चालू घडामोडी : १६ जुलै

दिल्लीमध्ये अकरावी आंतरराज्य परिषद

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये अकराव्या आंतरराज्य परिषदेस १५ जुलै रोजी सुरुवात झाली आहे. 
  • दहा वर्षानंतर आयोजित या बैठकीत देशभरातून १७ मंत्री आणि ३१ मुख्यमंत्री उपस्थित आहेत.
  • दलितांचे शोषण, अंतर्गत सुरक्षा, केंद्र व राज्यातील संबंध, अनुदान, सार्वजनिक, रोजगार आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
  • केंद्र सरकार पुढील ३ वर्षात ५ कोटी गॅस कनेक्शन देणार असल्याची माहिती बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
  • तसेच देशातील प्रत्येक नागरिकाला एका वर्षात आधार कार्ड देण्याची प्रक्रिया पुर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी यावेळी दिले.
  • या बैठकीत अरविंद केजरीवाल, नितीश कुमार याच्यासह उत्तराखंडचे हरीश रावत आणि अरुणाचल प्रदेशचे नबाम तुकी उपस्थित आहेत. यापूर्वी २००६मध्ये आंतरराज्य परिषद पार पडली होती.
  • चार तास चालणाऱ्या या बैठकीत पहिले दोन तास हे नियोजित विषयांसाठी असून उर्वरित दोन तास मुख्यमंत्र्यांना वेगवेगळे विषय मांडण्यासाठी देण्यात येणार आहेत.

अरुणाचलचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा राजीनामा

  • अरुणाचल प्रदेशात बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पेमा खांडू यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय सुनावला होता.
  • न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य ठरविताना १५ डिसेंबर २०१५ची स्थिती पूर्ववत करण्याचा आदेश दिला होता. 
  • या निर्णयामुळे राज्यात पुन्हा कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले होते आणि नबाम तुकी यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
  • तुकी यांना पुन्हा एकदा बहुमत चाचणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा नवा चेहरा अमिताभ बच्चन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची निवड निश्चित झाल्याचे जाहीर करण्यात आले.
  • या योजनेतील शहरांतील घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून बायो डिझेल व खत बनविण्याच्या विशिष्ट भागासाठीच्या सरकारी जाहिरातींत अमिताभ आपला आवाज देतील व त्याबाबतचे चित्रीकरणही करतील. 
  • मोदी राजवटीत गुजरातच्या पर्यटन व गीरच्या सिंहांबाबतच्या मोहिमेच्या जाहिराती बच्चन यांनी केल्या होत्या.
  • २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झालेली ‘स्वच्छ भारत’ ही सरकारी मोहीम न राहता ती लोकचळवळ बनावी, असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे.
  • त्या दृष्टीने बच्चन यांचा चेहरा व आवाज याच्या जाहिरात मोहिमेसाठी मिळणे ही लक्षणीय बाब मानली जाते.

तुर्कीमध्ये लष्कराचा उठाव

  • तुर्की लष्करातील एक गटाने १५ जुलै रोजी मध्यरात्री देशातील लोकशाही सरकारविरोधात उठाव केला. बंडखोर सैनिकांनी केलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत ६० लोक ठार झाले आहेत.
  • तुर्की पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर देत १२० बंडखोरांना अटक केली आहे. पोलीस व बंडखोरांमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरूच आहे.
  • सरकारविरोधात उठाव करणाऱ्या बंडखोरांनी सर्वप्रथम आशियाला युरोपशी जोडणारा पूल बंद करून टाकला. त्यानंतर तुर्कीच्या विशेष पोलिसांच्या मुख्यालयावर हल्ला केला.
  • त्यात २०हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाला. बंडखोरांनी संसदेलाही लक्ष्य केले. संसदेच्या वास्तूवर बॉम्बहल्ला केला. 
  • परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच सरकारने तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. 
  • कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात जमावबंदी लागू करण्यात आली असून सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. 
  • तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी देशवासीयांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
  • तुर्कीचे पंतप्रधान बिनाल यिल्दीरीम यांनी अमेरिकन मुस्लिम मौलवी फतेउल्लाह गुलेन यांनी आपल्या अनुयायांसह उठाव केल्याचे म्हटले आहे.
  • तुर्कस्तानच्या लष्कराने सत्ता हाती घेतल्याचा दावा केला आहे, तर सरकारने लष्कराचे प्रयत्न हाणून पाडल्याचे म्हटले आहे.
  • तुर्कस्तानमधील लष्कराने अध्यक्ष एर्दोगन यांचे नेतृत्व नाकारले आहे. त्यामुळे येथील लष्कर स्वतःला लोकशाहीचे रक्षक समजून, देशात उठाव करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा