्न आणि रशियाचा प्रश्न यावरही चर्चा होणार आहे.

कोरियाच्या किनाऱ्यावर अत्याधुनिक ‘थड’ क्षेपणास्त्रे तैनात करणार

 • संरक्षणात्मक उपाय म्हणून अमेरिका आणि दक्षिण कोरिया हे देश कोरियाच्या किनाऱ्यावर अत्याधुनिक ‘थड’ (टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स) क्षेपणास्त्रे तैनात करणार आहेत.
 • उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाल्याने त्यांच्या आक्रमक धोरणांना आळा घालण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिका एकत्र आले आहेत.
 • उत्तर कोरियाने वारंवार क्षेपणास्त्र चाचणी घेत अमेरिकेवरही थेट हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी ‘थड’ क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत.
 • केवळ उत्तर कोरियावरच वचक निर्माण करण्यासाठी ही योजना असून, इतर कोणत्याही देशाला यापासून धोका नसल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
 • ही क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याचा निर्णय झाला असला तरी ती कार्यान्वित करण्याचा कालावधी अद्याप निश्चित झालेला नाही.
 • अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या क्षेपणास्त्र तैनात करण्याच्या निर्णयाचा चीनने जोरदार विरोध केला आहे. 

नरेंद्र मोदी आणि जेकब झुमा यांच्यात चर्चा

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी ८ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांची भेट घेतली.
 • यावेळी संरक्षणसामग्री, उत्पादन, खाणकाम व खनिज क्षेत्रातील संबंध दृढ करण्यासोबत दहशतवादाशी लढण्यासाठी कृतिशील पाऊल उचलण्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी परस्पर सहमती दर्शविली आहे.
 • संरक्षणसामग्रीचे उत्पादन करण्यासाठी भारत हे अतिशय योग्य ठिकाण असून, प्रादेशिक व जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतील, यावर मोदी आणि झुमा यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा