चालू घडामोडी : २ ऑक्टोबर

सार्क शिखर परिषद लांबणीवर

  • भारतासह अन्य चार देशांनीही सार्क परिषदेवर टाकलेल्या बहिष्कारामुळे पाकिस्तानने नोव्हेंबरमध्ये होणारी सार्क देशांची शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
  • उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने इस्लामाबादमध्ये येत्या ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय दक्षिण आशियाई देशांच्या (सार्क) शिखर परिषदेला न जाण्याचा निर्णय घेतला होता.
  • त्यानंतर अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान या देशांनीही भारताच्या बाजूने उभे राहत इस्लामाबादमध्ये सार्क परिषदेला न जाण्याचा निर्णय घेतला.
  • २ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेनेही १९व्या सार्क शिखर परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सार्कमधील आठपैकी पाच सदस्यांनी पाकिस्तानविरोधी भूमिका घेतल्याने प्रचंड दबावाखाली आलेल्या पाकिस्तानला ही शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला.
  • इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क शिखर परिषदेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

कर्नाटकसाठी एच. डी. देवेगौडांचे बेमुदत उपोषण

  • कावेरी पाणीवाटपाच्या वादात कर्नाटकला न्याय मिळावा या मागणीसाठी माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
  • कर्नाटकने ६ ऑक्टोबरपर्यंत रोज सहा हजार क्यूसेक पाणी तमिळनाडूला द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • तसेच या प्रश्नी कावेरी जल व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे.
  • या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी कर्नाटकला न्याय मिळावा यासाठी १ ऑक्टोबर रोजी उपोषण सुरू केले.

गोव्यात ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

  • गोव्यात ५ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या चषकाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले.
  • या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि ब्रिक्स देशांचे राजदूत उपस्थित होते.
  • या स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. तसेच ही स्पर्धा १७ वर्षांखालील गटाची आहे.

गगनजित भुल्लरला कोरिया ओपनचे विजेतेपद

  • भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लरने २६९ गुणांची खेळी करून कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
  • गगनजितचे एशियन टूरमधील हे सहावे आणि एकूण सातवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.
  • दोन वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून जेतेपद जिंकणाऱ्या गगनजितने चार राऊंडमध्ये ६८, ६६, ६८ व ६७ गुणांची (कार्ड) खेळी केली.
  • गगनजितला हे विजेतेपद जिंकल्यानंतर एकूण १ लाख ९६ हजार डॉलरचे रोख पारितोषिक मिळाले.
  • त्याने एशियन टूरमध्ये २०१३मध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते. २०१४मध्ये तो मनगटाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता.  

बिजिंगमध्ये प्रदुषणाचा यलो अलर्ट

  • चीनची राजधानी असलेल्या बिजिंग शहराने २ ऑक्टोबर रोजी प्रदूषणाचा पहिला यलो अलर्ट जारी केला आहे.
  • प्रचंड प्रमाणात पसरलेल्या धुक्यामुळे इथल्या हवामान विभागाला हा अलर्ट द्यावा लागला.
  • बिजिंगच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) १ ऑक्टोबर रोजी २०० ते ३००च्या दरम्यान होता. हा निर्देशांक खूप जास्त प्रदूषणाचे द्योतक आहे.
  • या अलर्टमुळे बांधकामाच्या साइट, आउटडोर बार्बेक्यू आणि शेतकऱ्यांना गवताची शेकोटी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
  • चीनमध्ये हवामानाचे चार रंगांचे स्थितीदर्शक आहेत. तांबडा रंग अत्यंत खराब हवामान दर्शवतो. त्यानंतर अनुक्रमे केशरी, पिवळा आणि निळा रंग उतरंडीने खराब हवा दर्शवतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा