चालू घडामोडी : १७ डिसेंबर

पंतप्रधान गरीब कल्याण योजना

 • मोदी सरकारने १६ डिसेंबर रोजी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची अधिकृत घोषणा केली.
 • लोकसभेत मंजूर झालेल्या प्राप्तिकर दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मंजुरी दिल्यामुळे या योजनेला सुरुवात झाली आहे.
 • या योजनेमुळे प्राप्तिकर विवरणपत्रात आजवर न दाखवलेली अघोषित संपत्ती वैध करण्याची अखेरची संधी करदात्यांना उपलब्ध झाली आहे.
 • योजनेची सुरुवात १७ डिसेंबरपासून सुरू होत असून, ३१ मार्च २०१७पर्यंत ई मेलव्दारे या अघोषित उत्पन्नाची माहिती प्राप्तिकर विभागाला देता येईल.
 • प्राप्तिकर कायदा दुरूस्तीनुसार अघोषित उत्पन्न घोषित करणाऱ्यांना ५० टक्के रक्कम करापोटी भरावी लागेल. हा कर ३० सप्टेंबरपूर्वी ४५ टक्के होता.
 • करदात्याने अघोषित उत्पन्न घोषित करण्याचे टाळले आणि प्राप्तिकर विभागाने ते शोधून काढले तर त्या रकमेवर ७५ टक्के कर व १० टक्के दंड भरावा लागेल.
 • नोटाबंदीनंतर अघोषित उत्पन्नावर ३० टक्के कर व १० टक्के दंड आकारला जाईल. याखेरीज ३० टक्के कराच्या रकमेवर ३३ टक्के सरचार्जही भरावा लागेल.
 • तसेच अघोषित उत्पन्नातील २५ टक्के रक्कम पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत ४ वर्षांसाठी गुंतवावी लागेल.
 • या पैशांचा वापर शिक्षण, आरोग्य, सिंचन, पायाभूत सुविधा, शौचालय अशा विविध कामांसाठी केला जाणार आहे. ४ वर्षांसाठी हे पैसे या योजनेसाठी वापरले जातील.
 • असे अघोषित उत्पन्न जाहीर करणाऱ्या व्यक्तींची माहिती पूर्णत: गोपनीय ठेवली जाणार आहे. त्यांच्या खात्यांची माहितीही उघड केली जाणार नाही.
 • काळा पैसाधारकांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने blackmoneyinfo@incometax.gov.in हा ई-मेल पत्ता तयार केला आहे.
 • जनतेने त्यांच्याकडे असलेली काळा पैसाधारकांविषयीची माहिती या ई-मेल पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन सरकारने केले आहे.
 • ई-मेल पाठविणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. तसेच ई-मेल पत्त्यावर येणाऱ्या प्रत्येक माहितीची दखल घेऊन कारवाई केली केली जाणार आहे.

राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभांरभ

 • राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी १७ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभांरभ केला.
 • ‘सबके लिए भोजन, सबके लिए सन्मान’, या उद्दिष्टासह सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत ५ रुपयांत नाष्टा आणि ८ रुपयांत जेवण मिळणार आहे.
 • या योजनेचा लाभ गरीब, मजूर, विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिकांसह सर्वांनाच होणार आहे.
 • अन्नपूर्णा रसोई योजनेमध्ये जेवण पुरविण्यासाठी स्पेशल व्हॅन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
 • सध्या राज्यातील १२ जिल्ह्यांत ही योजना सुरू करण्यात आली असून एकूण ८० व्हॅन ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था करतात. 
 • लवकरच राजस्थानमधील सर्व ३३ जिल्ह्यांत ३०० ठिकाणी या योजनेचा लाभ पोचविण्यात येणार आहे.
 • तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सरकारी अनुदान तत्वावर अम्मा कॅंटीन यशस्वीरित्या चालवली होती.
 • २०१३साली सुरू करण्यात आलेल्या या कॅंटीनमध्ये १ रुपयात नाष्टा आणि ५ रुपयांमध्ये जेवण देण्याची सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर राजस्थान सरकारने अन्नपूर्णा रसोई योजना सुरू केली आहे.

एलआयसीच्या अध्यक्षपदी विजय कुमार शर्मा

 • भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)च्या अध्यक्षपदी विजय कुमार (व्ही. के.) शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • गेल्या तीन महिन्यांपासून हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणारे शर्मा यांची नियुक्ती ही पुढील पाच वर्षांसाठी असेल.
 • महामंडळाचे एस. के. रॉय यांनी निवृत्तीला दोन वर्षे शिल्लक असतानाच जून २०१६मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्तच होते.
 • तर व्यवस्थापकीय संचालकपद असलेले शर्मा १६ सप्टेंबरपासून अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत होते.
 • १९८१मध्ये अधिकारी म्हणून महामंडळात रुजू झालेले शर्मा २०१३मध्ये व्यवस्थापकीय संचालक बनले. कंपनीच्या दक्षिण परिमंडळाचे ते व्यवस्थापकही राहिले आहेत.
 • एलआयसी समूहातील एलआयसी हाऊसिंग फायनान्स या गृहवित्त कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
 • एलआयसीने गेल्या आर्थिक वर्षांत ४०,००० कोटी रुपयांचा नफा कमाविला असून मार्च २०१६ अखेरचे कंपनीचे एकूण उत्पन्न ४.३१ लाख कोटी रुपये नोंदविले आहे.
 • लआयसीचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात १५ टक्के हिस्सा (२२.१० लाख कोटी रुपयांची मालमत्ता) असून आणि ती आरबीआयनंतर सरकारला सर्वाधिक नफा मिळवून देणारी कंपनी आहे. 

स्थलांतरीतांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर

 • अन्य देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या नागरिकांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
 • प्यू रिसर्चच्या अहवालानुसार १.५६ कोटी भारतीय परदेशात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
 या अहवालानुसार 
 • जागतिक लोकसंख्येच्या ३.३ टक्के (२४.४ कोटी) लोक आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.
 • इतर देशाच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ४.६६ कोटी स्थलांतरित नागरिक राहतात.
 • या यादीमध्ये भारतानंतर अनुक्रमे मेक्सिको (१.२३ कोटी), रशिया (१.०६ कोटी), चीन (९५ लाख) आणि बांगलादेश (७२ लाख) या देशांचा क्रमांक लागतो.

अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या सविता वैद्यनाथन महापौरपदी

 • अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यातील कुपरटिनो शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाच्या सविता वैद्यनाथन यांची निवड झाली आहे.
 • अमेरिकेच्या एखाद्या शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाची महिला विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 • सविता यांनी एमबीएपर्यंत शिक्षण घेतले असून त्या शाळेत गणिताच्या शिक्षिका म्हणून व बँकेत अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे.
 • सविता वैद्यनाथन या गेल्या १९ वर्षांपासून कुपरटिनो शहरात राहत आहेत. शहरात होणाऱ्या अनेक कार्यक्रमात त्या सक्रीय सहभाग नोंदवत असतात.
 • अॅपल कंपनीमुळे कुपरटिनो ओळखले जाते. या शहरातच अॅपल कंपनीचे मुख्यालय आहे.

AIDWAच्या सरचिटणीसपदी मरियम ढवळे

 • मुंबईच्या मरियम ढवळे यांची अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या (AIDWA) राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
 • पश्चिम बंगाल येथील माजी खासदार मलिनी भट्टाचार्य यांची संघटनेच्या नव्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. ढवळे या AIDWAच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा आहेत.
 • यापूर्वी महाराष्ट्रातील महिला चळवळीच्या लढाऊ नेत्या, माजी खासदार दिवंगत कॉ. अहिल्या रांगणेकर आणि आदिवासी मुक्ती लढ्याच्या प्रणेत्या दिवंगत कॉ. गोदावरी परुळेकर यांनी या संघटनेसाठी राष्ट्रीय पातळीवर काम केले होते.
 • मरियम ढवळे यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी महिलांसाठी अनेक लढे उभारून वनाधिकार, जमीन, रेशन, पाणी, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा प्रश्नांवर आंदोलने केली आहेत.

No comments:

Post a Comment