चालू घडामोडी : २० डिसेंबर

२०१६ची विश्वसुंदरी स्टेफनी डेल व्हॅले

 • पोर्तु रिकोच्या स्टेफनी डेल व्हॅले या सौंदर्यवतीने ‘मिस वर्ल्ड २०१६’ (विश्वसुंदरी) हा मानाचा किताब पटकाविला आहे.
 • १९५१मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या या सर्वात जुन्या जागतिक सौंदर्य स्पर्धेचे यंदाचे ६६वे वर्ष होते. ही स्पर्धा ऑक्सन हिल, मेरीलॅण्ड, अमेरिका येथे झाली.
 • परीक्षकांनी जगभरातील ११७ स्पर्धकांमधून स्टेफनीची ‘मिस वर्ल्ड’ म्हणून निवड केली.
 • गेल्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकलेल्या स्पेनच्या मेरिया लालागुना हिने डेल व्हॅलेला मिस वर्ल्डचा किताब प्रदान केला.
 • १९ वर्षीय विद्यार्थी असलेल्या डेल व्हॅलेला स्पॅनिश, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा अवगत आहेत.
 • कॅरेबियन आयलँडच्या विल्नेलिया मर्सेडनंतर (१९७५) हा किताब पटकाविणारी डेल व्हॅले ही दुसरी कॅरेबियन सौंदर्यवती आहे.
 • डॉमिनिकन रिपब्लीकची यारित्झा मिग्युलिना रेज रमिरेझ हिने दुसरे स्थान तर इंडोनेशियाच्या नताशा मॅन्युएला हिने तिसरे स्थान पटकाविले.
 • मिस फिलीपिन्स कैट्रीओना एलिसा ग्रे आणि मिस केनिया एवलिन एनजाम्बी यांनी अंतिम फेरीत शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते.
 • या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व प्रियदर्शनी चॅटर्जी हिने केले. प्रियदर्शनीने ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१६’ हा खिताब जिंकला आहे.

डिजिटल लघुउद्योगांना प्राप्तिकरात सवलत

 • लघुउद्योगांमध्ये रोखरहित (कॅशलेस) व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्राप्तिकरात सवलत देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
 • सरकारच्या धोरणानुसार असे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना ‘डिजिटल पेमेंट’वरील करातही सूट मिळणार आहे.
 • दरवर्षी २ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांचे अंदाजित उत्पन्न ८ टक्के (१६ लाख) मानून त्यावर प्राप्तीकर आकारण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
 • परंतु, हे व्यापारी जर रोखरहित (कॅशलेस) व्यवहार करायला तयार असतील तर त्यांचं अंदाजित उत्पन्न सहा टक्के (१२ लाख) गृहित धरून कर आकारणी केली जाणार आहे.
 • याशिवाय त्यांना ‘डिजिटल पेमेंट’वर आकारल्या जाणाऱ्या ८ टक्के करातही सूट देण्यात येणार आहे.
 • काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनतेला डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.
 • रोखरहित प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने लकी ग्राहक योजना आणि डिजि-धन व्यापार योजनादेखील जाहीर केल्या आहेत.

डॉक्टर हेन्री हेम्लिच यांचे निधन

 • श्वास अवरोध होऊन उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर प्रथमोपचार शोधून काढणारे अमेरिकेचे डॉक्टर हेन्री हेम्लिच यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
 • १९७०मध्ये त्यांनी व्यक्तीच्या ओटीपोटात विशिष्ट पद्धतीने दाब देऊन श्वासनलिका व अन्ननलिका मोकळी करण्याचे तंत्र शोधले.
 • त्यांच्या या तंत्राने ४० वर्षांत अनेकांचे प्राण वाचले. ही पद्धती ‘हेम्लिच मॅन्युव्हर’ म्हणून ओळखली जाते.
 • अशा अटीतटीच्या प्रसंगी प्राण वाचवणाऱ्या काही उपकरणांचे पेटंटही त्यांनी घेतले होते.
 • त्यांच्या या तंत्राची कुचेष्टा झाली असली तरी नंतर त्याला जगात मान्यता मिळाली.
 • व्हिएतनाम युद्धात त्यांच्या ‘हेम्लिच चेस्ट ड्रेन व्हॉल्व्ह’ने अनेक सैनिकांचे प्राण युद्धभूमीवर वाचवले.
 • हेन्री हेम्लिच यांचा जन्म डेलावरमधील विलमिंग्टन येथे झाला. त्यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते होते.
 • वेल कॉर्नेल मेडिकल कॉलेजमधून ते १९४३मध्ये पदवीधर झाले. नंतर छातीचे शल्यचिकित्सक झाले. ते निवासी डॉक्टर म्हणून काम करीत होते.
 • सिनसिनाटीच्या झेवियर विद्यापीठात ते प्राध्यापक होते, तर हेम्लिच इन्स्टिटय़ूटचे अध्यक्षही होते.
 • त्यांची पत्नी जेन हिने त्यांच्यासमवेत ‘व्हॉट डॉक्टर वोंट टेल यू’ नावाचे एक पुस्तक लिहिले  आहे.

हाँगकाँगला जाण्यासाठी भारतीय पर्यटकांना व्हिसा अनिवार्य

 • भारतातून हाँगकाँगला जाण्यासाठी आता भारतीय पर्यटकांना व्हिसा घ्यावा लागणार आहे. याआधी भारतातून हाँगकाँगला जाण्यासाठी व्हिसा लागत नसे.
 • नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय पर्यटकांना हाँगकाँगला जाण्यासाठी प्री-अराइव्हल रजिस्ट्रेशन किंवा जाण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे.
 • आतापर्यंत, १४ दिवसांपेक्षा कमी काळ हाँगकाँगमध्ये राहण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नव्हती.
 • हाँगकाँगमध्ये आसरा घेणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • दरवर्षी हाँगकाँगला हजारो निर्वासितांचे अर्ज येतात. या निर्वासितांना परवानगी मिळेपर्यंत त्यांना तेथे राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था केली जाते.
 • भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, व्हिएतनाम, बांग्लादेश या देशातून अनेक निर्वासित अर्ज करतात.

एटीकेला दुसऱ्यांदा आयएसएलचे जेतेपद

 • अटीतटीच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटवर ऍटलेटिको द कोलकता (एटीके) संघाने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविले.
 • सौरव गांगुलीची सहमालकी असलेल्या एटीके संघाने केरळा ब्लास्टर्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ अशा फरकाने हरवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले.
 • तर सचिन तेंडुलकरची सहमालकी असलेल्या केरळास दुसऱ्यांदा या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 • नवी मुंबईत दोन वर्षांपूर्वी झालेल्या अंतिम लढतीत कोलकताने केरळास एका गोलने हरवून जेतेपद मिळविले होते.

तमिळनाडूतील शरिया न्यायालयांवर बंदी

 • तमिळनाडूतील मशिदींमध्ये भरणाऱ्या शरिया न्यायालयांवर मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
 • अनिवासी भारतीय अब्दुल रहमान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश संजय कौल व एम. सुंदर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
 • चेन्नईतील अण्णा सलाई मशिदीत अगदी न्यायव्यस्थेनुसार न्यायालय सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत अशा ठिकाणी फक्त प्रार्थना होणे अपेक्षित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
 • या न्यायालयांत समन्स बजावणे, विवाह, तलाकसंबंधी प्रकरणांवर सुनावणी घेणे, अशी अन्य कामे पार पडतात.
 • राज्य सरकारने अशा शरिया न्यायालयांवर बंदी घालून त्याबाबतचा अहवाल चार आठवड्यात न्यायालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

रेयाल माद्रिदला क्लब विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद

 • स्ट्रायकर ख्रिस्तिआनो रोनाल्डोच्या हॅटट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने कशिमा अँटलर्सचा ४-२ असा पराभव करून क्लब विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
 • रोनाल्डोसाठी हे विजेतेपद खास ठरले. या वर्षी त्याने चॅंपियन्स लीग, युरोपियन चॅंपियन्स लीग अशा दोन विजेतेपदाबरोबरच वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा किताबही मिळविला आहे.
 • क्लब विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रेयालसाठी रोनाल्डोने तीन, तर करीम बेन्झेंमाने एक गोल केला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोनाल्डोच ‘गोल्डन बॉल’चा मानकरी ठरला.

पाकिस्तानमध्येही नोटाबंदी

 • काळ्या पैशावर नियंत्रणासाठी भारताने घेतेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे अनुकरण पाकिस्तानने केले आहे.
 • काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पाच हजाराची नोट बंद करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत बहूमताने पारित करण्यात आला आहे.
 • पाच हजाराची नोट चलनातून रद्द केल्याने देशातील भ्रष्टाचार व काळ्यापैशावर नियंत्रण आणणे सोपे होणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.
 • त्यानुसार येत्या तीन ते पाच वर्षांत पाच हजार रुपयांच्या नोटा टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा