चालू घडामोडी : २५ नोव्हेंबर

जुन्या नोटांच्या स्वरूपातील काळ्या पैशावर ५० टक्के कर

  • बँकेत जुन्या नोटांच्या आधारे भरण्यात आलेल्या बेहिशेबी रकमेवर ५० टक्के कर आकारण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.
  • काळ्या पैशापैकी उरलेल्या ५० टक्के रकमेतील अर्धीच रक्कम खातेदाराला वापरता येईल. म्हणजेच एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम खातेदाराला चार वर्षे बँकेतच ठेवावी लागणार आहे.
  • तसेच जे आपल्याकडील बेहिशेबी रकमा जाहीर करणार नाहीत व प्राप्तिकर वा अन्य यंत्रणांच्या छाप्यांमध्ये त्या उघड झाल्या, तर त्यावर ९० टक्के करआकारणी करण्यात येणार आहे. शिवाय त्यावर मोठा दंडही आकारला जाणार आहे.
  • त्यासाठी प्राप्तिकर तसेच अन्य कायद्यांत दुरुस्ती करण्यासाठी संसदेमध्ये विधेयक आणण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारने यापूर्वी बँक खात्यात अडीच लाख रुपये जमा करणाऱ्यांना कोणताही कर तगादा अथवा दंड लागू होणार नाही, असे स्पष्ट केले होते.
  • त्याहून अधिक रक्कमही खातेदारांना बँकेतील आपल्या खात्यांमध्ये जमा करता येईल. त्याचे नीट हिशेब दिल्यास त्यावर कर आकारण्यात येणार नाही.
  • केवळ ज्या रकमेचा हिशेब खातेदार देणार नाही, त्यावरच ५० टक्के कर आकारण्यात येईल आणि उरलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम पुढील चार वर्षे खातेदाराला काढता येणार नाही.

डॉ. अनिल भारद्वाज यांना इन्फोसिस पुरस्कार

  • विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांना भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला.
  • उत्तर प्रदेशात जन्मलेले असले भारद्वाज गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ येथे कार्यरत आहेत.
  • त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण लखनौ विद्यापीठातून झाले. वाराणसीच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी २००२मध्ये ग्रह व अवकाश विज्ञान या विषयात पीएचडी केली.
  • मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे.
  • त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो.
  • भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अ‍ॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत.
  • चंद्रा अ‍ॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
  • त्यांनी आतापर्यंत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, युरोपा, गिनीमीड, ट्रिटॉन, टायटन या ग्रह व उपग्रहांवर संशोधन केले आहे.
  • चांद्रयान १ मोहिमेत त्यांनी सारा म्हणजे अ‍ॅटॉमिक रिफ्लेक्टिंग अ‍ॅनलायझर प्रयोगात मोठी भूमिका पार पाडली होती.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर क्ष किरण दुर्बीण, हबल दुर्बीण, न्यूटन एक्सरे दुर्बीण, भारतातील जीएमआरटी रेडिओ दुर्बीण या प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे.
  • आताचा पुरस्कार त्यांना चांद्रयान १ व मंगळ मोहिमेतील काही प्रयोगांसाठी देण्यात येत आहे.
  • यापूर्वी त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन

  • ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे २५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
  • पाडगावकर यांची किडनी निकामी झाली होती. उपचारासाठी त्यांना रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
  • आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक म्हणून परिचीत होते. शिवाय, त्यांचा काश्मीर प्रश्नाबाबतचा अभ्यासही गाढा होता.
  • पाडगावकर यांचा १ मे १९४४ रोजी जन्म झाला होता. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. फ्रान्समधून दिग्दर्शन व पटकथा लेखन पदवी मिळवली होती.
  • त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली होती. सन १९७८ ते ८६ या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी म्हणून काम पाहिले होते.
  • फ्रान्सद्वारे २००२मध्ये पाडगावकरांचा पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

  • सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) मधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. 
  • दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषणात मोठी वाढ झाली होती.
  • त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आता दिल्ली आणि परिसरातील सर्व फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.
  • या आदेशाची तात्काळ अंलबजावणी करण्यात येणार असून, पुढच्या आदेशांपर्यंत ती कायम राहणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही फटाक्यांच्या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याते निर्देश दिले आहेत.
  • तसेच न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला ६ महिन्यांत फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या हानीकारक परिणामांबद्दल अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
  • फटाके नागरिकांच्या आयुष्याचा भाग बनले आहेत मात्र त्यांच्या वापरावर निर्बंध येणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी होणेही गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी

  • टाटा स्टील कंपनीने सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून दूर केल्याचे जाहीर केले आहे.
  • मिस्त्री यांच्या जागी कंपनीतील स्वतंत्र संचालक असलेल्या ओ पी भट यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भट हे यापूर्वी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुखपदी कार्यरत होते.
  • टाटा स्टीलला तिच्या प्रमुख प्रवर्तकांकडून सायरस मिस्त्री व नसली वाडिया यांना संचालकपदांवरून दूर करण्याविषयी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी, असेही सुचवण्यात आले होते.
  • यानुसार, टाटा स्टीलने ठराव मंजूर करून ओ. पी. भट्ट यांना कंपनीचा अध्यक्ष म्हणून घोषित केले. पुढील निर्णयापर्यंत भट्ट हेच कंपनीचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहेत.
  • ११० अब्ज डॉलर्सच्या व्यवसाय समूहातील विशेषत: टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस कंपन्यांना मिस्त्री यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक फटका सहन करावा लागला होता.
  • या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.
  • आता टाटा समूहातील आदरातिथ्य व्यवसायाच्या प्रमुखपदावरून मिस्त्री यांना हटविण्यासाठी इंडियन हॉटेल्सनेही प्रस्ताव मांडला आहे.
  • टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतरही सध्या मिस्त्री हे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षपदी कायम आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा