चालू घडामोडी : २३ जुलै

चिलकॉट अहवालात टोनी ब्लेअर यांच्यावर ठपका

  • इराक युद्धातील ब्रिटनच्या सहभागाची चौकशी करणाऱ्या चिलकॉट अहवालात टोनी ब्लेअर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ब्लेअर यांनी जनतेची माफी मागितली आहे. 
  • इराक युद्धाची आणि त्यातील ब्रिटनच्या सहभागाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांच्यावर जनतेचा दबाव वाढत होता.
  • त्याला उत्तर म्हणून १५ जून २००९ रोजी सर जॉन चिलकॉट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली. त्या समितीचा अहवाल नुकताच सादर झाला.
 चिलकॉट अहवाल व पार्श्वभूमी 
  • अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराककडे विनाशकारी शस्त्रास्त्रे आहेत, असा कांगावा करत मित्रराष्ट्रांना आपल्यासोबत इराक युद्धात उतरविण्याचा चंग बांधला.
  • त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अमेरिका, ब्रिटन व इतर काही सहकारी देशांनी २० मार्च २००३ रोजी इराकवर हल्ला केला. सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवली व त्यांना फाशी दिली.
  • इराकमध्ये परकी हल्ल्याचा विरोध दीर्घ काळ चालूच राहिला आणि हे युद्ध खूपच लांबले. अमेरिकेने आपले सैन्य इराकमधून काढून घेण्यास २००७-०८मध्ये सुरवात केली आणि ही कार्यवाही डिसेंबर २०११मध्ये पूर्ण झाली.
  • २००३ ते २०१३ या युद्धकाळात सुमारे १.७४ लाख इराकी मृतांमध्ये १.१२ लाख सामान्य नागरिक होते, तर २००३ ते २०१४ या काळात तेथे अमेरिकेचे ४४९१ सैनिक ठार झाले.
  • अशा या इराकी युद्धात तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ब्रिटनला उतरविले. या युद्धातील ब्रिटनच्या सहभागाची तपासणी चिलकॉट अहवाल करतो.
  • या अहवालावर प्रतिक्रिया देताना ब्लेअर यांनी झालेल्या चुकांची कबुली देत ब्रिटिश नागरिकांची माफी मागितली आहे. 
  • चिलकॉट अहवालावर प्रतिक्रिया देताना जॉर्ज बुश यांनी मात्र इराकवर हल्ला करणे योग्यच होते, असे ठामपणे सांगितले. 

फेसबुकच्या ‘ऍक्विला’ ड्रोनचे यशस्वी उड्डाण

  • फेसबुकच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘ऍक्विला’ या ड्रोनने २१ जुलै रोजी यशस्वी उड्डाण केले.
  • ऍरिजोनातील युमा येथे चाचणीसाठी करण्यात आलेल्या या उड्डाणावेळी ऍक्विला १००० फुटांपर्यंत सुमारे ९६ मिनिटे उडत होते.
  • या ड्रोनमुले जगभर इंटरनेट पोचविणे शक्य होणार आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागांत इंटरनेट पोचविण्यात याचा मोठा फायदा होणार आहे.
 ‘ऍक्विला’ची वैशिष्ट्ये 
  • ऍक्विलाची निर्मिती ब्रिटनच्या फेसबुक एरोस्पेस चमूने केली आहे. याचे पंख बोइंग-७३७ या विमानाएवढे मोठे म्हणजेच १४० फूट लांब आहेत 
  • संपूर्ण कार्बन फायबरपासून निर्मिती असल्याने याचे वजन फक्त ४५० किलो ग्रॅम असून, हे ६० हजार फुटांपर्यंत उड्डाण करू शकते.
  • ५० किलोमीटरच्या क्षेत्रात इंटरनेट सेवा देण्याची या ड्रोनची क्षमता आहे.

अडवानींवरील पुस्तक वादात

  • भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यावर लिहिलेल्या ‘अडवानी के साथ ३२ साल’ या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच त्यावरून वाद सुरू झाले आहेत.
  • या पुस्तकाच्या लेखनापूर्वी अडवानींची परवानगीच घेतलेली नव्हती, असे अडवानी यांच्या वतीने अधिकृतरीत्या स्पष्ट केले गेले आहे. 
  • विश्वंभर श्रीवास्तव यांचे हे पुस्तक अनिल प्रकाशनातर्फे काढण्यात आले आहे. तथापि हे पुस्तक आपल्या इच्छेच्या किंवा परवानगीविरुद्ध लिहीले गेल्याचे अडवानी यांनी स्पष्ट केले.

अफगणिस्तानातून अपहरण झालेल्या भारतीय तरुणीची सुटका

  • अफगणिस्तानातून अपहरण करण्यात आलेल्या कोलकाता येथील ज्युडिथ डिसूझा या तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
  • आगाखान फाउंडेशन या संस्थेमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या ज्युडिथ डिसूझा हिचे ९ जूनला काबूलमधून दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.
  • अतिशय धाडसी व उमदी असलेली ज्युडिथ अफगणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करीत होती. 
  • ज्युडिथच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिच्या सुटकेसाठी स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली होती.

तनिष खोतने केले माउंट एल्ब्रस सर

  • कोल्हापूरच्या तनिष सुधीर खोतने वयाच्या तेराव्या वर्षीच युरोपातील माउंट एल्ब्रस हे सर्वोच्च हिमशिखर सर केले. एव्हरेस्टवीर चेतन केतकर यांच्या नेतृत्वाखाली त्याने ही किमया साधली.
  • १२ जुलै रोजी त्याने एल्ब्रस शिखरावर तिरंगा फडकवला. या शिखराची उंची ५६४२ मीटर असून सात खंडांमध्ये हे पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
  • तनिषने माउंट एल्ब्रस सर करणारा आशियातील युवा गिर्यारोहक म्हणून मान मिळविला. डेन्मार्कचा टाइलर आर्मस्ट्रॉंग हा एल्ब्रस शिखर सर करणारा जगातील सर्वात युवा गिर्यारोहक आहे. 
  • या मोहिमेमध्ये सुधीर खोत, निगडीची ऋतुजा शहा यांनीही हे शिखर सर केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा