चालू घडामोडी : १७ ऑगस्ट

पं. शिवकुमार शर्मा यांना जीवनगौरव पुरस्कार

  • ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना संगीत मार्तंड उस्ताद चॉंदखॉं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • दिल्ली घराण्याशी संबंधित सुरसागर संस्थेने ही घोषणा केली असून, ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 
  • या संस्थेचा २३वा शास्त्रीय संगीत महोत्सव १३ व १४ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. यात देशातील प्रसिद्ध गायक व वादक आपली कला सादर करणार आहेत.
  • पं. शिवकुमारही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. संतूर हे जम्मू-काश्मीरचे लोकवाद्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर सादर करणारे पं. शिवकुमार शर्मा हे पहिले कलावंत समजले जातात. 
  • सुरसागर संस्थेतर्फे शास्त्रीय संगीत व नृत्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिग्गज कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार १९८६पासून दिला जात आहे.
  • गेल्या वर्षी कथ्थक गुरू बिरजू महाराज यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

मणिपूरच्या राज्यपालपदी नजमा हेपतुल्ला

  • माजी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री डॉ. नजमा हेपतुल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यासह पंजाब, आसाम या राज्यांचे नवे राज्यपाल व अंदमान-निकोबार द्वीप या केंद्रशासित प्रदेशासाठी नायब राज्यपालांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
  • नजमा हेपतुल्ला या मणिपूरच्या १८व्या राज्यपाल ठरल्या आहेत. मणिपूरचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले मेघालयचे राज्यपाल वी. षण्मुगनाथन यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील.
  • नजमा हेपतुल्ला भाजप उपाध्यक्ष तसेच पाच वेळा राज्यसभा सदस्य राहिल्या आहेत. १९८५-८६ तसेच १९८८ ते २००७ पर्यंत त्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष होत्या.
  • पूर्वीच्या काँग्रेसच्या सदस्य राहिलेल्या हेपतुल्लाह या १९८०पासून राज्यसभेच्या सदस्य आहेत. २००४मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 
  • नागूपरचे खासदार भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित हे आसामचे नवे राज्यपाल असणार आहेत.
  • नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांच्याकडे आसामचा पदभार होता. तिथे आता पुरोहित यांची निवड झाली आहे.
  • नागपूरमधील दैनिक हितवादचे व्यवस्थापकीय संपादक असलेले पुरोहित हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
  • पंजाबच्या राज्यपालपदी व्ही. पी. सिंह बडनोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कप्तानसिंह सोलंकी यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
  • शिवराज पाटील यांच्या निवृत्तीनंतर हरियानाचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी यांच्याकडे पंजाबचा अतिरक्त पदभार होता.
  • अंदमान-निकोबारच्या नायब राज्यपालपदाची धुरा दिल्लीचे माजी आमदार प्रो. जगदीश मुखी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
  • अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल (निवृत्त) ए. के. सिंग यांची जागा प्रो. मुखी हे घेणार आहेत.
  • पंजाब आणि मणिपूर या दोन्ही राज्यांमध्ये येत्या फेब्रुवारी २०१७मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे तेथील राज्यपालांच्या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

अ‍ॅम्नेस्टी इंडियाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा

  • अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या कार्यक्रमात स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केल्यानंतर या आंतरराष्ट्रीय संस्थेविरुद्ध देशद्रोहासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • अ‍ॅम्नेस्टीने युनायटेड थिओलॉजिकल कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त बेंगळुरूमध्ये काश्मीर प्रश्नासंदर्भात चर्चेचे आयोजन केले होते.
  • यात एका काश्मिरी नेत्याने भारतीय लष्कराची प्रशंसा केली. चर्चासत्राला उपस्थित स्वतंत्र काश्मीरसमर्थकांना ते रुचले नाही, त्यामुळे स्वतंत्र काश्मीरच्या घोषणा दिल्या.
  • याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी संस्थेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
  • देशविरोधी घोषणा देणाऱ्यांचा हेतू आणि उद्देश काय होता, याची तपासणी पोलीस करीत आहेत.

नियमांची पूर्तता न केल्याबद्दल बँकांना दंड

  • नियमांची पूर्तता न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने विविध चार सहकारी बँकांना एकूण ९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांचा समावेश आहे.
  • ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’बाबतच्या (केवायसी) नियमांची पूर्तता न केल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील इंदापूर नागरी सहकारी बँकेला २ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
  • तर जळगाव जिल्ह्यातील श्री दादासाहेब गजमल सहकारी बँकेला (पाचोरा) परवानगीविना मालमत्तांवर शुल्क आकारणी केल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
  • याचबरोबर दंड करण्यात आलेल्या दोन बँकांमध्ये गुवाहाटी येथील द को ऑपरेटिव्ह सिटी बँक व हैदराबाद येथील द मॉडल को-ऑप. अर्बन बँक यांचा समावेश आहे.
  • या दोन्ही सहकारी बँकांना अनुक्रमे ५ व १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
  • गुवाहाटीतील या बँकेने ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ची पूर्तता केली नसल्याचा  तर हैदराबाद येथील सहकारी बँकेने तिचे संचालक व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शक तत्त्वे धुडकावत कर्जे दिली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा