चालू घडामोडी : २५ सप्टेंबर

रेल्वे अर्थसंकल्प इतिहासजमा

  • गेली ९२ वर्षे स्वतंत्रपणे मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प यापुढे स्वतंत्रपणे न मांडता तो सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन करण्यास मंत्रिमंडळाने २१ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली.
  • तसेच केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाऐवजी १ फेब्रुवारी रोजी मांडण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
  • याशिवाय यापुढे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात व खातेपुस्तकांत खर्चाची नियोजन खर्च व नियोजनबाह्य खर्च अशी विगतवारी करण्यात येणार नाही.
  • मंत्रिमंडळाने वित्त मंत्रालयाचे अर्थसंकल्पीय सुधारणांचे वरील तीन प्रस्ताव संमत केले. हे तिन्ही बदल २०१७-१८च्या आगामी अर्थसंकल्पापासून लागू होतील.
  • अर्थसंकल्प २८ किंवा २९ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारी रोजी मांडण्यास तत्त्वत: मंजुरी दिली गेली आहे.
  • अर्थसंकल्प मंजुरीच्या आणि विनियोजनाच्या सर्व संसदीय प्रक्रिया नवे वित्तीय वर्ष सुरू होण्याआधी म्हणजे मार्चअखेर पूर्ण व्हाव्यात हा हेतू आहे.
  • नव्या वेळापत्रकानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुमारे १५ दिवस आधी सुरू करावे लागेल. 
  • स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद झाला तरी रेल्वेची वित्तीय आणि कार्यात्मक स्वायत्तता अबाधित राहील व रेल्वेच्या मागण्यांवर स्वतंत्रपणे चर्चा होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
 नियोजित बदल 
  • स्वतंत्र अर्थसंकल्प बंद झाला तरी सरकारची व्यापारी आस्थापना म्हणून रेल्वेचे अस्तित्व कायम राहणार आहे.
  • रेल्वेची कार्यात्मक स्वायत्तता अबाधित व वित्तीय अधिकारही सध्याप्रमाणेच राहतील.
  • सर्वसाधारण कामकाज खर्चासह सर्व महसुली खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन हे रेल्वेच्या उत्पन्नातूनच दिले जातील.
  • एकत्रित अर्थसंकल्प मांडल्याने रेल्वेला कारभारावर लक्ष केंद्रित करता येईल व सरकारच्या वित्तीय स्थितीचे सर्वंकष चित्र स्पष्ट होईल.
  • रेल्वेच्या खातेपुस्तकांत केंद्राचे सुमारे २.२७ लाख कोटी रुपयांचे भांडवल तसेच राहील. लाभांशापोटी दरवर्षी द्यावी लागणारी ९७०० कोटी रुपयांची रक्कम रेल्वेकडेच राहील.
  • अर्थसंकल्प सुमारे महिनाभर लवकर संसदेत मांडल्याने मंजुरीची सर्व प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करणे शक्य होईल.
  • नव्या वित्तीय वर्षाच्या सुरुवातीपासूनच विविध खाती व विभागांना योजनांचे अधिक चांगले नियोजन करून त्यांची वेळेत अंमलबजावणी करता येईल.
  • अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत काही महिन्यांच्या खर्चासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची गरज राहणार नाही.
  • करांच्या दरांमध्ये झालेले बदल पूर्वलक्षी नव्हे तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच लागू होतील.
  • अन्य खात्यांप्रमाणे रेल्वेलाही केंद्रीय अर्थसंकल्पातून पैसे देण्यात येतील व रेल्वेच्या खर्चाचे विनियोजनही मुख्य विनियोजन विधेयकातच केले जाईल.
  • प्रक्रियात्मक मंजुरीची गरज न राहिल्याने निर्णय झटपट होतील व सुशासनाच्या मोजपट्टीत रेल्वेही येईल.

सानिया-बाबरेराला जपान ओपनचे जेतेपद

  • भारताची सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीने टोरे पॅन पॅसिफिक (जपान ओपन) टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले.
  • सानिया-बाबरेराने अंतिम लढतीत चेंग लिअँग व झाओक्युअ‍ॅन यांग या चिनी जोडीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.
  • मागील चार वर्षांतील सानियाचे हे तिसरे जपान खुल्या स्पर्धेचे जेतेपद आहे. याआधी तिने कारा ब्लॅकसह २०१३ व २०१४मध्ये अजिंक्यपद पटकावले होते.
  • सानिया-बाबरेराची एकत्र खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात सानिया-बाबरेरा जोडीने सिनसिनाटी खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
  • मात्र, अमेरिकन खुल्या स्पर्धेत सानिया-बाबरेरा जोडीला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.
  • सानियाने या वर्षांत आत्तापर्यंत आठ डब्लूटीए जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये हिंगीससह जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाचाही समावेश आहे.
  • तसेच तिने ब्रिस्बेन, सिडनी, सेंट पिटर्सबर्ग, इटालियन आणि कॉनेक्टिकट खुल्या स्पर्धेतही बाजी मारली आहे. सानियाने कारकिर्दीत एकूण ४० दुहेरी गटातील जेतेपदे जिंकली आहेत.

रशिया पाकिस्तान युद्धसराव

  • पाकिस्तान बरोबर दहशतवाद विरोधी युद्धसराव करण्यासाठी रशियन सैन्याची एक तुकडी पाकिस्तानात दाखल झाली आहे.
  • उरी दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने पाकिस्तान बरोबरचा युद्धसराव रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण हा सराव रद्द झालेला नाही.
  • फक्त हा युद्धसराव पाकव्याप्त काश्मीर किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी होणार नसून, पेशावरपासून ३४ मैल अंतरावरील चेराट येथे होणार आहे.
  • पाकिस्तान आणि रशियामध्ये प्रथमच असा युद्धसराव होत असून, या सरावाला ‘फ्रेन्डशिप २०१६’ असे नाव देण्यात आले आहे. 
  •  फ्रेन्डशिप २०१६अंतर्गत रशियन आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये दोन आठवडे युद्धसराव चालणार आहे. रशियाचे २०० जवान यात भाग घेणार आहेत.
  • रशिया हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्यामुळे रशियाच्या पाकिस्तानसोबतच्या युद्ध सरावावर इतकी चर्चा सुरु आहे.
  • शीतयुद्धाच्या काळात भारत रशियाच्या गोटातील देश तर, पाकिस्तान अमेरिकेच्या गोटातील देश अशी ओळख होती.

व्याघ्रसंवर्धनासाठी सरकारची प्रस्तावित योजना

  • छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उपकरणांची निर्मिती आता भारतातच करण्याची योजना सरकारने आखली आहे. 
  • वाघांवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली नेक कॉलर, ड्रोनसारख्या आदी उपकरणांच्या निर्मितीचे काम ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत हाती घेतले जाईल.
  • आगामी दोन वर्षांत या उपकरणांची निर्मिती भारतात होण्याची प्रक्रिया सुरू होईल. 
  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. 
  • एनटीसीएने भारतीय वन्यजीव संस्थेशी (डब्ल्यूआयआय) एक सामंजस्य करार केला आहे.
  • त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पन्ना, जिम कॉर्बेट, काझीरंगा, सुंदरबन आणि सत्यमंगलम या अभयारण्यांत या उपकरणांचा वापर केला जाणार आहे. 
  • नेक कॉलर, ड्रोनसारख्या उपकरणांमुळे वाघाच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
  • सोबतच जंगलातील मानवी हस्तक्षेपास प्रतिबंध करणेही यामुळे शक्य होणार असून, परिणामी शिकारीला आळा घालण्यात यश मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा