चालू घडामोडी : १७ नोव्हेंबर

प्रा. राज बिसारिया यांना ‘कालिदास सम्मान’

 • उत्तर भारतातील आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार प्रा. राज बिसारिया यांना मध्य प्रदेश सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘कालिदास सम्मान’ प्रदान करण्यात आला.
 • आधुनिक नाटय़क्षेत्रात उत्तर प्रदेशातून पद्मश्री मिळालेले ते पहिलेच रंगकर्मी असून, उत्तर भारतातील कलाविष्कारात जिवंतपणा आणण्याचे श्रेय त्यांना आहे.
 • बिसारिया यांचा जन्म उत्तर प्रदेशात १९३५मध्ये लखीमपूर खेरी येथे झाला. लखनौ विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले. कालांतराने लखनौ विद्यापीठातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. 
 • १९६२मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी थिएटर ग्रुप स्थापन केला होता. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी थिएटर आर्ट्स वर्कशॉपची स्थापना केली.
 • १९७५मध्ये भारतेंदु अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स ही संस्था स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता.
 • नाटकाचे प्रशिक्षण त्यांना लंडनच्या ब्रिटिश ड्रामा लीग या संस्थेतून मिळाले. अनेक पाश्चिमात्य अभिजात व समकालीन नाटके त्यांनी दिग्दर्शित केली होती.
 • नौटंकी या लोककलेला त्यांनी नाटकात स्थान दिले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतही त्यांनी काम केले. 
 • भारतीय, ब्रिटिश, युरोपीय व अमेरिकी नाटककारांची किमान १०० नाटके त्यांनी दिग्दर्शित केली.
 • त्यांना मिळालेला कालिदास सम्मान यापूर्वी पंडित रविशंकर, चित्रकार एम. एफ. हुसेन, पंडित जसराज, शंभू मिश्रा, हबीब तन्वीर व इब्राहिम अल्काझी यांना मिळाला आहे.

भारत आणि चीनचा संयुक्त लष्करी सराव

 • दहशतवादाला विरोध करण्यासाठी भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील ‘हॅंड इन हॅंड’ या सहाव्या संयुक्त सरावाला पुण्यात सुरवात झाली.
 • निमशहरी भागात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संयुक्त नियोजन करणे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश आहे. 
 • या सरावादरम्यान एकमेकांची शस्त्रे जवानांना हाताळता येणार आहेत. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर स्फोटकांची हाताळणी, शोधमोहीम यांचा सराव यात करण्यात येणार आहे.
 • यात दोन व्यूहरचनात्मक सराव करण्यात येतील. तसेच, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदतीचा हात देण्याबाबतही प्रात्यक्षिक होणार आहे. 

पोस्ट ट्रथ २०१६चा आंतरराष्ट्रीय शब्द

 • पोस्ट ट्रथ हा २०१६ या वर्षांतील आंतरराष्ट्रीय शब्द ठरल्याचे ऑक्सफर्ड डिक्शनरीजने जाहीर केले आहे.
 • अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षीय निवडणुकीतील अनपेक्षित विजय व ब्रेक्झिट यासारख्या घटनांमुळे या शब्दाचा वापर दोनशे पटींनी वाढला आहे.
 • वस्तुनिष्ठ परिस्थिती जनमतावर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याच्या परिस्थितीत हा शब्द वापरला गेला असून, लोकांनी भावना व व्यक्तिगत श्रद्धा यांच्या आधारे त्यांचे जनमत ठरवले आहे.
 • गेल्या वर्षभरापासून लोकप्रिय ठरलेल्या या शब्दाचा वापर २००० टक्के वाढला असल्याचे शब्दकोश संशोधनातून दिसून आले आहे.
 • गेली वीस वर्षे हा शब्द अस्तित्वात असून, ब्रेक्झिट मतदानानंतर जूनमध्ये या शब्दाच्या वापरात वाढ झाली.
 • नंतर ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्यापासून या शब्दाचा वापर आणखी वाढला.
 • गेल्या वर्षी आनंदाश्रू असलेल्या चेहऱ्याचा उल्लेख करणारा इमोजी हा शब्द निवडला गेला होता, पण तो वादग्रस्त ठरला होता.

चीनचा तियानहू लाइट सर्वाधिक वेगवान महासंगणक

 • चीनचा सनवे तियानहू लाइट हा महासंगणक जगात सर्वाधिक वेगवान महासंगणक ठरला आहे.
 • त्याचा गणनाचा वेग सेकंदाला ९३ दशलक्ष अब्ज आकडेमोडी इतका आहे. त्याचे प्रोसेसर म्हणजे संस्कारक हे चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत.
 • अर्धवार्षिक टॉप ५०० महासंगणकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात चीनने लागोपाठ ८व्या वर्षी वेगवान महासंगणकाचा मान पटकावला.
 • तियानहू लाइट मागचा विजेता तियानहे २ पेक्षा तीनपट वेगवान आहे. तो संगणकही चीनचाच होता पण त्यात इंटेलच्या चीप आहेत.
 • तियानहे २ हा संगणक लागोपाठ तीन वर्षे पहिल्या क्रमांकावर आला होता. लागोपाठ आठ वर्षे चिनी महासंगणक पहिल्या क्रमांकावर आहे.
 • अमेरिकेचे टायटन व सिक्वोइया हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले. तर अमेरिकेतील कोरी हा महासंगणक पाचव्या स्थानावर गेला आहे.

No comments:

Post a Comment