चालू घडामोडी : १२ डिसेंबर

केहकशा बसूला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार

 • पर्यावरण संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भारतीय वंशाच्या केहकशा बासूला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 • तिला एक लाख युरोचा हा पुरस्कार आहे. अवघ्या सोळा वर्षांच्या वयात तिने केलेले काम थक्क करणारे आहे.
 • या पुरस्कारासाठी जगभरातून १२० नावे पुढे आली होती. आंतरराष्ट्रीय बालहक्क संघटनेने त्यातून ही निवड केली.
 • शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनूस यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी हॅंग्वे येथे या पुरस्काराचे वितरण झाले. 
 • तिने वयाच्या चौदाव्या वर्षी ग्रीन होप ही संस्था दुबईमध्ये सुरू केली. आता ती संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाची जागतिक समन्वयक आहे.
 • ही संस्था दहा देशांमध्ये कार्यरत असून, टाकाऊ वस्तू गोळा करणे, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे आदी कामे तिच्या माध्यमातून होतात. 
 • तिचे सगळे कार्य पर्यावरण क्षेत्रात असून एकूण ४५ देशांत फिरून तिने पृथ्वीच्या संरक्षणाचा संदेश पोहोचवला आहे.
 • अमेरिका, ओमा, नेपाळ, मेक्सिको, कोलंबिया, फ्रान्स या देशात पाच हजार झाडांची लागवड करण्याचा प्रयोग तिने केला आहे.
 • केहकशा ही वर्ल्ड फ्युचर कौन्सिलची युवा दूत आहे. तिला आतापर्यंत शेख हमदान पुरस्कार व डायना पुरस्कारही मिळाला आहे.

नॅशनल जिओग्राफीकच्या स्पर्धेत वरुण अदित्यला प्रथम क्रमांक

 • नॅशनल जिओग्राफीकतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ‘नेचर फोटोग्राफर ऑफ द इअर’ या छायाचित्रांच्या स्पर्धेत दोघा भारतीयांनी स्थान मिळविले आहे.
 • ‘ऍनिमल पोट्रेट’ प्रकारात महाराष्ट्राच्या वरुण अदित्यच्या छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • तर ‘लॅंडस्केप’ प्रकारात प्रसेनजीत यादवच्या छायाचित्राला पारितोषिक मिळाले आहे.
 • ‘ड्रॅगिंग यू डीप इनटू द वूड्स’ असे नाव देताना वरुणने एका २० सेंटिमीटर लांबीच्या हिरव्या सापाचे अप्रतिम छायाचित्र काढले आहे. याच छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

वरदाह चेन्नईच्या किनारपट्टीवर दाखल

 • बंगालच्या उपसागरात तयार झालेले वरदाह नावाचे चक्रीवादळ १२ डिसेंबर रोजी तामिळनाडूतील चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकले.
 • तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या या राज्यांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून वरदाहच्या तडाख्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
 • मध्यरात्रीपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
 चक्रीवादळाचं नाव कसे ठरते? 
 • तामिळनाडूत आलेल्या चक्रीवादळाला वरदाह हे नाव पाकिस्तानने ठेवले. या शब्दाचा अर्थ आहे गुलाब. हा मूळ उर्दू शब्द आहे.
 • चक्रीवादळाच्या नामकरणाला १९५३मध्ये अटलांटिक क्षेत्रात झालेल्या करारानुसार सुरुवात झाली.
 • चक्रीवादळासंदर्भात दोन देशात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी मदत होणे हे चक्रीवादळाला नाव देण्यामागचे मुख्य कारण आहे.
 • हिंदी महासागरात येणाऱ्या वादळांना नावे देण्याचा प्रस्ताव भारताने मांडला होता. त्यानुसार २००४पासून हिंदी महासागरातल्या वादळांना आशियातले ८ देश क्रमाक्रमाने नावे सुचवतात.
 • भारत, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, मालदीव, श्रीलंका, ओमान आणि थायलंड या ८ देशांच्या वेधशाळा क्रमाक्रमाने वादळाला नाव देतात.
 • ‘वरदाह’च्या पूर्वी आलेल्या ‘हुडहुड’ वादळाचे नाव ओमानने ठेवले होते. त्यापूर्वीचे ‘फायलीन’ नाव थायलंडने सुचवले होते.
 • आतापर्यंत चक्रीवादळांची ६४ नावे ठेवण्यात आली आहेत. भारताने आत्तापर्यंत अग्नि, आकाश, बिजली, लहर आणि जल अशी नावे दिली.

व्हेनेजुएलामध्येही नोटबंदी

 • व्हेनेजुएलाने भारताच्या पावलावर पाऊल टाकत नोटबंदीचा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला आहे.
 • व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देशातील सर्वाधिक मुल्याची १०० बोलिव्हरची नोट पुढील ७२ तासांत चलनातून रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
 • साठवलेल्या नोटा बदलण्याची संधीच माफियांना मिळू नये, म्हणून कोलंबिया, ब्राझीलमधून व्हेनेजुएलात येणारे सर्व सागरी, हवाई मार्ग आणि रस्ते बंद करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे.
 • माफिया आणि तस्करांकडून सुरू असलेला काळ्या पैशांचा बाजार रोखण्यासाठी व्हेनेझुएलाच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 • व्हेनेझुएला सध्या गंभीर अर्थसंकटात सापडली असून सध्या याठिकाणी जगातील सर्वाधिक महागाई आहे.
 • सरकारच्या निर्णयानुसार १०० बोलिव्हरच्या २०० पट मुल्याच्या स्वरूपात नव्या नोटा आणि नाणी छापली जातील.
 • सध्या बाजारात १०० बोलिव्हरच्या नोटेचे मुल्य खूपच खालावले असून ते २ ते ३ अमेरिकन सेंट इतक्या निचांकी पातळीला पोहचले आहे.
 • चलनाची किंमत घसरल्यामुळे व्हेनेझुएलाला तेल निर्यातीच्या व्यवहारातही मोठा फटका बसला होता. त्यामुळे देशाच्या तिजोरीत डॉलर्सची चणचण निर्माण झाली होती.
 • व्हेनेझुएलातील महागाई दर या वर्षाच्या अखेरीपर्यंत ४७५ टक्के तर २०१७ पर्यंत १००० टक्के होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे.

मिस्त्रींची टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरुन  हकालपट्टी

 • टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना टाटा इंडस्ट्रीजच्या संचालकपदावरुनही हटवण्यात आले आहे. 
 • सायरस मिस्त्रींना हटवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. त्यात मतदानाने मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • टाटा समूहातील कंपन्यांच्या ज्या पदांवर मिस्त्री आहेत त्या पदांवरुन त्यांना हटवण्यात येत आहे.
 • या कारवाईमुळे सायरस मिस्त्री यांचा टाटा इंडस्ट्रीजमधील अध्यक्षपदाचा अधिकारही संपुष्टात आला आहे.
 • रतन टाटा यांनी टाटा इंडस्ट्रीजच्या समभागधारकांना पत्र लिहून सायरस मिस्त्री यांना पदावरून दूर करण्यासाठी पाठिंब्याची विनंती केली होती.

आयएसआयच्या प्रमुखांची हकालपट्टी

 • पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी आयएसआय या देशातील अत्यंत प्रभावी गुप्तचर संथेच्या प्रमुखपदावरुन रिझवान अख्तर यांची हकालपट्टी केली आहे.
 • उचलबांगडी झालेल्या अख्तर यांचे स्थान सांभाळण्यासाठी लेफ्टनंट जनरल नाविद मुख्तार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • रिजवान अख्तर यांची राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ (एनडीयू) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 • मुख्तार यांना गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी आयएसआयच्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुखपदही भूषवले आहे. 
 • दोन आठवडयांपूर्वी जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झालेला हा महत्वाचा बदल आहे.
 • भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे अख्तर यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.
 • नोव्हेंबर २०१४मध्ये अख्तर यांची तीन वर्षांसाठी आयएसआयप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

१०० मिलियन्स फॉर १०० मिलियन्स

 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त बालकामगार, बालगुलामगिरी आणि बालहिंसेविरोधातील ‘१०० मिलियन्स फॉर १०० मिलियन्स’ या मोहिमेला सुरुवात केली.
 • नोबेल पुरस्कारविजेते कैलाश सत्यार्थी यांच्या ‘सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन’तर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ५००० मुलांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
 • देश-विदेशातील लहान मुले, तरुणांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

आणखी तीन भाषांना घटनात्मक दर्जा मिळणार

 • भोजपूरी, भोटी आणि राजस्थानी या ३ भाषांना घटनात्मक दर्जा मिळणार असून त्यांचा राज्यघटनेच्या ८व्या अनुसूचित समावेश करण्यात येणार आहे.
 • या तीन भाषा भुतान, सुरीनाम, मॉरिशस, त्रिनिनाद आणि नेपाळमध्येही बोलल्या जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • जर संसदेचे कामकाज सुरळीत चालले असते तर याच अधिवेशनात ही घोषणा झाली असती, परंतु आता पुढच्या अधिवेशनात ही घोषणा होणार आहे.

जगातील सर्वांत मोठा बोगद्यातून वाहतूक सुरु

 • जूनमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठा बोगदा असलेल्या स्वित्झर्लंडमधील गॉटहार्ड बेस टनेलमधून ११ डिसेंबरपासून प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.
 • झ्युरिच ते लुगानो रेल्वे प्रवासी घेऊन या बोगद्यातून धावली. बोगद्यामुळे या प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी झाला आहे.
 • हा बोगदा ५७ किलोमीटरचा आहे. तो बांधण्यासाठी १७ वर्षे लागली असून, त्यासाठी १.८ कोटी डॉलर खर्च आला आहे.
 • या बोगद्याच्या बांधणीत पारंपरिक ब्लास्ट अँड ड्रिल या तुलनेने जोखमीच्या पद्धतीऐवजी टनेल बोअरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
 • या बोगद्यामुळे रॉटरडॅम (पश्चिम नेदरलँडमधील शहर) आणि अॅड्रियाटिक समुद्र (इटलीचा पूर्व किनारा) या दरम्यानचे अंतर कमी वेळात कापणे शक्य होणार आहे.
 जगातील सर्वात लांब बोगदे 
 1. गॉटहार्ड बेस टनेल (स्वित्झर्लंड): ५७ किमी
 2. सेइकान बोगदा (जपान): (५३.९ किमी)
 3. चॅनेल टनेल (ब्रिटन व फ्रान्सला जोडणारा): ५०.५ किमी

अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी शशिकला

 • तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी शशिकला यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.
 • जयललिता ‘अम्मा’, तर शशिकला या ‘चिनम्मा’ (लहान मावशी) म्हणून ओळखल्या जातात.
 • जयललिता यांचे अनेक वर्षे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे तंबीदुराई तसेच सेनगोट्टयन हेही अण्णा द्रमुकच्या सरचिटणीसपदाच्या शर्यतीत होते.

No comments:

Post a Comment