चालू घडामोडी : १ डिसेंबर

सरकारचे आता सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर लक्ष

  • लोकसभेत मंजुर करण्यात आलेल्या सुधारित आयकर कायद्यानुसार सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
  • बेहिशेबी मालमत्तेनंतर सरकार आता जनतेकडे असणाऱ्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
  • सरकारच्या नव्या नियमानुसार विवाहित महिलांना ५० तोळे (५०० ग्रॅम) सोने, अविवाहित महिलांना २५ तोळे (२५० ग्रॅम), तर पुरुषांना १० तोळे (१०० ग्रॅम) सोने बाळगता येणार आहे.
  • त्यापेक्षा जास्त सोने आढळले आणि ते अघोषित उत्पन्नातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले तर ते जप्त केले जातील.
  • मात्र या मर्यादेपर्यंतचे (प्रत्येकी ५०, २५ आणि १० तोळे) दागिने अघोषित उत्पन्नातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले तरी ते जप्त न करण्याचे आदेश आयकर अधिका‍ऱ्यांना देण्यात आले आहेत.
  • घोषित किंवा कृषी उत्पन्नातून (ज्याला आयकरातून सवलत देण्यात आली आहे) खरेदी केलेल्या सोन्यावर कोणताही कर लावला जाणार नाही.
  • त्याचबरोबर ज्ञात उत्पन्नातून, बचतीच्या माध्यमातून व कायदेशीररित्या खरेदी केलेल्या सोन्यावर देखील कर लागणार नाही.
  • तसेच वारसाहक्काने मिळालेले सोने आणि दागिन्यांवर कर लागू करण्याची कोणतीही तरतूद विद्यमान किंवा सुधारित कायद्यामध्ये नाही.

विक्स अ‍ॅक्शन ५००, डीकोल्डवरील बंदी न्यायालयाने उठवली

  • सरकारने सर्दी, डोकेदुखीवरील विक्स अ‍ॅक्शन ५००, कोरेक्स कफ सिरफ व डीकोल्डसह ३४४ औषधांवर लादलेली बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने उठवली आहे.
  • केंद्र सरकारने १० मार्च रोजी या औषधांवर बंदी घातली होती. तर न्यायालयाने १४ मार्च रोजी या बंदीला स्थगिती दिली.
  • फायजर, ग्लेनमार्क, प्रॉक्टर अँड गॅम्बलर, सिप्ला आणि काही स्वयंसेवी संस्थांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला आहे.
  • या ३४४ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेताना केंद्राने नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
  • फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होत असल्याचे कारण त्यावेळी सरकारने दिले होते.
  • आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे सरकारने औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
  • बंदी घातलेली औषधे ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनशिवाय मेडिकलमधून घेण्यात येत होती. तसेच ही औषधे जाहिरातबाजीमुळे लोकप्रिय झाली होती.

डॉ. शारदा पोटुकुची यांना वनस्पती वैज्ञानिक पुरस्कार

  • जैवतंत्रज्ञान क्षेत्रात महिला वैज्ञानिक डॉ. शारदा पोटुकुची यांना ‘एपीएसआय’ (अ‍ॅकॅडमी ऑफ प्लाण्ट सायन्सेस, इंडिया) या संस्थेचा आंतरराष्ट्रीय वनस्पती वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे.
  • त्यांनी वनस्पतींच्या उती व जनुकीय अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा हा गौरव आहे.
  • डॉ. शारदा यांचा वनस्पती जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाचा वीस वर्षांचा अनुभव आहे. काही औषधी वनस्पतींच्या मेटॅबोलाइट उत्पादन प्रक्रियेत त्यांनी वेगळा संशोधनात्मक दृष्टिकोन मांडला आहे.
  • १९९८मध्ये त्यांनी हैदराबाद विद्यापीठात जैव विज्ञानात एम.एस्सी.ला पहिला क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकावले होते. सध्या त्या श्रीमाता वैष्णोदेवी विद्यापीठात जैवतंत्रज्ञान शास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक आहेत.
  • वनस्पती जैवतंत्रज्ञान विषयात त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील क्वाझालू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली, त्यासाठी त्यांना नॅशनल रीसर्च फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती.
  • प्लांट टिश्यू कल्चर, जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन, बायोरिअ‍ॅक्टर कल्टिव्हेशन ऑफ मेडिसिनल प्लॅण्टस, बायोअ‍ॅक्टिव्ह मेटॅबोलाइट प्रॉडक्शन हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
  • त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले असून त्यांचे संशोधन तरुण पिढीला प्रेरणादायी असेच आहे.

पंकज अडवाणीला कांस्यपदक

  • भारताच्या पंकज अडवाणीला दोहा येथे सुरू असलेल्या आयबीएसएफ विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.
  • उपांत्य फेरीच्या सामन्यात वेल्सच्या अँड्र्यू पॅगेटने ७-२ अशा फरकाने गतविजेत्या पंकजचे आव्हान संपुष्टात आणले.
  • स्नूकर आणि बिलियर्ड्स या दोन्ही विश्व अजिंक्यपद स्पर्धेत खेळणारा  पंकज हा जगातील एकमेव खेळाडू आहे.

महा वजीरालोंककोर्न यांना थायलंडचे राजेपद

  • थायलंडचे राजे भूमीबोल अदुल्यादेज यांच्या जागी युवराज महा वजीरालोंककोर्न यांना तेथील पार्लमेंटने राजेपद बहाल केले आहे.
  • थायलंडचे राजे भूमीबोल यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते व ते जगातील सर्वात जास्त काळ सिंहासनावर राहिलेले राजे होते.
  • थायलंडच्या १९२४च्या कायद्यात राजेपदी कुणाची नेमणूक करायची हे ठरवून दिलेले आहे. तेथील राजांनाच उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार दिलेला आहे.
  • त्यात भूमीबोल यांनी त्यांचे द्वितीय पुत्र वजिरालोंककोर्न यांना उत्तराधिकारीपद दिले होते.
  • नवनियुक्त राजे ६४ वर्षांचे असून त्यांचे आयुष्य थायलंडबाहेर व्यतीत झाले आहे. ते जर्मनीत असतात व ते मायदेशात राहत नसल्याने काही आक्षेप होते.
  • त्यांनी अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियातून अपारंपरिक युद्धतंत्र व नौदलाचे प्रशिक्षण घेतले आहे. ते लष्कराचे वैमानिक व हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून पात्रताधारक आहेत.
  • त्यांच्या नेमणुकीत काही वाद जरूर होते पण आता ते बाजूला पडले आहेत.

इन्विन्सिबल इंडियन्सचा बजाजकडून गौरव

  • सर्व प्रतिकूल परिस्थिती झुगारून समाजात महत्त्वपूर्ण बदल घडवणाऱ्या, देशासाठी काम करणाऱ्या पाच व्यक्तींना बजाजने सन्मानित केले. नेमबाज अभिनव बिंद्राच्या हस्ते पाच जणांचा गौरव करण्यात आला.
  • बजाज कंपनीने ‘इन्विन्सिबल इंडियन्स : स्टोरीज दॅट इव्होक प्राइड एव्हरी डे’ या शीर्षकाखाली नव्या उपक्रमाची सुरुवात केली.
  • या उपक्रमाद्वारे सामान्य भारतीयांच्या असामान्य कथा प्रकाशात येतील. भविष्यात अधिकाधिक ‘इन्विन्सिबल इंडियन्स’ तयार व्हावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
 सन्मान करण्यात आलेल्या पाच व्यक्ती 
  • बारमाही पाणीसंकट टाळण्याच्या उद्देशाने लडाखमध्ये १५ कृत्रिम हिमनद्यांची निर्मिती करणारे चेवांग नॉरफेल.
  • कोलकाता येथे लागलेल्या शंभराहून अधिक आगीतून लोकांची सुटका करणारे बिपीन गणात्रा.
  • एनसीआर भागात फिरून लोकांना नको असलेली औषधे जमा करून, ती हॉस्पिटलमधील गरजू गरिबांना वाटणारे ओमकारनाथ शर्मा.
  • राजस्थानातील गावांमधून बालविवाहांचे समूळ उच्चाटन व्हावे, याकरिताच्या चळवळीतील विजयालक्ष्मी शर्मा.
  • स्वत:च्या बाइकचे रुग्णवाहिकेत परिवर्तन करून, मोफत सेवा देणारे करिमूल हक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा