चालू घडामोडी : १३ नोव्हेंबर


आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी नरेंद्र ध्रुव बत्रा

  • हॉकी इंडियाचे (एचआय) अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बत्रा यांची आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या (एफआयएच) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बत्रा यांच्याकडे चार वर्षे अध्यक्षपद राहणार आहे.
  • या पदी निवड झालेले ते पहिले भारतीय, त्याचबरोबर पहिले आशियाईदेखील ठरले आहेत. 
  • एफआयएचचे १२वे अध्यक्ष म्हणून बत्रा आंतरराष्ट्रीय हॉकीचे नेतृत्व करतील. मावळते अध्यक्ष लिएंड्रो नेग्रे यांच्याकडून ते पदाचा कारभार स्वीकारतील.
  • एफआयएचच्या या अध्यक्षपदासाठी त्यांच्यासमोर आयर्लंडच्या डेव्हीड बालबर्नी आणि ऑस्ट्रेलियाच्या केन रीड यांचे कडवे आव्हान होते.
  • या मतदानामध्ये एकूण ११८ मतांपैकी सर्वाधिक ६८ मतांनी बत्रा यांची निवड झाली.
  • देशातील एक दिग्गज क्रीडा प्रशासक म्हणून ५९ वर्षीय बत्रा यांची छबी आहे.

मारिया शारापोवा पुन्हा यूएनडीपीची गुडविल अ‍ॅम्बॅसडर

  • रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोवा हिला गेल्यावर्षी लादलेली बंदी कमी केल्यानंतर पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची (यूएनडीपी) गुडविल अ‍ॅम्बॅसडर बनवण्यात आले आहे.
  • पाचवेळच्या ग्रॅण्डस्लॅम विजेत्या शारापोवाला फेब्रुवारी २००७मध्ये या संस्थेची ब्रँड अ‍ॅम्बॅसडर बनवण्यात आले.
  • मात्र, डोप टेस्टमध्ये मेल्डोनियम नावाचे औषध आढळल्याने तिच्यावर क्रीडा लवादने दोन वर्षांची बंदी घातली होती.
  • या बंदीमुळे शारापोवा रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळू शकली नाही. यानंतर युएनडीपीने शारापोवासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. 
  • मात्र बंदीची शिक्षा कमी करून १५ महिने करण्यात आल्यानंतर तिला पुन्हा एकदा यूएनडीपीची गुडविल अ‍ॅम्बॅसडर बनवण्यात आले आहे.
  • शरापोव्हावरील हा बंदीचा कालावधी येत्या एप्रिल माहिन्याच्या अखेरीस संपणार असून त्यानंतर तिचे टेनिस क्षेत्रात पुनरागमन होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा