चालू घडामोडी : २१ ऑक्टोबर

बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध

  • लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई करणाऱ्या बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत.
  • बीसीसीआय व राज्य क्रिकेट संघटनांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • त्याचबरोबर, लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही बीसीसीआयला दिले आहेत.
  • लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यावरून बीसीसीआय व समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन संघर्ष सुरू आहे.
  • बीसीसीआयने यासंदर्भात न्यायालयात धाव घेऊन शिफारसी लागू करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती.
  • ही मागणी फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला कोणत्याही परिस्थितीत लोढा समितीच्या शिफारशी लागू कराव्या लागतील, असे म्हटले  होते.
 न्यायालयाचे आदेश 
  • बीसीसीआयच्या बँक खात्यांची व बड्या रकमेच्या करारांची चौकशी करण्यासाठी लोढा समितीने स्वतंत्र लेखापरीक्षक (ऑडिटर) नेमावा.
  • महागड्या करारांसाठी रकमेची मर्यादा निश्चित करून भविष्यात या करारांची छाननीदेखील लेखापरीक्षकामार्फत करून घ्यावी.
  • बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी स्वत: समितीसमोर हजर राहून शिफारशींच्या अंमलबजावणी कधीपर्यंत करणार याची माहिती द्यावी.
  • बीसीसीआयकडून केल्या जाणाऱ्या महागड्या करारांवर लक्ष ठेवा आणि ठराविक रकमेच्या करारांनाच मान्यता द्या.
  • लोढा समितीच्या मान्यतेशिवाय बीसीसीआयला यापुढे कोणताही करार करता येणार नाही.

अमेरिकेतील महत्त्वाच्या मंडळावर डॉ. रेणू खटोड

  • अमेरिकेतील महत्त्वाच्या डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटीच्या शैक्षणिक सल्लागार मंडळावर भारतीय वंशाच्या डॉ. रेणू खटोड यांची नियुक्ती झाली.
  • भारतातील मंत्रालयांमध्ये गृह खात्याप्रमाणे असलेले होमलॅण्ड सिक्युरिटी हे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाते आहे.
  • डॉ. खटोड यांची नियुक्ती झालेल्या सल्लागार मंडळात त्या एकमेव भारतीय वंशाच्या आहेत.
  • देशांतर्गत सुरक्षा आणि शैक्षणिक धोरणे ठरवताना उपयुक्त ठरतील अशा शिफारशी मंत्रालयास सादर करण्याची जबाबदारी या मंडळावर आहे.
  • प्रा. डॉ. खटोड या मूळच्या उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रहिवासी आहेत. १९७३साली कानपूर विश्वविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली.
  • त्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्या पर्ड्यू विद्यापीठात गेल्या. तेथे राज्यशास्त्रात त्यांनी एमए केले.
  • काही काळ स्थानिक महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन सुरू केले. कालांतराने पीएच.डी.च्या संशोधनासाठी त्या पुन्हा पडर्य़ू विद्यापीठात आल्या.
  • १९८५मध्ये त्यांचा प्रबंध स्वीकारला गेला आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयातील डॉक्टरेट त्यांनी मिळवली.
  • २००८पासून त्या युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन सिस्टीमच्या चॅन्सेलर तर ह्युस्टन विद्यापीठाच्या अध्यक्ष आहेत.
  • जागतिक हवामान बदल, पर्यावरणीय राज्यशास्त्र आणि धोरणे यांसारख्या अनेक विषयांवरील त्यांचे शोधनिबंध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
  • डॉ. खटोड यांचे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आर्थिक, सामाजिक क्षेत्रांतही योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
  • फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ डलास तसेच भारतीय पंतप्रधानांच्या जागतिक सल्लागार मंडळावर त्या कार्यरत होत्या.
  • अमेरिकेसारख्या देशातील महत्त्वाच्या मंडळावर काम करण्याची संधी जन्माने भारतीय असलेल्या महिलेस मिळणे हा आपल्या देशाचा बहुमान आहे.

नवदीपसिंग सूरी युएईमध्ये भारताचे राजदूत

  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे राजदूत म्हणून नवदीपसिंग सूरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे एकंदर लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण ३७ ते ४२ टक्के आहे, 
  • सध्या ते ऑस्ट्रेलियात भारताचे उच्चायुक्त आहेत. पुढील महिन्यात ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये पदाची सूत्रे स्वीकारतील. 
  • अमृतसर येथील गुरुनानक विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर ‘सेल’ या सर्वात मोठ्या सरकारी उद्योगात काही काळ नोकरी केली.
  • त्यांनी भारतीय विदेश सेवेत १९८३मध्ये प्रवेश मिळवला. सूरी यांनी परकीय भाषा म्हणून अरबीची निवड केली.
  • कैरोतील भारतीय वकिलातीत १९८४साली त्यांना नियुक्ती मिळाली.  कैरोतीलच अमेरिकन विद्यापीठात अरबीमध्ये रीतसर शिक्षणही घेतले.
  • मग ३ वर्षे जगातील मोजक्या प्राचीन शहरांपैकी असलेल्या दमास्कस, अलेप्पोमध्ये त्यांनी सेवा बजावली.
  • १९९३मध्ये त्यांची वॉशिंग्टन येथील भारतीय वकिलातीत नियुक्ती झाली. नंतर १९९७साली टांझानियातील दार-एस-सलाम येथे त्यांना पाठविण्यात आले.
  • २०००साली लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयातील वृत्त विभागाचे प्रवक्ते आणि प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
  • २००९मध्ये पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेला फेसबुक, ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांशी जोडण्याच्या कामात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
  • प्रख्यात पंजाबी कादंबरीकार नानकसिंग हे सूरी यांचे आजोबा आहेत. त्यांच्या तीन कादंबऱ्यांचे सूरी यांनी इंग्रजी अनुवाद केले आहेत.

हैमा वादळाचा फिलिपिन्सला तडाखा

  • मागील तीन वर्षांतील सर्वांत भयंकर अशा ‘हैमा’ वादळाने फिलिपिन्समध्ये धडक दिली असून, या वादळाच्या तडाख्यात १२ लोकांचा मृत्यु झाला आहे.
  • फिलिपिन्सच्या उत्तर प्रांतामध्ये हजारो हेक्टर शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामध्ये भात आणि मक्याच्या शेतांचे अमर्याद नुकसान झाले आहे.
  • ताशी २२५ किलोमीटर वेगाचे वारे आणि मुसळधार पावसासह कॅगायन प्रांतात या वादळाने धडक दिली. तेथे किमान ५० ते ६० हजार हेक्टर भात शेती जमीनदोस्त झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा