चालू घडामोडी : १८ जुलै

सर्वोच्च न्यायालयाची लोढा समितीच्या शिफारशींना मान्यता

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गव्हर्निंग कौन्सिलमध्ये मंत्री व आयएएस पदाधिकारी यांना स्थान असू नये ही न्यायमूर्ती लोढा समितीची प्रमुख शिफारस सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.
 • बीसीसीआयपासून राजकीय व्यक्तींना दूर ठेवण्याची शिफारस मात्र कोर्टाने मान्य केलेली नाही.
 • त्याचबरोबर लोढा समितीने दिलेल्या बहुतेक सर्व शिफारशी स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे ‘बीसीसीआय’वर जरबच बसवली.
 • बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या अनेक महत्त्वाच्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. तसेच याची अंमलबजावणी सहा महिन्यांत करण्याचेही आदेश दिले आहेत. 
 निकालातील प्रमुख मुद्दे 
 • लोढा समितीच्या शिफारशींची सहा महिन्यांत अंमलबजावणी करावी.
 • बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये मंत्री वा सरकारी अधिकाऱ्यांना स्थान असू नये. राजकीय व्यक्तींवर मात्र कोणतीही बंदी नाही.
 • ‘एक व्यक्ती-एक पद’ हे सूत्र पाळावे.
 • पदाधिकारी-अधिकाऱ्यांची वयोमर्यादा ७० वर्षे असेल.
 • एकच संघटना असलेल्या राज्यांसाठी ‘एक राज्य-एक मत’ हे सूत्र.
 • तीन-तीन क्रिकेट संघ असलेल्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना रोटेशन पद्धतीने मतदानाचा अधिकार.
 • गव्हर्निंग कौन्सिलमध्ये ‘कॅग’च्या एका सदस्याचा समावेश असेल.
 • बीसीसीआय माहिती अधिकाराच्या कक्षेत येणे आणि सट्टेबाजी अधिकृत करण्यासंदर्भातील अधिकार संसदेकडे.
 • बीसीसीआयमध्ये खेळाडूंची संघटना कार्यरत असावी आणि त्यांना निधी उपलब्ध करण्यात यावा.
 • प्रसारण आणि जाहिरातींसाठी धोरण बीसीसीआयनेच निश्चित करावे.

गोव्यात सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण

 • गोवा राज्यात सुमारे १८२ किमी सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकरणामुळे अंतर्गत जलमार्गांवर विकासाचा मार्ग खुला होणार आहे.
 • राष्ट्रीय जलमार्ग कायदा २०१६ अंतर्गत गोव्यात ज्या सहा जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण होणार आहे त्यात खालील जलमार्गांचा समावेश आहे.
 1. मांडवी नदी : रेइश मागुश येथील दर्यासंगम ते उसगांव पूल (४१ कि. मी.)
 2. झुवारी नदी : मुरगांव बंदर ते सावर्डे पूल (५0 कि. मी.)
 3. शापोरा नदी : मोरजी दर्यासंगम ते मणेरी (३३ कि. मी.)
 4. कुंभारजुवें नदी : कुंभारजुवे व झुवारी नदी संगम ते कुंभारजुवे व मांडवी नदी संगम (१७ कि. मी.)
 5. म्हापसा नदी : म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्ग १७वरील पूल ते म्हापसा व मांडवी नदी संगम (पर्वरी) (२७ कि. मी.)
 6. साळ नदी : देवसा पूल ते मोबोर येथील दर्यासंगम (१४ कि. मी.)

अटल पेन्शन योजनेअंतर्गत १०० कोटी रुपये सहयोगदान मंजूर

 • आर्थिक वर्ष २०१५-१६साठी अटल पेन्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने १०० कोटी रुपये सहयोगदान मंजूर केले आहे. या योजनेमध्ये ३१ मार्च २०१६पर्यंत नोंदणी झालेल्या व्यक्तींना या सहयोगदानाचा लाभ मिळणार आहे.
 • हे सहयोगदान संबंधित सदस्याच्या योगदानाच्या ५० टक्के किंवा कमाल एक हजार रुपये असेल. २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांसाठी सरकार हे सहयोगदान देणार आहे.
 • या सहयोगदानाचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक सभासदाने मार्च २०१६पर्यंत स्वतःचे योगदान दिलेले असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास मात्र सभासदाला लाभ मिळू शकणार नाही.
 • सहयोगदानाचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक सभासदाने आपले अटल पेन्शन योजना खाते नियमित करावे, अशा सूचना भविष्यनिर्वाह निधी नियामक व विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) दिल्या आहेत.
 • अटल पेन्शन योजना सरकारी बँका व टपाल विभाग यांच्यामार्फत राबवली जाते. ३० जूनपर्यंत अटल पेन्शन योजनेचे ३० लाखांहून अधिक सभासद झाले आहेत.
 • सभासदांच्या या संख्येत दररोज किमान पाच हजार सभासदांची भर पडत आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

 • भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिफारस केलेले राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 
 • राजीनाम्यानंतर सिद्धू हे आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून तसे झाल्यास पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
 • सिद्धू हे २००४च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमृतसरमधून लोकसभेवर निवडून गेले होते.
 • नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची पत्नी व भाजपाच्या पंजाबच्या आमदार नवज्योत कौर यांनीही आमदारपदाचा राजीनामा दिला आहे.
 • २०१४च्या निवडणुकीत भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी सिद्धू यांना डावलून अरुण जेटली यांना तिकीट दिले होते. तेंव्हापासून सिद्धू नाराज झाले होते.

दिल्लीमध्ये दहा वर्षांपूर्वीच्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द

 • राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आला घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दहा वर्षांपूर्वीच्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश दिल्ली वाहतूक प्राधिकरणाला दिले. 
 • दिल्लीच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली असून जगातील सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा क्रमांक वर आहे.
 • ही स्थिती बदलण्यासाठी जुन्या गाड्या बाद करणे, ‘सम-विषम’ योजना अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 
 • डिझेलवर चालणाऱ्या जड वाहनांची नोंदणी करण्यास मज्जाव करून सर्व डिझेल टॅक्सींचे रूपांतर ‘सीएनजी’मध्ये करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने या वर्षाच्या सुरवातीस दिला होता. 
 • न्यायालयाने दिलेले आदेश किंवा सुचविलेले उपाय अमलात येत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

दक्षिण चीन समुद्रात चीनचा लष्करी सराव

 • चीनचा दक्षिण चीन समुद्रावरील दावा युनोच्या आंतरराष्ट्रीय लवादाने फेटाळून लावल्यानंतर चीनने तेथे लष्करी सरावाचे आयोजन केले आहे.
 • चीनच्या दक्षिण समुद्रात २१ जुलैपर्यंत लष्करी सराव करण्यात येईल. यासाठी या समुद्राचा काही भाग इतरांसाठी बंद ठेवण्यात येईल.
 पार्श्वभूमी 
 • फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई या देशांच्या सीमांना लागून असलेल्या दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्के भागावर चीनने हक्क सांगितला आहे.
 • लष्करी बळावर शेजारी देशांना न जुमानता चीनने समुद्रात कृत्रिम बेटे, हवाई तळ उभारले. समुद्रात युद्धनौका तसेच बेटांवर क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत.
 • याविरोधात फिलिपाइन्सने सन १९९३मध्ये युनोच्या आंतरराष्ट्रीय लवादाकडे दाद मागितली होती.
 • नैसर्गिक वायू, खनिजे व मासेमारीसाठी समृद्ध असलेल्या या समुद्रावर चीनचा कोणताही ऐतिहासिक हक्क नाही, असा निर्वाळा आंतरराष्ट्रीय लवादाने दिल्याने चीनच्या विस्तारवादी धोरणांना धक्का बसला होता.

प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम यांचे निधन

 • ‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’ या गीतासह असंख्य गाणी आपल्या समधूर आवाजाने अजरामर करणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम यांचे निधन झाले.
 • १९४९ ते १९७२ या कालावधीत मुबारक बेगम यांनी गायलेल्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. 
 • राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील सुजानगडमध्ये मुबारक बेगम यांचा जन्म झाला होता. लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, वाणी जयराम यांच्यासोबत मुबारक बेगम यांनी अनेक गाणी गायली.
 • १९४९मध्ये ‘आईये’ या चित्रपटात लतादीदींसोबत त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. कैफी आझमी, एस.डी.बर्मन, मोहम्मद रफी, खय्याम, शंकर-जयकिशन या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केले होते.
 • ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयो में’ आणि ‘खूनी खजाना’ या चित्रपटातील ‘ए दिल बता हम कहाँ आ गये’ या गाण्यांनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.
 • १४६ चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे २०० हिंदी गाण्यांना आपला सुमधूर आवाज दिला होता.
 • बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मुबारक बेगम या आयुष्याच्या शेवटच्या काळात पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा